व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका वादाचा उद्रेक होतो

एका वादाचा उद्रेक होतो

अध्याय ११५

एका वादाचा उद्रेक होतो

प्रेषितांचे पाय धुवून येशूने सायंकाळच्या सुरवातीला नम्र सेवेचा एक सुंदर धडा शिकवला. त्यानंतर त्याने आपल्या येणाऱ्‍या मृत्युच्या स्मारकविधीची सुरवात केली. आता, नुकत्याच झालेल्या घटना लक्षात घेता, एक आश्‍चर्यजनक गोष्ट घडते. त्याचे प्रेषित, त्यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे असे दिसते यावरच्या गरमागरम वादात पडतात! असे दिसते की, हा एका जुन्या वादाचा भाग आहे.

डोंगरावर येशूचे रुपांतर झाल्यानंतर त्यात कोण श्रेष्ठ आहे याबद्दल प्रेषितांनी वाद घातला होता याची आठवण करा. त्याशिवाय याकोब व योहानाने राज्यामध्ये महत्त्वाच्या जागांसाठी मागणी केल्याने प्रेषितांमध्ये आणखी भांडण झाले होते. आता, त्यांच्या बरोबरच्या त्याच्या शेवटल्या रात्री, त्यांना पुन्हा कुरकुर करताना पाहून येशूला किती दुःख झाले असावे! तो काय करतो?

प्रेषितांना त्यांच्या वागणुकीसाठी रागावण्याऐवजी, येशू पुन्हा शांतपणे त्यांची समजूत घालतो. तो म्हणतोः “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवितात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात. परंतु तुम्ही तसे नसावे. . . . मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही?” मग, आपल्या उदाहरणाची त्यांना आठवण करून देऊन तो म्हणतोः “मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्‍यासारखा आहे.”

प्रेषित अपूर्ण असले तरी येशूसोबत त्याच्या परिक्षांमध्ये टिकून राहिले आहेत, यासाठीच तो त्यांना म्हणतोः “जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो.” येशू व त्याच्या अनुयायांमधील हा वैयक्‍तिक करार, त्याच्या राज्यसत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना त्याच्याशी एकत्र जोडतो. राज्यासाठी केलेल्या या करारात शेवटी केवळ १,४४,००० इतक्या मर्यादित संख्येचे लोकच घेतले जातील.

ख्रिस्तासह राज्यशासनात सहभागी होण्याचे अद्‌भुत भवितव्य प्रेषितांपुढे असले तरी सध्या ते आध्यात्मिकरित्या दुर्बळ आहेत. येशू म्हणतोः “तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल.” परंतु पेत्रासाठी त्याने प्रार्थना केली आहे असे त्याला सांगून येशू उत्तेजन देतोः “तू वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”

येशू पुढे म्हणतोः “मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल. आणि जसे मी यहुद्यांना सांगितले की, जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येणार नाही तसे तुम्हासही आता सांगतो. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.”

पेत्र विचारतोः “प्रभुजी, आपण कोठे जाता?”

त्यावर येशू सांगतोः “मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्यामागे येता येणार नाही. पण तू नंतर येशील.”

“प्रभुजी, मला आपल्यामागे आत्ताच का येता येणार नाही?” हे पेत्राला जाणून घेण्याची इच्छा आहे. तो म्हणतोः “आपल्यासाठी मी माझा प्राण देईन.”

येशू विचारतोः “माझ्यासाठी तू आपला प्राण देशील?” मग, तो म्हणतोः “मी तुला खचित खचित सांगतो, आज म्हणजे याच रात्री कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकरशील.”

पेत्र निषेधाने म्हणतोः “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही.” आणि इतर प्रेषित तेच म्हणत असताना पेत्र बढाई मारतोः “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.”

पैसे व शिदोरीविना त्याने प्रेषितांना गालीलात प्रचाराच्या दौऱ्‍यावर पाठवले त्या वेळेचा उल्लेख करीत येशू विचारतोः “तेव्हा तुम्हाला काही उणे पडले का?”

“नाही,” असे ते म्हणतात.

आता तो म्हणतोः “पण आता तर ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी तसेच झोळीही घ्यावी आणि ज्याच्याजवळ तरवार नाही त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी. मी तुम्हास सांगतो, अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”

येशू, दुष्कर्मी वा कुकर्मी लोकांबरोबर खिळला जाईल अशा काळाचा तो निर्देश करीत आहे. तसेच, त्यानंतर त्याच्या अनुयायांना अतिशय छळाला तोंड द्यावे लागेल असेही तो सुचवत आहे. ते म्हणतातः “प्रभुजी, पहा, येथे दोन तरवारी आहेत.”

तो म्हणतोः “पुरे.” त्या तरवारींमुळे येशूला आणखी एक महत्त्वाचा धडा शिकवता येईल असे आपल्याला दिसून येईल. मत्तय २६:३१-३५; मार्क १४:२७-३१; लूक २२:२४-३८; योहान १३:३१-३८; प्रकटीरकण १४:१-३.

▪ प्रेषितांचा वाद इतका आश्‍चर्यजनक का आहे?

▪ येशू तो तंटा कसा हाताळतो?

▪ येशूने त्याच्या शिष्यांशी केलेल्या कराराने काय सिद्ध होते?

▪ येशू कोणती नवी आज्ञा देतो आणि तिचे महत्त्व किती आहे?

▪ पेत्र कोणता फाजिल आत्मविश्‍वास प्रकट करतो आणि येशू काय म्हणतो?

▪ पैशाची पिशवी व शिदोरीची झोळी नेण्याबद्दल येशूने दिलेल्या सूचना आधी दिलेल्या सूचनांपेक्षा वेगळ्या का आहेत?