व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक असंभवनीय शिष्य

एक असंभवनीय शिष्य

अध्याय ४५

एक असंभवनीय शिष्य

येशू किनाऱ्‍यावर उतरतो तेव्हा किती भयानक दृश्‍य दिसते! जवळच्याच कबरस्तानातून दोन अक्राळविक्राळ माणसे बाहेर येतात व त्याच्याकडे धावतात. त्यांना भूतांनी झपाटलेले आहे. त्यातील एक दुसऱ्‍यापेक्षा अधिक हिंसक आहे व त्याने भूतांच्या तावडीत सापडून अधिक काळ यातना सहन केल्या आहेत त्यामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष जाते.

हा सहानुभूति येण्याजोगा माणूस बऱ्‍याच काळापासून कबरांमध्ये नग्नावस्थेत राहात आहे. तो रात्रंदिवस सतत ओरडत असतो व दगडांनी स्वतःला जखमा करून घेतो. तो इतका हिंसक आहे की, त्या वाटेने जाण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. त्याला बांधण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत, पण तो साखळ्या तोडतो व पायाच्या बेड्या मोडतो. त्याला काबूत ठेवण्याइतके सामर्थ्य कोणापाशीही नाही.

तो माणूस येशूकडे येऊन त्याच्या पायावर पडत असताना त्याला तावडीत ठेवणारी भूते त्याला ओरडायला लावतातः “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.”

येशू म्हणत असतोः “अरे, अशुद्ध आत्म्या, ह्‍या माणसातून नीघ.” पण मग, येशू विचारतोः “तुझे नाव काय?”

उत्तर येतेः “माझे नाव सैन्य; कारण आम्ही पुष्कळ आहोत.” भूते ज्यांच्यावर जम बसवू शकतात त्यांचे क्लेश पाहून त्यांना आनंद होतो. भित्रटासारखे, एखाद्यावर जमावाने तुटून पडण्यात त्यांना मजा वाटते असे दिसते. पण येशूबरोबर गाठ पडल्यावर, अगाधकूपात पाठवले न जाण्याबद्दल ते विनवण्या करतात. येशूजवळ प्रचंड शक्‍ती होती असे आपल्याला पुन्हा दिसून येते. तो दुष्ट भूतांवर देखील विजय मिळवू शकत होता. दियाबल सैतान या त्यांच्या नेत्यासह शेवटी त्यांना अगाधकूपात टाकण्याचा देवाचा त्यांच्या संबंधीचा निर्णय भूतांना माहीत असल्याचे देखील यातून दिसून येते.

शेजारच्या डोंगरावर जवळपास २,००० डुकरांचा कळप चरत आहे. म्हणून ती भूते म्हणतातः “आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.” सदेह प्राण्यांच्या शरीरात शिरण्याने दुरात्म्यांना अनैसर्गिक व विकृत आनंद मिळतो हे उघड आहे. येशू त्यांना डुकरांमध्ये शिरण्याची परवानगी देतो तेव्हा ती सर्व २,००० डुकरे धावत जाऊन कड्यावरुन समुद्रात पडून बुडून मरतात.

डुकरे राखणारे हे पाहतात तेव्हा ही बातमी सांगण्यासाठी ते शहराकडे व शेतामळ्यांकडे धावतात. तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक येतात. ते आल्यावर, ज्याच्यामधून ती भूते बाहेर निघाली तो माणूस त्यांना दिसतो. तो तर कपडे घातलेला, शुद्धीवर आलेला येशूच्या पायाजवळ बसला आहे!

घटना डोळ्यांनी बघणारे तो माणूस कसा बरा झाला हे सांगतात. तसेच डुकरांच्या विलक्षण मृत्युबद्दलही लोकांना सांगतात. या गोष्टी ऐकल्यावर लोकांना भीती वाटते व ते येशूला त्यांच्या प्रांतातून निघून जाण्याचा आग्रह करु लागतात. त्यांची विनंती मान्य करून तो नावेत चढतो. आधी भूताने झपाटलेला माणूस सोबत येऊ देण्याबद्दल येशूला विनवतो. परंतु येशू त्याला सांगतोः “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. यहोवाने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”

आधी बरे केलेल्या लोकांनी कोणालाही त्याबद्दल सांगू नये अशी सूचना येशू सर्वसाधारणपणे त्यांना देतो. यात हेतू हा होता की, लोकांनी खळबळजनक बातम्यांनी निर्णय घेऊ नये असे येशूला वाटत असते. तथापि, आता येशूला बहुधा ज्या लोकापर्यंत पाहोचण्याची संधी मिळणार नाही त्यांना हा आधीचा भूतग्रस्त माणूस साक्ष देऊ शकणार होता. या कारणास्तव, हा अपवाद उचित आहे. याशिवाय, त्या माणसाची उपस्थिती, चांगली कामे करण्याच्या येशूच्या सामर्थ्याबद्दल पुरावा देईल, आणि डुकरे गमावल्यामुळे, पसरण्याची शक्यता असलेल्या प्रतिकूल बातम्यांचे निराकरण करील.

येशूच्या सूचनेप्रमाणे, पूर्वीचा भूतग्रस्त माणूस निघून जातो. येशूने त्याच्यासाठी केलेल्या सर्व कामांबद्दल तो दकापलीसमध्ये सर्व सांगू लागतो व लोक आश्‍चर्याने थक्क होतात. मत्तय ८:२८-३४; मार्क ५:१-२०; लूक ८:२६-३९; प्रकटीकरण २०:१-३.

▪ दोन भूतग्रस्त माणसे उपस्थित असताना त्यातील एकावरच लक्ष केंद्रित होण्याचे कारण कदाचित काय आहे?

▪ भविष्यकाळी अगाधकूपात टाकले जाण्याबद्दल भूतांना माहिती असल्याचे कशावरुन दिसून येते?

▪ माणसे व प्राण्यांना पछाडणे भूतांना आवडते याचे सकृतदर्शनी कारण काय असावे?

▪ आधीच्या भूतग्रस्त माणसासाठी येशूने केलेल्या गोष्टी त्याने इतरांना सांगण्याची सूचना देऊन येशू हा अपवाद का करतो?