व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनेक शिष्य येशूला सोडून जातात

अनेक शिष्य येशूला सोडून जातात

अध्याय ५५

अनेक शिष्य येशूला सोडून जातात

स्वर्गातून आलेल्या खऱ्‍या भाकरीच्या आपल्या भूमिकेबद्दल येशू कफर्णहूमातील एका सभास्थानात शिकवत आहे. गालील समुद्राच्या पूर्वेला लोकांनी, येशूने अद्‌भुतरित्या दिलेल्या भाकरी व मासळी खाल्ल्या होत्या. तेथून परतल्यावर त्यांना येशू सापडला तेव्हा झालेल्या चर्चेचा हा पुढील भाग असल्याचे उघड आहे.

आपले बोलणे पुढे चालू ठेवून तो म्हणतोः “जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” दोनच वर्षांपूर्वी इ. स. ३०च्या वसंत ऋतुमध्ये येशूने निकदेमाला सांगितले की, देवाने जगावर इतके प्रेम केले की, तारणारा या नात्याने त्याने आपला पुत्र दिला. अशा रितीने, तो लवकरच देणार असलेल्या बलिदानावर, मानवांमधील जो कोणी विश्‍वास ठेवून लाक्षणिकपणे त्याचे मांस खाईल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे आता येशू दाखवून देत आहे.

लोक मात्र येशूच्या म्हणण्यावर अडखळतात. ते विचारतातः “हा आपला देह आम्हाला खावयाला कसा देऊ शकतो?” त्याचे मांस खाणे लाक्षणिकपणे केले जाईल हे आपल्या श्रोत्यांना समजावे असे येशूला वाटते. याकरता, त्यावर अधिक जोर देण्यासाठी तो जे बोलतो ते शब्दशः घेतल्यास अधिकच आक्षेपार्ह आहे.

येशू म्हणतोः “तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्‍त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्‍त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्‍त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो.”

येशू येथे खरेच नरमांसभक्षण करण्यास सुचवत असता तर त्याची शिकवण अत्यंत आक्षेपार्ह वाटली असती. पण येशू शब्दशः मांस खाण्याचा व रक्‍त पिण्याचा पुरस्कार मुळीच करीत नसून सार्वकालिक जीवन प्राप्त करणाऱ्‍या सर्वांना, तो देणार असलेल्या बलिदानावर विश्‍वास ठेवावा लागेल यावरच केवळ जोर देत आहे. तो आपले सिद्ध शरीर अर्पण करील व आपले जीवनदायी रक्‍त ओतून टाकील त्यावेळी त्याचे हे बलिदान होणार होते. तरीही, त्याची ही शिकवण त्याचे अनेक शिष्यसुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न करीत नाही व ते आक्षेप घेऊन म्हणतातः “हे बोल धक्कादायक आहेत. हे कोणाच्याने ऐकवेल?”

आपले अनेक शिष्य कुरकुरत असल्याचे ओळखून येशू म्हणतोः “ह्‍यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर? . . . मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. तरी विश्‍वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहेत.”

येशू पुढे म्हणतोः “ह्‍याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” तेव्हा, अनेक शिष्य त्याला सोडतात व त्यानंतर कधीही त्याच्याबरोबर जात नाहीत. म्हणून येशू त्याच्या १२ प्रेषितांकडे वळतो व विचारतोः “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे का?”

पेत्र उत्तर देतोः “प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आणि आम्ही विश्‍वास ठेवला आहे व ओळखले आहे की, देवाचा पवित्र तो पुरुष आपणच आहा.” निष्ठेचे हे किती उत्तम प्रदर्शन! तेही, पेत्र व इतर प्रेषितांना या विषयावरील येशूची शिकवण कळलीही नसेल, तरी!

पेत्राच्या उत्तराने संतोष झाला असला तरी येशू म्हणतोः “तुम्हा बारा जणांस मी निवडून घेतले नाही काय? तरी तुम्हातील एक जण सैतान आहे.” तो यहुदा इस्कर्योतबद्दल बोलत आहे. या बेताला बहुधा येशूला यहुदामध्ये वाममार्गाची “सुरवात” किंवा प्रारंभ लक्षात आला असावा.

येशूला लोक राजा बनवण्याचा नुकताच प्रयत्न करीत होते, त्याला विरोध करून येशूने तो हाणून पाडला होता. या कारणामुळे, ‘मशीहाची रास्त भूमिका घेणार नसल्यास हा मशीहा असू शकेल काय?’ ही गोष्ट देखील लोकांच्या मनात ताजी असणार. योहान ६:५१-७१; ३:१६.

▪ येशू आपला देह कोणासाठी देतो व ते ‘त्याचा देह’ कसे ‘खातात’?

▪ येशूच्या पुढील कोणत्या शब्दांमुळे लोकांना धक्का बसतो पण तो कशावर जोर देत आहे?

▪ अनेक जण येशूला सोडून जातात तेव्हा पेत्राचा प्रतिसाद काय आहे?