प्रस्तावना
ही परस्परविरोधी परिस्थिती विचारात घ्या: एका औद्योगिकरित्या प्रगत देशात ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी सांगितले की ते जीवनात खूप अथवा बऱ्यापैकी आनंदी आहेत. पण त्याच देशात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या १० औषधांपैकी ३ औषधे नैराश्य या मानसिक रोगावरील औषधे आहेत. त्याच देशात ९१ टक्के लोकांना त्यांचे कौटुंबिक जीवन समाधानकारक आहे असे वाटते. पण तेथील एकूण विवाहांपैकी निम्म्या विवाहांचा घटस्फोटात अंत होतो!
वस्तुस्थिती पाहता, जगाच्या अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या १८ देशांतील लोकांवर घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून असे दिसून येते की “जवळजवळ सबंध जगावर भविष्याविषयी निराशावादाचे सावट आहे.” बहुतेक लोकांना जीवनात पूर्ण समाधान नाही हे यावरून स्पष्ट आहे. तुमच्याविषयी काय? हे माहितीपत्रक तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधानी जीवन जगण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.