व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आणखीन दर्शन

आणखीन दर्शन

अध्याय १२९

आणखीन दर्शन

शिष्यांची अंतःकरणे अजूनही जड झाली आहेत. रिकाम्या कबरेचा अर्थ अजूनही त्यांच्या ध्यानात येत नाही. तसेच, स्त्रियांच्या बातमीवरही ते विश्‍वास ठेवीत नाहीत. त्यामुळे, त्यानंतर, रविवारी, क्लयपा आणि दुसरा एक शिष्य, ११ किलोमीटर्सवरील अम्माऊस गावाला जाण्यासाठी यरुशलेम सोडतात.

वाटेवर, ते, दिवसभरच्या गोष्टींची चर्चा करीत असताना एक अनोळखी माणूस त्यांच्यात सामील होतो. तो विचारतोः “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहा, त्या कोणत्या?”

शिष्य उतरेलल्या चेहऱ्‍याने उभे राहतात. क्लयपा विचारतोः “अलिकडे यरुशलेमात घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?” तो माणूस विचारतोः “कसल्या गोष्टी?”

“नासरेथकर येशूविषयीच्या . . . त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्‍यांनी देहान्त शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले. परंतु इस्राएलाची मुक्‍ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती,” ते उत्तरतात.

क्लयपा व त्याचा सोबती, आश्‍चर्याने गुंग करणाऱ्‍या त्या दिवशीच्या घटना—स्वर्गदूतांचे अद्‌भूत दर्शन व रिकाम्या कबरेची बातमी—खुलासेवार सांगतात. पण त्यांचा काय अर्थ असावा याविषयी त्यांचा गोंधळही ते कबूल करतात. तो अनोळखी माणूस त्यांची खरडपट्टी काढीत म्हणतोः “अहो, निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्‍वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे हे अगत्य नव्हते काय?” मग, पवित्र शास्त्रातील ख्रिस्तासंबंधीच्या उताऱ्‍यांचा अर्थ तो त्यांना सांगतो.

शेवटी ते अम्माऊसला येतात आणि तो अनोळखी माणूस पुढे जाण्याचा देखावा करतो. परंतु अधिक ऐकण्याची इच्छा असल्यामुळे ते शिष्य आग्रह करतातः “आमच्याबरोबर राहा. कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” त्यामुळे तो भोजनासाठी थांबतो. तो प्रार्थना करून भाकरी मोडतो आणि त्यांना देतो तेव्हा तो, साकारलेल्या मानवी शरीरातील खरा येशूच असल्याचे ते ओळखतात. पण तेव्हा तो अंतर्धान पावतो.

त्या अनोळखी माणसाला इतके ज्ञान कसे होते ते आता त्यांच्या ध्यानात येते. “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” ते विचारतात. मग, विलंब न लावता ते उठतात आणि घाईने थेट यरुशलेमाला परत येतात. तेथे प्रेषित आणि त्यांच्यासोबत जमलेले लोक त्यांना सापडतात. क्लयपा आणि त्याचा सोबती काही सांगण्यापूर्वीच इतर, उत्तेजित होऊन सांगू लागतातः “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे.” मग, येशूने आपल्यालाही कसे दर्शन दिले हे ते दोघे सांगतात. असे एकूण चार वेळा, त्या दिवशी त्याने त्याच्या शिष्यांपैकी वेगवेगळ्या जणांना दर्शन दिले आहे.

अचानक येशू पाचव्या वेळेला दर्शन देतो. शिष्यांना यहुद्यांची भीती वाटत असल्यामुळे दारे बंद आहेत. तरीही येशू प्रवेश करतो आणि त्यांच्या मध्यभागी उभा राहून म्हणतोः “तुम्हास शांती असो.” आपण भूत पाहात आहोत अशा कल्पनेने ते गर्भगळीत होतात. पण, आपण भूत नसल्याचा खुलासा करीत येशू म्हणतोः “तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्‌भवतात? माझे हात व माझे पाय पाहा. मीच तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भूताला नसते.” तरीही ते विश्‍वास ठेवायला नाखूष आहेत.

तो खरोखरच येशू असल्याचे त्यांच्या ध्यानात येण्यास त्यांना मदत करण्यासाठी तो विचारतोः “तुम्हाजवळ खाण्यास काही आहे का?” त्यांनी दिलेला भाजलेला मासा खाल्ल्यावर, तो म्हणतोः “मी तुमच्याबरोबर असताना [मृत्युपूर्वी] तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्‍यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्‍यक आहे.”

येशू जणू वस्तुतः त्यांचा पवित्र शास्त्र अभ्यासच घेत आहे. त्यातच तो पुढे शिकवतोः “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्‍या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्‍या गोष्टींचे साक्षी आहात.”

रविवार संध्याकाळच्या या महत्त्वाच्या सभेला काही तरी कारणामुळे थोमा हजर नाही. त्यामुळे त्यानंतरच्या दिवसांमध्ये इतर त्याला आनंदाने सांगतातः “आम्ही प्रभूला पाहिले आहे!”

थोमा निषेध करतोः “त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्‍वास धरणारच नाही.”

आठ दिवसानंतर त्याचे शिष्य घरात गोळा झाले आहेत. यावेळी थोमाही त्यांच्याबरोबर आहे. दरवाजे बंद असले तरी पुन्हा एकदा येशू त्यांच्यामध्ये उभा राहतो व म्हणतोः “तुम्हास शांती असो.” मग, थोमाकडे वळून तो म्हणतोः “तू आपले बोट इकडे कर, व माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. आणि विश्‍वासहीन असू नको. तर विश्‍वास ठेवणारा ऐस.”

थोमा उद्‌गारतोः “माझा प्रभू व माझा देव!”

येशू म्हणतोः “तू मला पाहिले आहे म्हणून विश्‍वास ठेवला आहेस. पाहिल्यावाचून विश्‍वास ठेवणारे ते धन्य!” लूक २४:११, १३-४८; योहान २०:१९-२९.

▪ अम्माऊसच्या वाटेवर एक अनोळखी माणूस दोन शिष्यांपाशी काय विचारणा करतो?

▪ शिष्यांच्या अंतःकरणात उकळ्या फुटाव्या असे तो अनोळखी माणूस काय बोलतो?

▪ तो अनोळखी माणूस कोण हे शिष्य कसे जाणतात?

▪ क्लयपा आणि त्याचा सोबती यरुशलेमला परतल्यावर त्यांना कोणती उत्तेजक बातमी कळते?

▪ येशू आपल्या शिष्यांना पाचव्या वेळी कसे दर्शन देतो, आणि त्यावेळी काय घडते?

▪ येशूच्या पाचव्या दर्शनानंतर आठ दिवसांनी काय होते आणि येशू जिवंत असल्याबद्दल थोमाची खात्री शेवटी कशी पटते?