व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ९

समाधानी जीवन उपभोगा—आता व सर्वकाळ!

समाधानी जीवन उपभोगा—आता व सर्वकाळ!

 बायबलच्या इतिहासातील एक सुप्रसिद्ध व्यक्‍ती, अब्राहाम याने ऊर नावाच्या धनसंपन्‍न शहरातील आरामशीर जीवनाचा त्याग केला. काहीकाळ हारान येथे राहिल्यानंतर तो आपल्या उर्वरीत जीवनात भटक्या लोकांप्रमाणे तंबूत राहिला; कायम असे राहण्याचे ठिकाण त्याला कधी मिळाले नाही. (उत्पत्ति १२:१-३; प्रेषितांची कृत्ये ७:२-७; इब्री लोकांस ११:८-१०) तरीसुद्धा त्याच्याविषयी असे लिहिले आहे: “अब्राहाम पुऱ्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन समाधानाने मरण पावला.” (उत्पत्ति २५:८, NW) अब्राहामचे जीवन इतके समाधानी का होते? मृत्यूशय्येवर आपल्या जीवनातील सर्व सफलतांचा विचार करून समाधान मानणारा वृद्ध माणूस तो नव्हता. एका नंतरच्या लिखाणात अब्राहामला देवावर उल्लेखनीय विश्‍वास ठेवल्यामुळे “देवाचा मित्र” म्हणण्यात आले. (याकोब २:२३; यशया ४१:८) आपल्या निर्माणकर्त्याबरोबर एक अर्थपूर्ण नातेसंबंध जोडल्यामुळे त्याचे जीवन समाधानी ठरले.

देवासोबत मैत्री केल्यास तुम्ही समाधानी जीवन जगू शकता

तुमचे जीवन अब्राहामपेक्षाही अधिक समाधानी होऊ शकते का?

ज्याप्रमाणे ४,००० वर्षांपूर्वी अब्राहामाने देवासोबत मैत्री केली होती त्याप्रमाणे तुम्ही देखील करू शकता; असे केल्यास तुम्ही आज एक अर्थपूर्ण समाधानी जीवन जगू शकाल. या विश्‍वाच्या निर्माणकर्त्यासोबत मैत्री करण्याचा विचार कदाचित तुम्हाला अशक्यप्राय वाटेल, पण मुळात ते शक्य आहे. कसे? तुम्ही त्याला जाणून घेतले पाहिजे व त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. (१ करिंथकर ८:३; गलतीकर ४:९) निर्माणकर्त्यासोबत असा नातेसंबंध जोडल्यामुळे तुमचे जीवन अतिशय अर्थपूर्ण व समाधानी ठरेल.

जे कोणी येशू ख्रिस्ताचे खंडणी यज्ञार्पण स्वीकारण्यास तयार आहेत त्यांना आनंदी जीवन जगण्यास मदत करण्यासाठी यहोवाने मार्गदर्शक सूचना पुरवल्या आहेत. (यशया ४८:१७) आठवणीत असू द्या, बरे काय व वाईट काय हे स्वतंत्रपणे ठरवून आदामाने देवाविरुद्ध विद्रोह केला. यहोवाने आपल्या पुत्राच्या खंडणी यज्ञार्पणाद्वारे मानवी कुटुंबाला विकत घेऊन त्यांना पाप व मृत्यूच्या दास्यातून मुक्‍तीचा मार्ग दिला हे खरे असले तरीसुद्धा, प्रत्येक व्यक्‍तीने या खंडणीचा स्वीकार करून स्वतःच्या मनाने बरेवाईट ठरवण्याचे थांबवले पाहिजे. येशूच्या खंडणी यज्ञार्पणाचा स्वीकार करणाऱ्‍यांकरता देवाने पुरवलेल्या नियमांच्या व तत्त्वांच्या आपण अधीन झाले पाहिजे.

“तुझे मार्ग मला दाखीव”

तुम्ही बायबलचा अभ्यास आणि त्यातील तत्त्वांचे पालन कराल तसतशी तुम्हाला याची जाणीव होत जाईल की बऱ्‍यावाईटाविषयी देवाचे दर्जे अत्यंत मोलाचे आहेत. (स्तोत्र १९:७-९) तुम्ही देखील यहोवाचा संदेष्टा मोशे याच्याप्रमाणे असे म्हणण्यास प्रेरित व्हाल: “आता माझ्यावर तुझी कृपादृष्टि असल्यास, तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल.” (निर्गम ३३:१३; स्तोत्र २५:४) या ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसांत’ येणाऱ्‍या समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्याकरता बायबल अनेक तत्त्वे पुरवते. (२ तीमथ्य ३:१) या तत्त्वांच्या मोलाची तुम्हाला जसजशी जाणीव होईल तसतशी तुम्हाला यहोवाची अधिक चांगली ओळख घडेल आणि त्याच्यासोबतची तुमची मैत्री दृढ होत जाईल.

