व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ३

विश्‍वसनीय मार्गदर्शन देणारा ग्रंथ

विश्‍वसनीय मार्गदर्शन देणारा ग्रंथ

 चीनमधील ग्वांगझू येथील चाँग शांग विद्यापीठातून प्रकाशित होणाऱ्‍या एका पत्रिकेत असे म्हणण्यात आले की “बायबल हा, मानव संस्कृती व वास्तविक अनुभवांच्या संगमातून उत्पन्‍न झालेला एक अद्वितीय ग्रंथ आहे.” इम्मॅनुएल कॅन्ट या १८ व्या शतकातील एका प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने असे म्हटल्याचे सांगितले जाते, की “सामान्य माणसाला बायबल उपलब्ध होणे हे मानवजातीला आजवर लाभलेले सर्वात मोठे वरदान आहे. त्याची कोणत्याही प्रकारे निंदा करणे . . . मानवतेविरुद्ध एक गुन्हा आहे.” एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना यात असे म्हटले आहे: “बायबलचा प्रभाव केवळ यहुदी व ख्रिस्ती यांच्यापुरताच मर्यादित नाही. . . . आज त्याला एक मौल्यवान नैतिक व धार्मिक ठेव समजले जाते आणि जागतिक समाजाची आशा जसजशी वाढत जाईल तसतसे यातील अमर्याद सुज्ञान अधिकच मौल्यवान शाबीत होईल.”

तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात तरीही अशा एका ग्रंथाविषयी जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता वाटत नाही का? २० व्या शतकाच्या शेवटापर्यंत पूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग २,२०० पेक्षा अधिक भाषांतून भांषातरीत करण्यात आले होते. बहुतेक लोकांना वाचता येईल व समजेल अशा भाषेत बायबल आज उपलब्ध आहे. चल खिळ्यांच्या तंत्राचा शोध लागल्यापासून बायबलच्या अंदाजे चारशे कोटी प्रती सबंध जगात वितरीत करण्यात आल्या आहेत.

तुमच्याकडे बायबलची एक प्रत असल्यास कृपया ती उघडा आणि अनुक्रमणिका पाहा. यात तुम्हाला उत्पत्तिपासून प्रकटीकरणापर्यंत वेगवेगळ्या पुस्तकांची यादी दिसेल. बायबल खरे तर ६६ पुस्तकांचा एक संग्रह आहे आणि ही पुस्तके ४० वेगवेगळ्या लेखकांनी लिहिली आहेत. बरेच लोक ज्याला जुना करार म्हणतात त्या बायबलच्या पहिल्या भागात ३९ पुस्तके आहेत; या भागाला इब्री शास्त्रवचने देखील म्हणतात आणि हे नाव उचित आहे कारण यापैकी बराचसा भाग इब्री भाषेत लिहिण्यात आला होता. दुसऱ्‍या भागात २७ पुस्तके असून बरेच लोक याला नवा करार म्हणतात, पण याचे उचित नाव ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने आहे कारण हा भाग ख्रिस्ती लेखकांनी ग्रीक भाषेत लिहिला. सबंध बायबल लिहिण्याकरता सा.यु.पू. १५१३ पासून सा.यु. ९८ पर्यंत १,६०० वर्षांपेक्षा जास्त काळ गेला. बायबलच्या सर्व लेखकांची परस्परांशी विचारविनिमय करण्याकरता कधीच बैठक झाली नाही आणि काही पुस्तके तर एकाच वेळी हजारो मैलांच्या अंतरावर असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी लिहिण्यात आली. आणि तरीसुद्धा सबंध बायबलमध्ये एकाच मुख्य विषयाचा धागा आढळतो; हा एकच संयुक्‍त ग्रंथ आहे आणि त्यात कोठेही विसंगती नाही. मनात एक प्रश्‍न आल्याशिवाय राहात नाही, तो म्हणजे, ‘एकूण १६ शतकांच्या कालखंडात अस्तित्वात राहिलेल्या ४० पेक्षा अधिक जणांनी लिहिलेल्या ग्रंथात इतकी विलक्षण सुसंगती कशी काय असू शकते?’

