व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका महत्त्वाच्या दिवसाची सुरवात

एका महत्त्वाच्या दिवसाची सुरवात

अध्याय १०५

एका महत्त्वाच्या दिवसाची सुरवात

सोमवारी संध्याकाळी यरुशलेम सोडल्यावर येशू, जैतुनाच्या डोंगराच्या पूर्वेकडील उतारावर असलेल्या बेथानीला परत येतो. यरुशलेममधील त्याच्या शेवटच्या सेवाकार्याचे दोन दिवस पूर्ण झाले आहेत. येशू पुन्हा ती रात्र लाजर या त्याच्या मित्रासोबत घालवतो यात शंका नाही. यरीहोहून शुक्रवारी आल्यापासून बेथानीमध्ये घालवलेली ही चौथी रात्र आहे.

आता मंगळवार, निसान ११च्या भल्या पहाटेस तो पुन्हा मार्गाला लागला आहे. येशूच्या सेवाकार्यातील हा एक महत्त्वाचा दिवस ठरतो. तो सर्वात जास्त कामाचा दिवस आहे. मंदिरात येण्याचा हा त्याचा शेवटचा दिवस आहे; आणि त्याचा खटला व देहदंड यापूर्वीचा त्याच्या जाहीर सेवाकार्याचा तो अखेरचा दिवस आहे.

येशू व त्याचे शिष्य यरुशलेमाकडे जाणारा जैतुनाच्या डोंगरावरून गेलेला तोच मार्ग घेतात. बेथानीहून त्या रस्त्यावर निघाल्यानंतर, आदल्या दिवशी येशूने शाप दिलेल्या झाडाकडे पेत्राचे लक्ष जाते. तो उद्‌गारतोः “गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे, पहा.”

परंतु येशूने झाडाला का मारले? “मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठायी विश्‍वास असला व तुम्ही संशय धरिला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल,” असे तो म्हणतो. पुढे तो सांगतोः “इतकेच नाही तर, ह्‍या डोंगरालाही [ज्यावर ते उभे आहेत तो जैतुनाचा डोंगर] ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्‍वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल.”

तेव्हा, झाडाला वाळायला लावून, देवावर विश्‍वास असण्याच्या गरजेबद्दल उदाहरण घालून देऊन येशू आपल्या शिष्यांना धडा देत आहे. तो म्हणतो तसे “तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्‍वास धरा म्हणजे ते तुम्हाला मिळेल.” विशेषतः लवकरच येऊ घातलेल्या परिक्षा लक्षात घेता हा धडा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे! परंतु झाडाचे वाळणे व विश्‍वासाचा गुण यांचा आणखी एक संबंध आहे.

या अंजिराच्या झाडाप्रमाणे इस्राएल राष्ट्राचे बाह्‌य-स्वरुप फसवे आहे. ते राष्ट्र देवाशी कराराने बांधले असले व अनेक जण देवाचे नियम पाळत असल्यासारखे वरून दिसत असले तरी ते अविश्‍वासू शाबीत झालेले असून त्यात उत्तम कामांच्या फळांचा अभाव आहे. विश्‍वासात उणे पडल्याने ते देवाच्या पुत्राचा अव्हेर करण्याच्या पंथास आहेत! त्यामुळे उपज न देणाऱ्‍या त्या झाडाला वाळायला लावून या निष्फळ व अविश्‍वासू राष्ट्राच्या शेवटल्या दशेचे हुबेहुब चित्र येशूने रंगवले आहे.

त्यानंतर लवकरच येशू व त्याचे शिष्य यरुशलेममध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या परिपाठाप्रमाणे ते मंदिरात जातात. तेथे येशू शिकवू लागतो. आदल्या दिवशी सराफांविरुद्ध येशूने केलेली कारवाई प्रमुख याजक व वडीलवर्गाच्या मनात निश्‍चितच असावी. कारण ते त्याला आव्हान करतातः “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?”

उत्तरादाखल येशू म्हणतोः “मीही तुम्हास एक गोष्ट विचारतो, ती मला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते मीही तुम्हास सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसांपासून?”

याजक व वडीलजन, त्याला कसे उत्तर द्यावे याविषयी आपसात विचार करू लागतात. “‘स्वर्गापासून’ म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेविला नाही?’ बरे, ‘माणसांपासून’ म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते. कारण सर्व योहानाला संदेष्टा मानतात.”

काय उत्तर द्यावे ते या नेत्यांना कळत नाही. म्हणून ते येशूला उत्तर देतातः “आम्हाला ठाऊक नाही.”

त्यामुळे येशूही म्हणतोः “तर मग, कोणत्या अधिकाराने मी हे करीत आहे ते मीही तुम्हास सांगत नाही.” मत्तय २१:१९-२७; मार्क ११:१९-३३; लूक २०:१-८.

▪ मंगळवार, निसान ११ चे महत्त्व काय आहे?

▪ अंजिराच्या झाडाला वाळायला लावून येशू कोणते धडे देतो?

▪ तो कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो असे विचारणाऱ्‍यांना येशू कसे उत्तर देतो?