अब्राहाम “म्हातारा होऊन समाधानाने” मरण पावला; पण एक न एक दिवशी मरायचे आहे हा विचार केल्यास जीवन अगदीच अल्पावधीचे वाटते. आपण कितीही वृद्ध झालो तरीही आपल्याला स्वाभाविकतःच जगण्याची इच्छा असते. याचे कारण म्हणजे “[देवाने] मनुष्याच्या मनांत अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्‍न केली आहे; तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही.” (उपदेशक ३:११) सर्वकाळ जगलो तरीही आपल्याला यहोवाच्या सर्व निर्मिती कृत्यांचे पूर्णपणे आकलन होणार नाही. यहोवाच्या अद्‌भुत कृत्यांमध्ये पाहण्यासारख्या, अभ्यास करण्यासारख्या आणि उपभोग घेण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत!—स्तोत्र १९:१-४; १०४:२४; १३९:१४.

पृथ्वीवर आज दिसणाऱ्‍या समस्या पुढेही सुरू राहिल्यास कदाचित अशा पृथ्वीवर सर्वकाळ जगावेसे तुम्हाला वाटणार नाही. पण असा विचार करण्याचे कारण नाही. बायबल आपल्याला आश्‍वासन देते: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्‍यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) “नवे आकाश” एक नवीन स्वर्गीय सरकार, अर्थात देवाचे राज्य यास सूचित करते जे सबंध पृथ्वीवर राज्य करील. “नवी पृथ्वी” एका नवीन मानवी समाजाला सूचित करते ज्यात त्या राज्याच्या शासनाखाली राहणाऱ्‍या आज्ञाधारक जनांचा समावेश असेल. हे आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी यहोवा लवकरच “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा” नाश करेल.—प्रकटीकरण ११:१८; २ पेत्र ३:१०.

हे केव्हा घडेल? येशूने “ह्‍या युगाच्या [“व्यवस्थीकरणाच्या,” NW] समाप्तीचे चिन्ह” सांगितले होते. राष्ट्राराष्ट्रांत युद्धे, “जागोजागी दुष्काळ व भूमिकंप,” “मऱ्‍या,” होतील आणि ‘अनीती वाढेल’ असे येशूने सांगितले. (मत्तय २४:३-१३; लूक २१:१०, ११; २ तीमथ्य ३:१-५) मग त्याने असे भाकीत केले: “ह्‍या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.” (लूक २१:३१) खरोखरच दुष्टांना नाश करण्याची यहोवाची वेळ वेगाने जवळ येत आहे. *

यहोवा या पृथ्वीवरील दुष्टाई नष्ट करेल त्या ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसानंतर’ सबंध पृथ्वीचे एका परादिसात रूपांतर केले जाईल. (प्रकटीकरण १६:१४, १६; यशया ५१:३) मग “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) पण ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्याविषयी काय? येशूने म्हटले, “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) यहोवाला आपल्यापैकी प्रत्येकाची काळजी आहे आणि जे मृतावस्थेत आहेत त्यांना तो पुन्हा जिवंत करू इच्छितो. वैज्ञानिक कदाचित जनुकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याच्या तंत्राने मानवांचे क्लोनिंग किंवा प्रतिरूप तयार करतील पण निर्माणकर्त्याला अशाप्रकारे क्लोनिंग करण्याची गरज नाही. तारणाकरता योग्य असलेल्या प्रत्येक व्यक्‍तीविषयी एकूण एक गोष्ट तो आठवणीत ठेवू शकतो आणि त्यांना पुन्हा जिवंत करू शकतो. होय एका परादीस पृथ्वीवर तुम्ही तुमच्या मृत प्रिय जनांना पुन्हा भेटू शकाल!

परादीसातील जीवन कसे असेल? सबंध पृथ्वीवर, निर्माणकर्त्याची एकजुटीने स्तुती करणारे आनंदी स्त्री पुरुष असतील. “‘मी रोगी आहे’ असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४; ५४:१३) कोणालाही आरोग्याला हानीकारक असलेल्या तणावाला तोंड द्यावे लागणार नाही किंवा भावनात्मक अथवा मानसिक विकार होणार नाहीत. सर्वांना खाण्यापिण्याकरता भरपूर असेल आणि देवाच्या उद्देशाच्या अनुरूप असणारे अर्थपूर्ण कार्य ते आनंदाने करतील. (स्तोत्र ७२:१६; यशया ६५:२३) प्राण्यांसोबत, सहमानवांसोबत त्यांचा शांतीपूर्ण संबंध असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांची “देवाबरोबर शांति” असेल.—रोमकर ५:१; स्तोत्र ३७:११; ७२:७; यशया ११:६-९.

१० त्या परादीसमध्ये जाण्याकरता व पूर्णार्थाने समाधानी जीवनाचा उपभोग घेण्याकरता तुम्ही काय केले पाहिजे? येशू ख्रिस्ताने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताचे त्यांनी ज्ञान घ्यावे.” (योहान १७:३, NW) म्हणूनच यहोवा आणि येशू ख्रिस्ताविषयी ज्ञान घेत राहा आणि देव आपल्याकडून काय अपेक्षितो याविषयी जाणून घ्या. मग तुम्ही यहोवा देवाला संतुष्ट करू शकाल आणि यामुळे तुमचे जीवन अधिक समाधानी होईल.

^ या भविष्यवाणीविषयी तुम्ही वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील ११ व्या अध्यायातून अधिक जाणून घेऊ शकता.