व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका परुशाबरोबर जेवणे

एका परुशाबरोबर जेवणे

अध्याय ७६

एका परुशाबरोबर जेवणे

मुक्या माणसाला बरे करण्याच्या सामर्थ्याच्या स्रोताबद्दल प्रश्‍न करणाऱ्‍या टिकाकारांना येशूने उत्तर दिल्यावर, एक परुशी त्याला जेवणाचे आमंत्रण देतो. जेवणापूर्वी ते परुशी कोपरापासून हात धुण्याचा विधी पार पाडतात. असे ते जेवणाच्या आधी, नंतर व दोन पदार्थ खाण्याच्या मध्येही करतात. या रिवाजाने देवाच्या नियमाचा भंग होत नसला तरी शिष्टाचाराला साजेशा स्वच्छतेच्या बाबतीत देवाच्या अपेक्षेपलिकडे ते जाते.

येशू ती परंपरा पाळण्यात उणा पडल्यावर त्याच्या यजमानाला आश्‍चर्य वाटते. त्याचे आश्‍चर्य शब्दात व्यक्‍त झालेले नसले तरी येशूला ते कळते व तो म्हणतोः “तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा यांनी भरला आहे. अहो, निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला त्याने अंतर्भागही केला नाही काय?”

अशा रितीने, विधीनुसार हात धुणाऱ्‍या पण हृदयातील दुष्टता धुऊन टाकण्यात उणे पडणाऱ्‍या परुशांचा ढोंगीपणा येशू उघड करतो. तो सल्ला देतोः “जे आत आहे त्यांचा दानधर्म करा म्हणजे पहा, सर्व तुम्हास शुद्ध आहे.” त्यांची दाने प्रेमळ हृदयाने प्रवृत्त झालेली असावीत, नीतीमत्वाच्या खोट्या प्रदर्शनाने इतरांवर छाप टाकण्याच्या इच्छेने नव्हे.

येशू पुढे म्हणतोः “तुम्हा परुशांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्‍यांचा दशमांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्‍यांकडे दुर्लक्ष करता. ह्‍या गोष्टी करावयाच्या होत्या व त्या सोडावयाच्या नव्हत्या.” इस्राएलांना दिलेल्या देवाच्या नियमशास्त्रानुसार शेतातील उपजाचा दशमांश देण्याचे बंधन होते. पुदिना व सतापही अन्‍नाला सुवास देण्यासाठी वापरली जाणारी लहान झाडे व झुडुपे आहेत. या नगण्या वनस्पतींचाही दशमांश ते परुशी मोठ्या काटेकोरपणे देतात. पण प्रेम दाखवणे, दया करणे व नम्र असणे या अधिक महत्त्वाच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्याबद्दल येशू त्यांना दोषी ठरवतो.

त्यांना अधिक दोष देत येशू म्हणतोः “तुम्हा परुशांची केवढी दुर्दशा होणार! कारण सभास्थानात श्रेष्ठ आसने व बाजारात नमस्कार घेणे तुम्हास आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणाऱ्‍या कबरांसारखे आहा, त्यांच्यावरुन माणसे न समजता चालतात.” त्यांची अस्वच्छता उघड दिसून येत नाही. परुशांच्या धर्माला बाहेरचा बडेजाव आहे. परंतु आंतरिक गुणवत्ता नाही! तो ढोंगावर आधारलेला आहे.

असे दोषारोप ऐकून देवाच्या नियमात पारंगत असलेला एक शास्त्री म्हणतोः “गुरुजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.”

“तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार! कारण वाहावयास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता, आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यांस लावीत नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले!” असे म्हणून या शास्त्र्याच्या विशेषज्ञानांही येशू जबाबदार धरतो.

येशूने उल्लेख केलेली ओझी म्हणजे तोंडी परंपरा होत. पण लोकांना सुसह्‍य व्हावे म्हणून हे शास्त्री त्यातील एक लहानशी परंपराही कमी करणार नाहीत. येशू प्रकट करतो की, ते संदेष्ट्यांच्या खुनालाही संमती देतात. तो इशारा देतोः “‘जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्‍त, म्हणजे हाबेलाच्या रक्‍तापासून वेदी व पवित्रस्थान ह्‍यांच्यामध्ये ज्या जखऱ्‍याचा घात झाला, त्याच्या रक्‍तापर्यंत जे रक्‍त पाडले गेले त्याचा हिशेब ह्‍या पिढीपासून घेतला [जाईल], होय, मी तुम्हास सांगतो, त्याचा हिशेब ह्‍या पिढीपासून घेतला जाईलच.”

पापापासून मुक्‍त करण्यायोग्य मानवांच्या जगाची सुरवात आदाम व हव्वेच्या मुलांच्या जन्मापासून झाली. या कारणास्तव, हाबेल “जगाच्या स्थापने”च्या काळी होता. जखऱ्‍याच्या निर्घृण हत्त्येनंतर सुरियाच्या फौजेने यहुदाला लुटले. पण अधिक दुष्टपणामुळे त्याची पिढी अधिक लुटली जाण्याबद्दल येशू भविष्य वर्तवतो. साधारण ३८ वर्षानंतर इ. स. ७० मध्ये ही लूट घडते.

दोषारोप करीत येशू पुढे म्हणतोः “तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यांस तुम्ही प्रतिबंध केला.” अर्थाची फोड करून देवाचे वचन लोकांना समजावून सांगणे हे या शास्त्र्यांचे कर्तव्य आहे. पण ते यात उणे पडतात व समजण्याची संधीही ते लोकांपासून काढून घेतात.

त्यांचे पितळ उघडे केल्याबद्दल परुशी व शास्त्री येशूवर संतापतात. तो ते घर सोडून जात असताना ते त्याचा कडाडून विरोध करू लागतात व त्याच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करतात. त्याला अटक करता येईल असे काही बोलण्यात त्याला धरण्याचा ते प्रयत्न करतात. लूक ११:३७-५४; अनुवाद १४:२२; मीखा ६:८; २ इतिहास २४:२०-२५.

▪ येशू परुशी व शास्त्र्यांना दोष का देतो?

▪ ते शास्त्री, लोकांवर कसली ओझी लादतात?

▪ ‘जगाची स्थापना’ कधी झाली?