व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक राष्ट्र गमावले, पण सर्वस्व नव्हे

एक राष्ट्र गमावले, पण सर्वस्व नव्हे

अध्याय ७९

एक राष्ट्र गमावले, पण सर्वस्व नव्हे

एका परुशाच्या घराबाहेर जमलेल्या लोकांसोबत येशूची चर्चा झाल्यावर काही वेळातच, “ज्या गालीलकरांचे रक्‍त [रोमी अधिकारी पंतय] पिलाताने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी” काही लोक त्याला सांगतात. यरुशलेमात पाणी आणण्यासाठी एक जलवाहिनी बांधण्यासाठी मंदिराच्या तिजोरीतील पैसे पिलाताने वापरल्याबद्दल हजारो यहुद्यांनी निषेध केला असताना मारले गेलेले लोक म्हणजे कदाचित हे गालीलकर आहेत. स्वतःच्या दुष्कृत्यांमुळे त्या गालीलकरांना हे संकट भोगावे लागले असे ही गोष्ट येशूला सांगणारे सुचवत असावेत.

परंतु, “ह्‍या गालीलकरांनी असे दुःख भोगले ह्‍यावरुन बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हास वाटते काय?” असे विचारुन येशू त्यांची चूक सुधारतो. तो उत्तरही देतोः “[मुळीच] नव्हते.” मग, यहुद्यांना सावधगिरीचा इशारा देण्यासाठी त्या घटनेचा उपयोग तो करतो व म्हणतोः “जर तुम्ही पश्‍चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”

पुढे बोलत असताना येशू आणखी एका स्थानिक दुर्घटनेची आठवण करतो. तीही कदाचित त्या जलवाहिनीच्या बांधकामाशी संबंधित असावी. तो विचारतोः “ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमात राहणाऱ्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय?” येशू म्हणतो की, त्यांच्या वाईटपणामुळे ते मरण पावले नाहीत. तर बहुधा अशा दुर्घटनांना “समय व प्रसंग” कारणीभूत असतात. (पंडिता रमाबाई भाषांतर) परंतु येशू पुन्हा एकदा इशारा देण्यासाठी त्या घटनेचा वापर करतो व म्हणतोः “पण जर तुम्ही पश्‍चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”

यापुढे येशू एक अगदी चपलख दाखला देतो व स्पष्टीकरण करतोः “कोणाएकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला. परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, ‘पहा, गेली तीन वर्षे मी ह्‍या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे. परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’ तेव्हा त्याने त्याला उत्तर दिलेः ‘महाराज, एवढे वर्ष असू द्या. म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन. मग, त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.’”

यहुदी राष्ट्रामध्ये विश्‍वास उत्पन्‍न करण्याचा येशूने तीन वर्षांहून अधिक काळ प्रयत्न केला आहे. पण त्याच्या कष्टाचे फळ म्हणून काही शेकड्यातच त्याचे शिष्य मोजता येतात. आता त्याच्या सेवाकार्याच्या चौथ्या वर्षी, यहूदीया व पेरियामध्ये आवेशाने प्रचार करून व शिकवण देऊन तो लाक्षणिकरित्या यहुदी अंजिर वृक्षाभोवती खणत व खत घालत, कसोशीने प्रयत्न करीत आहे. परंतु सर्व निष्फळ! ते राष्ट्र पश्‍चाताप करायला तयार नाही व म्हणून नाशाला पात्र आहे. त्या राष्ट्रातील केवळ थोडे शेष प्रतिसाद देतात.

यानंतर लवकरच एका शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवत आहे. तेथे, भूत लागल्याने अठरा वर्षांपासून वाकलेली एक स्त्री त्याला दिसते. येशू दयेने तिच्याशी बोलतोः “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्‍त झाली आहेस.” तेव्हा तो तिच्यावर हात ठेवतो आणि तत्क्षणी ती सरळ होते व देवाचा महिमा वर्णू लागते.

सभास्थानाच्या अधिकाऱ्‍याला मात्र संताप येतो. तो निषेधाने म्हणतोः “ज्यात काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत. तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा. शब्बाथ दिवशी येऊ नका.” अशा रितीने बरे करण्याचे येशूचे सामर्थ्य तो मान्य करतो. पण शब्बाथ दिवशी बरे होण्यासाठी येण्याबद्दल तो लोकांना दोष लावतो!

येशू त्याला उत्तर देतोः “अहो ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशी ठाणावरुन सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्राहामाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. शब्बाथ दिवशी हिला ह्‍या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते का?”

हे ऐकल्यावर येशूला विरोध करणाऱ्‍यांना लाज वाटू लागते. परंतु येशू करीत असलेल्या गौरवी गोष्टी पाहून जनसमुदाय हर्ष करतो. ते पाहून, एका वर्षापूर्वी गालील समुद्रावर नावेतून त्याने सांगितलेल्या, देवाच्या राज्याबद्दलच्या, दोन भविष्यवादित दाखल्यांची येशू पुनरावृत्ती करतो. लूक १३:१-२१; उपदेशक ९:११; मत्तय १३:३१-३३.

▪ येथे कोणत्या दुर्घटनांचा उल्लेख केला आहे व त्यावरुन येशू काय बोध काढतो?

▪ फळ न येणारे अंजिराचे झाड तसेच त्याला फळ येण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे उदाहरण कसे लागू करता येते?

▪ बरे करण्याची येशूची कुवत, सभास्थानातील अधिकारी कशी मान्य करतो, पण येशू त्याचा ढोंगीपणा कसा उघड करतो?