व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका शोमरोनी स्त्रीला शिकवणे

एका शोमरोनी स्त्रीला शिकवणे

अध्याय १९

एका शोमरोनी स्त्रीला शिकवणे

यहूदीयाहून गालीलकडे प्रवास करत असताना येशू व त्याचे शिष्य शोमरोन प्रांतातून जातात. प्रवासाने थकल्यामुळे, मध्यान्हाच्या सुमाराला, सुखार नावाच्या गावाजवळच्या एका विहीरीपाशी, ते विश्रांतीसाठी थांबतात. कित्येक शतकांपूर्वी याकोबाने ती खोदली होती व आजही आधुनिक युगातल्या नाब्लूस शहराजवळ ती अस्तित्वात आहे.

येशू तेथे विश्रांती घेत असता त्याचे शिष्य अन्‍न विकत घेण्यासाठी गावात जातात. एक शोमरोनी स्त्री पाणी काढण्यासाठी तेथे येते तेव्हा तो तिला विनंती करतोः “मला प्यावयाला पाणी दे.”

खोल रुजलेल्या दूषित पूर्वग्रहांमुळे यहुदी व शोमरोनी यांच्यात परस्पर व्यवहार होत नसे. त्यामुळे ती स्त्री आश्‍चर्यचकित होऊन विचारतेः “आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता, हे कसे?”

येशू उत्तर देतोः “‘मला प्यावयाला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ पाणी मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”

यावर ती म्हणतेः “महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब ह्‍याने ही विहीर आम्हास दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात का?”

येशू उत्तर देतोः “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.”

ती स्त्री ही प्रतिक्रिया दाखवतेः “महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.”

आता येशू तिला म्हणतोः “तू जाऊन आपल्या नवऱ्‍याला बोलावून आण.”

ती म्हणतेः “मला नवरा नाही.”

येशू तिच्या विधानाची सत्यता पटवतो. “‘मला नवरा नाही,’ हे ठीक बोललीस. कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही.”

ती स्त्री आश्‍चर्याने म्हणतेः “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.” आपली आध्यात्मिक आस्था प्रकट करत तिने म्हटले की, शोमरोन लोकांनी “याच डोंगरावर [जवळपास असलेला गरिज्जीम डोंगर] उपासना केली आणि तुम्ही [यहुदी] म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमात आहे.”

परंतु येशू निदर्शनास आणून देतो की, उपासनेच्या स्थानाला महत्त्व नाही. तो म्हणतोः “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. . . . कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे, आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”

त्या स्त्रीवर याचा अतिशय प्रभाव पडतो. ती म्हणतेः “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सर्व गोष्टी सांगेल.”

येशू तिला सांगतोः “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी, तोच आहे.” विचार करा! कदाचित तिच्या जीवनाच्या वाईट मार्गामुळे तिचा तिरस्कार करणाऱ्‍या, गावातील स्त्रियांना टाळण्यासाठी मध्यान्हाला पाणी काढायला आलेल्या या स्त्रीला येशूने कशी कृपा दाखवली. कोणाही समोर उघडपणे कबूल न केलेली गोष्ट तो तिला सरळसरळ सांगतो. याचा परिणाम काय होतो?

अनेक शोमरोनी विश्‍वास ठेवतात

सुखारहून अन्‍न घेऊन परतल्यावर शिष्यांना येशू याकोबाच्या विहीरीपाशी, जेथे त्यांनी त्याला सोडले होते तेथेच, आता एका शोमरोन स्त्रीशी बोलत असलेला दिसला. शिष्य येतात तेव्हा ती आपली घागर तेथेच सोडून गावाकडे जाते.

येशूने तिला सांगितलेल्या गोष्टींबद्दल तिला अतिशय आस्था असल्याने गावातल्या लोकांना ती सांगतेः “चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा.” आणि जिज्ञासा उत्पन्‍न होईल अशा रितीने ती विचारतेः “तोच ख्रिस्त असेल काय?” त्या प्रश्‍नाने ध्येय साध्य होते—लोक स्वतः त्याला पाहण्यासाठी जातात.

दरम्यान, शिष्य, गावातून आणलेले अन्‍न खाण्यासाठी येशूला आग्रह करतात. पण तो उत्तर देतोः “तुम्हाला ठाऊक नाही असे अन्‍न माझ्याजवळ खायला आहे.”

तेव्हा शिष्य एकमेकांना विचारतातः “ह्‍याला कोणी खावयास आणले असेल काय?” येशू स्पष्टीकरण देतोः “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्‍न आहे. अजून चार महिन्यांचा अवकाश आहे मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही?” परंतु आध्यात्मिक कापणीचा निर्देश करून येशू म्हणतोः “आपली नजर वर टाकून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करतो. ह्‍यासाठी की, पेरणाऱ्‍याने व कापणाऱ्‍याने एकत्र आनंद करावा.”

कदाचित, शोमरोनी स्त्रीशी झालेल्या भेटीचे उत्तम परिणाम त्याला आत्ताच दिसू लागले असावेत—की तिच्या बोलण्यामुळे अनेक लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवत आहेत. “मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले” असे म्हणून ती गावकऱ्‍यांना साक्ष देत आहे. त्यामुळे सुखारचे लोक विहिरीपाशी त्याच्याकडे येतात तेव्हा ते त्याला तेथे राहण्याची व त्यांच्याशी अधिक बोलण्याची विनंती करतात. येशू त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करतो व तेथे दोन दिवस राहतो.

शोमरोनी लोक येशूचे बोलणे ऐकतात तेव्हा आणखी अनेकजण विश्‍वास ठेवतात. ते त्या स्त्रीला म्हणतातः “आता तुझ्या बोलण्यावरुनच आम्ही विश्‍वास धरतो असे नाही. कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे.” श्रोत्यांनी अधिक शोध करावा म्हणून जिज्ञासा जागृत करून येशूबद्दल आपण कशी साक्ष देऊ शकतो याचे उत्तम उदाहरण त्या शोमरोनी स्त्रीने नक्कीच घालून दिले आहे!

कापणीला अजून चार महिने अवकाश असल्याची आठवण करा—ही कापणी पॅलेस्टाईनमध्ये वसंत ऋतुमध्ये होणाऱ्‍या सातूची आहे. म्हणजेच आता नोव्हेंबर अथवा डिसेंबर आहे. याचा अर्थ इ. स. ३०च्या वल्हांडणानंतर येशू व त्याच्या शिष्यांनी यहूदीयात शिक्षण देत व बाप्तिस्मा करत सुमारे आठ महिने घालवले. आता ते गालीलला आपल्या प्रांतात जाण्यासाठी निघतात. तेथे त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले आहे? योहान ४:३-४३.

▪ येशू शोमरोनी स्त्रीशी बोलला याचे तिला का आश्‍चर्य वाटले?

▪ जिवंत पाणी व उपासना कोठे करावी याविषयी येशू तिला काय शिकवतो?

▪ येशू तिला आपण कोण आहोत ते कसे प्रकट करतो व हा गौप्यस्फोट आश्‍चर्यजनक का आहे?

▪ ती शोमरोनी स्त्री काय साक्ष देते व त्याचा परिणाम काय होतो?

▪ येशूच्या अन्‍नाचा कापणीशी कसा संबंध आहे?

▪ इ. स. ३० च्या वल्हांडण सणानंतर येशूच्या यहूदीयातील सेवाकार्याचा काळ आपण कसा ठरवू शकतो?