व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग १

समाधानी जीवन—केवळ स्वप्न?

समाधानी जीवन—केवळ स्वप्न?

 एखाद्या विकसित देशातील एका प्रशस्त, सुंदर घराची वास्तू पाहून कदाचित, हे लोक किती सुखीसमाधानी आहेत असा विचार तुमच्या मनात येईल. पण घरात प्रवेश केल्यावर तुम्हाला कोणते चित्र दिसते? घरातले वातावरण भकास व तणावपूर्ण आहे. तरुण मुले आपल्या आईवडिलांशी “हो” व “नाही” यापलीकडे संभाषण करत नाहीत. त्यांची आई आपल्या पतीने आपल्याकडे थोडेतरी लक्ष द्यावे म्हणून आसुसली आहे. तर वडिलांना मात्र कोणाची कटकट ऐकून घ्यायला सवड नाही. या दांपत्याचे म्हातारे आईवडील दूर कोठेतरी आपल्या कुटुंबियांच्या आठवणीत दिवस काढत आहेत, आणि कित्येक महिन्यांपासून त्यांनी त्यांचे तोंड देखील पाहिलेले नाही. पण दुसरीकडे पाहता, याचप्रकारचे तणाव झेलणाऱ्‍या काही कुटुंबांना आपल्या समस्यांवर मात करण्यात यश आले आहे आणि आज ते अगदी आनंदात आहेत. हे कसे शक्य झाले असावे?

आता जगातल्या दुसऱ्‍या कोपऱ्‍यातल्या एका विकसनशील देशातील कुटुंबाचे उदाहरण घ्या. या कुटुंबाचे एकूण सात सदस्य एका पडक्या झोपडीत राहतात जी कोणत्याही क्षणी पडू शकेल. उद्या आपल्याला काही खायला मिळेल किंवा नाही याचीही त्यांना खात्री नाही. मनुष्य या जगातून उपासमार आणि गरिबी काढू शकलेला नाही या दुर्दैवी वस्तूस्थितीची या कुटुंबाला पाहून प्रचिती येते. पण आज जगाच्या पाठीवर अशी कित्येक कुटुंबे आहेत जी गरिबीतही आनंदी आहेत. का?

श्रीमंत देशांतही आर्थिक समस्या येऊ शकतात. जपानमध्ये आर्थिक “भरभराटीच्या” काळात एका कुटुंबाने एक घर विकत घेतले. लवकरच पगारवाढ होण्याची खात्री असल्यामुळे त्यांनी बँकेतून मोठे कर्ज काढले. पण “मंदी” आल्यामुळे त्यांना कर्ज फेडणे अशक्य वाटू लागले आणि नाईलाजाने त्यांना घेतलेल्या किंमतीपेक्षा बऱ्‍याच कमी किंमतीत आपले घर विकावे लागले. आज ते त्या घरात राहात नाहीत पण त्याच्यासाठी काढलेले कर्ज ते अजूनही फेडत आहेत. शिवाय, क्रेडिट काड्‌र्सचा वाटेल तसा उपयोग केल्यामुळे आलेली बिले देखील भरण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. त्यात, वडील घोड्यांच्या शर्यतीत पैसे उडवत असल्यामुळे ते अधिकच कर्जात बुडाले आहेत. पण बऱ्‍याच कुटुंबांनी काही तडजोडी केल्यामुळे आज ते आनंदी आहेत. हे त्यांनी कसे केले, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?