“[देवाने] उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरिले आहे, त्याने पृथ्वी निराधार टांगिली आहे”

बायबलचे लेखन १,९०० वर्षांपेक्षा अधिक काळाआधी पूर्ण झाले तरीसुद्धा त्यातील माहिती या आधुनिक काळातही स्त्रीपुरुषांची जिज्ञासा जागृत करते. उदाहरणार्थ, आपले बायबल उघडून ईयोब २६:७ हे वचन काढा. हे वचन सा.यु.पू. १५ व्या शतकात लिहिण्यात आले हे लक्षात घ्या. त्यात असे लिहिले आहे: “[देवाने] उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरिले आहे; त्याने पृथ्वी निराधार टांगिली आहे.” आता यशया ४०:२२ हे वचन उघडा आणि आठवणीत असू द्या की हे वचन सा.यु.पू. ८ व्या शतकात लिहिण्यात आले. यात असे सांगितले आहे: “हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर [“पृथ्वीच्या गोलावर,” NW] आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरितो, राहण्यासाठी तंबू ताणितात तसे ते तो ताणितो.” या दोन वचनांतील वर्णन वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कशाचे चित्र उभे राहते. अंतराळात ‘टांगलेल्या’ एका गोलाकार वस्तूचे. अत्याधुनिक अंतराळ यानांतून घेतलेल्या छायाचित्रांत कदाचित तुम्ही हे पाहिलेही असेल. पण तुमच्या मनात कदाचित असा प्रश्‍न येईल की ‘इतक्या पुरातन काळात राहणाऱ्‍या माणसांना वैज्ञानिकरित्या इतकी अचूक विधाने करणे कसे शक्य झाले?’

बायबलच्या संदर्भात थोडा वेगळा प्रश्‍न विचारात घेऊ या. बायबल इतिहासाच्या दृष्टीने अचूक आहे का? काहींना असे वाटते की बायबल केवळ पारंपरिक कथांचा एक संग्रह आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या त्यांना काही आधार नाही. उदाहरणार्थ, इस्राएलचा सुप्रसिद्ध राजा दावीद. अगदी अलीकडच्या काळापर्यंत त्याच्या अस्तित्वाला केवळ बायबलमधील माहितीचा आधार होता. काही प्रमुख इतिहासकार जरी त्याला एक वास्तविक ऐतिहासिक व्यक्‍ती मानत असले तरीसुद्धा काही संशयवाद्यांचे असे म्हणणे आहे की दावीद म्हणजे यहुदी मतप्रचारकांनी शोधून काढलेले काल्पनिक पात्र आहे. पण वस्तुस्थिती काय दाखवते?

“दाविदाचे घराणे” असा उल्लेख करणारा शिलालेख

दान या प्राचीन इस्राएली शहराच्या अवशेषांत १९९३ साली “दाविदाचे घराणे” असा खोदीव लेख आढळला. हा लेख सा.यु.पू. नवव्या शतकातील एका पडक्या स्मारकाच्या शिलेवर, इस्राएलाच्या शत्रूंनी त्यांच्यावर मिळवलेल्या विजयाच्या अहवालात नमूद होता. अचानक बायबलेतर इतिहासात दाविदाविषयी संदर्भ सापडला होता! हा शोध महत्त्वाचा होता का? तेल अव्हीव्ह विद्यापीठाचे इज्रीअल फिंकलस्टाईन या संदर्भात म्हणतात: “दाविदाचा उल्लेख असलेला शिलालेख सापडताच, बायबलविषयीचा शून्यवाद एका रात्रीत कोलमडून पडला.” कित्येक दशकांपासून पॅलेस्टाईनच्या प्रदेशात उत्खनन करणारे प्राध्यापक विल्यम एफ. ऑल्ब्राइट यांनी एकदा असे म्हटले: “एकापाठोपाठ एक शोधाने असंख्य तपशीलांची अचूकता शाबीत करून बायबलच्या ऐतिहासिकतेला अधिकाधिक मान्यता मिळवून दिली आहे.” पुन्हा एकदा असा प्रश्‍न येतो की ‘हा ऐतिहासिक ग्रंथ महाकाव्ये आणि पारंपरिक दंतकथांपेक्षा वेगळा आणि ऐतिहासिकदृष्ट्या इतका अचूक कसा असू शकतो?’ पण इतकेच नाही, अजूनही पुष्कळ विचारात घेण्याजोगे आहे.

