व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंगणात नाकारणे

अंगणात नाकारणे

अध्याय १२०

अंगणात नाकारणे

गेथशेमाने बागेत येशूचा त्याग करून इतर प्रेषितांबरोबर भीतीने पळाल्यानंतर पेत्र व योहान मध्येच थांबतात. येशूला हन्‍नाच्या घरी नेत असताना कदाचित ते त्याला गाठतात. हन्‍ना येशूला प्रमुख याजक कयफाकडे पाठवतो तेव्हा पेत्र व योहान मध्ये बरेच अंतर ठेवून त्यांच्या पाठोपाठ जातात. स्वतःच्या जिवाची धास्ती आणि आपल्या धन्याचे काय होईल याची तीव्र काळजी यामध्ये त्यांचे मन द्विधा झाले असावे.

कयफाच्या प्रशस्त मोठ्या घरात आल्यावर, त्याची प्रमुख याजकाशी ओळख असल्यामुळे, योहानाला अंगणात प्रवेश करणे शक्य होते. पेत्र मात्र बाहेर दरवाजापाशी उभा राहतो. पण लवकरच योहान परत येतो व द्वारपाल असलेल्या दासीशी बोलतो आणि पेत्राला आत प्रवेश करण्याची परवानगी मिळते.

आतापर्यंत हवेत गारवा भरला आहे आणि घरगडी तसेच प्रमुख याजकाच्या अधिकाऱ्‍यांनी कोळशाचा विस्तव पेटवला आहे. येशूच्या चौकशीचा निकाल कळेपर्यंत वाट पाहताना, उब घेण्यासाठी पेत्र त्यांच्यात सामील होतो. तेथे जाळाच्या प्रखर प्रकाशात, पेत्राला आत घेणाऱ्‍या द्वारपालिकेला पेत्र अधिक चांगला पाहता येतो. ती उद्‌गारतेः “तूही येशू गालीलकर बरोबर होतास!”

ओळखला गेल्यामुळे अस्वस्थ होऊन त्या सर्वांपुढे पेत्र, आपण येशूला ओळखत असल्याचे नाकारतो. तो म्हणतोः “त्याला मी ओळखत नाही, आणि तू काय म्हणतेस ते मला समजतही नाही.”—न्यू.व.

तेव्हा पेत्र दाराजवळ जातो. तेथे दुसरी मुलगी त्याला पाहते आणि जवळ उभ्या असलेल्या लोकांना म्हणतेः “हा नासोरी येशूबरोबर होता.” पुन्हा एकदा पेत्र ते नाकारतो व शपथ घालून म्हणतोः “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.”

शक्य तितका लोकांच्या नजरेत न येण्याचा प्रयत्न करीत पेत्र अंगणात राहतो. कदाचित, या वेळी पहाटेच्या अंधारात कोंबड्याच्या आरवण्याने तो दचकतो. दरम्यान येशूची चौकशी चालू आहे. ती अंगणाच्या वरच्या बाजूला असलेल्या घरामध्ये चालली आहे हे उघड आहे. साक्ष देण्यासाठी आणल्या जाणाऱ्‍या अनेक साक्षीदारांची ये-जा खाली थांबलेल्या पेत्र व इतरांना दिसते यात शंका नाही.

येशूचा सहकारी म्हणून पेत्राला शेवटले ओळखल्याला सुमारे एक तास झाला आहे. आता जवळपास उभे असलेल्यातले अनेक त्याच्यापाशी येतात व म्हणतातः “खरोखर तूही त्यातला आहेस. कारण तुझ्या बोलीवरुन तू कोण आहेस हे दिसून येते.” पेत्राने ज्याचा कान कापला होता, त्या मल्खाचा नातेवाईक या जमावात आहे. तो म्हणतोः “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?”

पेत्र आवेशाने ठासून सांगतोः “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” त्यासंबंधी शाप उच्चारून आणि शपथ वाहून म्हणजे वस्तुतः, तो खोटे बोलत असल्यास त्याचे तळपट व्हावे असे म्हणून, त्या सर्वांची गफलत होत आहे अशी त्यांची खात्री पटवण्याचा पेत्र प्रयत्न करतो.

पेत्र तिसऱ्‍यांदा नकार देतो तेव्हाच कोंबडा आरवतो. आणि बहुधा अंगणाच्या वरच्या सज्जात आलेला येशू त्या क्षणी वळून पेत्राकडे पाहतो. तात्काळ पेत्राला येशू माडीवरील खोलीत, काही तासांपूर्वीच काय म्हणाला होता, ते आठवते. तो म्हणाला होताः “कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” आपल्या पापाच्या भाराने पिचून जाऊन पेत्र बाहेर जातो व दुःखाने अतिशय ओक्साबोक्सी रडतो.

हे कसे घडले? आपल्या आध्यात्मिक बळाची इतकी खात्री असताना लागोपाठ तीन वेळा पेत्र आपल्या धन्याला कसा नाकारू शकला? परिस्थितीने पेत्राला बेसावध गाठले यात शंका नाही. सत्याचा विपर्यास होत आहे आणि अतिअधम गुन्हेगार असे येशूचे चित्र रेखाटले जात आहे. खरे असलेले खोटे असल्यासारखे, निरपराधी, अपराधी असल्याप्रमाणे दाखवले जात आहे. तेव्हा प्रसंगाच्या दबावापुढे पेत्राचा तोल जातो. अचानक त्याची निष्ठेची योग्य जाणीव डळमळते. माणसाच्या भीतीमुळे हातापायातील त्राण गेल्यामुळे त्याला दुःख भोगावे लागले. तसे आपल्या बाबतीत कधीही न होवो! मत्तय २६:५७, ५८, ६९-७५; मार्क १४:३०, ५३, ५४, ६६-७२; लूक २२:५४-६२; योहान १८:१५-१८, २५-२७.

▪ प्रमुख याजकाच्या अंगणात पेत्र व योहान कसा प्रवेश मिळवतात?

▪ पेत्र व योहान अंगणात असताना घरात काय चालले आहे?

▪ कोंबडा किती वेळा आरवतो, आणि येशूची ओळख असल्याचे पेत्र कितीदा नाकारतो?

▪ पेत्र शाप उच्चारतो व शपथ घेतो याचा काय अर्थ आहे?

▪ येशूला ओळखत असल्याचे पेत्र कशामुळे नाकारतो?