मानवी नातेसंबंधांमुळे देखील सतत तणावपूर्ण समस्या निर्माण होत असतात व जीवनातील असमाधानात भर पाडत असतात; आणि तुम्ही जगातल्या कोणत्याही भागात राहात असला तरीही तुम्हाला याचा अनुभव येतो. कामाच्या ठिकाणी कदाचित तुमच्याविरुद्ध तुमच्या पाठीमागे टीका केली जात असेल. तुमचे यश पाहून इतरांना हेवा वाटत असेल आणि यामुळे ते विनाकारण तुमच्याबद्दल खोटी माहिती पसरवत असतील. कदाचित, अधिकार गाजवण्याची सवय असलेल्या एखाद्यासोबत दररोज काम करावे लागत असल्यामुळे तुम्हाला सारखा मनःस्ताप होत असेल. शाळेत तुमच्या मुलांना दांडगाई करणाऱ्‍या इतर मुलांकडून त्रास, मारहाण सहन करावी लागत असेल किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असेल. जर तुम्ही एकटे पालक असाल, तर इतरांशी व्यवहार करताना किती समस्यांना तोंड द्यावे लागते याची तुम्हाला चांगली कल्पना असेल. आजच्या जगात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या कित्येक स्त्रीपुरुषांच्या जीवनातील तणावात भर घालत आहेत.

तणावाचे परिणाम हळूहळू वाढत जातात आणि एक वेळ अशी येते, जेव्हा ते सहनशक्‍तीच्या पलीकडे जातात. आणि मग पूर्वसूचनेशिवाय या तणावाचा उद्रेक होतो. म्हणूनच तणावाला छुपा शिकारी आणि दीर्घकालीन तणावाला हळूहळू परिणाम करणारे विष म्हणण्यात आले आहे. मिनेसोटा विद्यापीठाचे प्राध्यापक रॉबर्ट एल. वनिंगा यांनी सांगितले की “आज तणाव आणि त्यामुळे होणारे आजार जगातल्या कानाकोपऱ्‍यांतील कर्मचाऱ्‍यांना त्रस्त करत आहेत.” अमेरिकन अर्थव्यवस्थेला तणाव व संबंधित विकारांमुळे दर वर्षी २०० दशलक्ष डॉलर्सचा भुर्दंड सहन करावा लागतो असे म्हटले जाते. तसेच आता अमेरिकेतून तणाव निर्यात केला जातो असेही आजकाल म्हटले जाते; जगाच्या बऱ्‍याच प्रमुख भाषांतून “तणाव” या शब्दाचा उल्लेख होऊ लागला आहे. तुम्ही तणावग्रस्त असता तेव्हा ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करणे तुम्हाला शक्य होत नाही, आणि यामुळे तुम्हाला दोषी वाटू लागते. अलीकडे घेतलेल्या एका अभ्यासानुसार सामान्य व्यक्‍ती दिवसांतून दोन तास स्वतःला दोष देण्यात घालवते. पण तरीसुद्धा काहीजण तणावावर मात करून जीवनात यशस्वी झाले आहेत.

तुम्ही या दैनंदिन समस्यांना तोंड देऊन समाधानी जीवन कसे जगू शकता? काहीजण सल्लाविषयक पुस्तकांच्या आणि तज्ज्ञांनी लिहिलेल्या मार्गदर्शिकांचा उपयोग करतात. पण हे ग्रंथ खरोखर विश्‍वासार्ह असतात का? ४२ भाषांत अनुवादित करण्यात आलेल्या आणि ५ लाख प्रतींचे वितरण झालेल्या मुलांच्या पालनपोषणावरील एका पुस्तकाचे लेखक डॉ. बेन्जमिन स्पॉक यांनी एकदा असे म्हटले, की “सध्या, अमेरिकेतील आईवडिलांची सर्वात सामान्य समस्या म्हणजे ते मुलांच्या शिस्तीच्या बाबतीत कडक नाहीत.” मग त्यांनी असे म्हटले की यासाठी जर कोणी दोषी आहेत तर ते आहेत त्यांच्यासारखे व्यावसायिक सल्लागार. त्यांनी कबूल केले, की “आम्हालाच सर्व समजते या अविर्भावात आम्ही सल्ला देत होतो, पण यामुळे आईवडिलांचा आत्मविश्‍वास खचत होता हे आम्हाला लक्षात आले नाही; आणि आले, तेव्हा खूप उशीर झालेला होता.” मग प्रश्‍न असा उठतो की ‘आज आणि भविष्यात समाधानी जीवन जगण्यासाठी कोणाच्या सल्ल्याचे आपण खात्रीने पालन करू शकतो?’