व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आरोप करणाऱ्‍यांना उत्तर

आरोप करणाऱ्‍यांना उत्तर

अध्याय ३०

आरोप करणाऱ्‍यांना उत्तर

यहुदी धर्मपुढारी शब्बाथ मोडल्याचा आरोप येशूवर करतात तेव्हा तो उत्तर देतोः “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे, आणि मीही काम करत आहे.”

परुश्‍यांनी तसा दावा केलेला असला तरी येशूने केलेले काम, शब्बाथाच्या नियमाने मनाई केलेल्या प्रकारचे नाही. प्रचाराचे व आजार बरे करण्याचे काम त्याला देवाकडून मिळालेले आहे व देवाचे उदाहरण अनुसरत तो ते दररोज करतो. परंतु त्याच्या उत्तरामुळे ते यहुदी आधीपेक्षा जास्तच संतापतात व त्याला मारण्याची खटपट करू लागतात. ते का बरे?

याचे कारण, येशू केवळ शब्बाथाचा भंग करतो असे त्यांना वाटत नसून, देवाचा वैयक्‍तीक पुत्र असल्याच्या त्याच्या दाव्यामुळे ईश्‍वराची निंदा होत आहे असेही ते समजतात. परंतु येशू निर्भय आहे व देवाशी असलेल्या त्याच्या अनुग्रहित नात्याबद्दल तो त्यांना आणखी सांगतो. तो म्हणतोः “पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो.”

येशू पुढे म्हणतोः “जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.” खरोखर, पुत्र यापूर्वीच आध्यात्मिकरित्या मेलेल्यांना जिवंत करत आहे! येशू म्हणतोः “जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले आहे त्याच्यावर विश्‍वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.” होय, तो पुढे म्हणतोः “मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे किंबहुना आता आलीच आहे.”

येशूने आतापर्यंत कोणाला खरोखर मेलेल्यातून उठवल्याची नोंद नसली तरी तो आपल्यावर आरोप करणाऱ्‍यांना सांगतो की, मेलेल्यांचे असे पुनरुत्थान खरोखर होईल. तो म्हणतोः “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका. कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व त्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.”

आतापर्यंत येशूने देवाच्या उद्देशातील आपल्या महत्त्वाच्या भूमिकेचे वर्णन जाहीरपणे इतक्या स्पष्ट व असंदिग्धपणे केलेले नाही हे उघड आहे. परंतु या गोष्टींबद्दल येशूवर आरोप करणाऱ्‍यांजवळ, त्याच्या स्वतःच्या साक्षीपेक्षा अधिक पुरावा आहे. येशू त्यांना आठवण करून देतोः “तुम्ही योहानाकडे [माणसे] पाठवून विचारणा केली व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे.”

फक्‍त दोनच वर्षांपूर्वी बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने या यहुदी धर्मपुढाऱ्‍यांना, त्याच्या मागून येणाऱ्‍याबद्दल सांगितले होते. आता बंदिवान झालेल्या योहानाबद्दल त्यांना एकेकाळी वाटणाऱ्‍या आदराची आठवण देऊन येशू म्हणतोः “तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला.” त्यांना मदत करण्याच्या, एवढेच नव्हे तर तारण्याच्या आशेने येशू त्यांना या गोष्टीची आठवण करून देतो. परंतु तो योहानाच्या साक्षीवर विसंबून राहात नाही.

“जी कार्ये [यात नुकत्याच केलेल्या चमत्काराचा समावेश आहे,] मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.” परंतु याशिवाय येशू पुढे म्हणतोः “ज्या पित्याने मला पाठवले आहे त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे.” उदाहरणार्थ, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे,” असे म्हणून येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी देवाने त्याच्याबद्दल साक्ष दिली.

खरे तर, त्याच्यावर आरोप करणाऱ्‍यांना त्याचा धिक्कार करण्यास कोणतीच सबब नाही. ज्या शास्त्र वचनांचा अभ्यास करण्याचा दावा ते करत होते तीच त्याच्याबद्दल साक्ष देतात! शेवटी येशू म्हणतोः “तुम्ही मोशेवर विश्‍वास ठेवला असता तर माझ्यावर विश्‍वास ठेवला असता. कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्‍वास ठेवत नाही तर माझ्या वचनांवर विश्‍वास कसा ठेवाल?” योहान ५:१७-४७; १:१९-२७; मत्तय ३:१७.

▪ येशूच्या कामाने शब्बाथ का मोडत नाही?

▪ देवाच्या उद्देशातील आपल्या महत्त्वाच्या भूमिकेचे वर्णन येशू कसे करतो?

▪ आपण देवाचे पुत्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी येशू कोणाच्या साक्षींकडे निर्देश करतो?