थोर सिकंदरचे शीर्ष असलेले नाणे

बायबल भविष्यवाणींचा ग्रंथ देखील आहे. (२ पेत्र १:२०, २१) “भविष्यवाणी” हा शब्द ऐकताच कदाचित तुमच्या मनात, स्वतःला भविष्यवक्‍ता म्हणवणाऱ्‍यांच्या खोट्या ठरलेल्या भाकीतांचा विचार आला असेल. पण कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता बायबलमधील दानीएल या पुस्तकाचा ८ अध्याय काढा. येथे दानीएलाने दोन शिंगांच्या एका एडक्यासोबत, “एक ठळक शिंग” असलेल्या केसाळ बकऱ्‍याच्या झुंजीविषयी वर्णन केले आहे. बकऱ्‍याने एडक्याला खाली तर पाडले पण या झुंजीत त्याचे ठळक शिंग तुटले. आणि त्या ठिकाणी चार नवी शिंगे फुटली. या दृष्टान्ताचा काय अर्थ होतो? दानीएलाच्या अहवालात पुढे सांगितले आहे: “दोन शिंगे असलेला एडका तू पाहिला, ते मेदय व पारस यांचे राजे. तो दांडगा बकरा [“केसाळ बोकड,” पं.र.भा.] ग्रीसचा राजा; त्याच्या डोळ्यांच्या मधोमध असलेले मोठे शिंग हा पहिला राजा. एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली याचा अर्थ असा की त्या राज्यांतून चार राज्ये उद्‌भवतील. मग त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहावयाचे नाही.”—दानीएल ८:३-२२.

“एकापाठोपाठ एक शोधाने असंख्य तपशीलांची अचूकता शाबीत करून बायबलच्या ऐतिहासिकतेला अधिकाधिक मान्यता मिळवून दिली आहे.”—प्राध्यापक विल्यम एफ. ऑल्ब्राइट

ही भविष्यवाणी पूर्ण झाली का? दानीएलचे पुस्तक सा.यु.पू. ५३६ साली लिहून पूर्ण झाले. याच्या १८० वर्षांनंतर, म्हणजे सा.यु.पू. ३५६ साली मासेदोनियाचा राजा थोर सिकंदर याचा जन्म झाला. त्याने पर्शियन साम्राज्यावर विजय मिळवला. तोच ‘केसाळ बोकडाच्या’ डोळ्यांच्या मधोमध असलेले “मोठे शिंग” होता. जोसीफस या यहुदी इतिहासकारानुसार, पर्शियावर विजय मिळवण्याआधी सिकंदर जेरूसलेम येथे आला तेव्हा त्याला दानीएलाचे पुस्तक दाखवण्यात आले. त्याने देखील असा निष्कर्ष काढला की त्याच्याकडे संकेत करणारी दानीएलाची भाकिते, पर्शियावर त्याच्या आक्रमणासंबंधीच होती. शिवाय, जागतिक इतिहासाचे वर्णन करणाऱ्‍या पाठ्यपुस्तकांत, सा.यु.पू. ३२३ साली सिकंदरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या राज्याचे काय झाले याविषयी तुम्ही वाचू शकता. त्याच्या चार सेनापतींनी कालांतराने त्याचे साम्राज्य हाती घेतले आणि सा.यु.पू. ३०१ सालापर्यंत ‘ठळक शिंगाऐवजी’ “चार शिंगे” निघाली आणि त्यांनी साम्राज्याचे चार हिस्से केले. पुन्हा एकदा, आपण असा प्रश्‍न विचारू शकतो, ‘जवळजवळ २०० वर्षांनंतर घडणार असलेल्या गोष्टींविषयी एका ग्रंथात इतकी सुस्पष्ट आणि अचूक माहिती कशी देता आली?’

वरील प्रश्‍नांचे उत्तर खुद्द बायबल देते: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख . . . उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) “परमेश्‍वरप्रेरित” असा अनुवाद केलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ “देवाने श्‍वास फुंकलेला” असा होतो. त्याअर्थी, आज बायबलच्या पुस्तकांत आपल्याला जी माहिती सापडते ती श्‍वासाप्रमाणे देवाने जवळजवळ ४० लेखकांच्या मनात ‘फुंकली.’ आपण विचारात घेतलेली विज्ञान, इतिहास व भविष्यवाणीसंबंधी दोन तीन उदाहरणे एकाच निष्कर्षाकडे संकेत करतात. तो असा, की हा अद्धितीय ग्रंथ अर्थात बायबल, मनुष्याच्या बुद्धीने नव्हे तर देवाकडून उत्पन्‍न झाला. पण आज बरेचजण त्याच्या लेखकाच्या, म्हणजेच देवाच्या अस्तित्वाविषयी साशंक आहेत. तुम्ही देखील आहात का?