व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कफर्णहूमास घरी परतणे

कफर्णहूमास घरी परतणे

अध्याय २६

कफर्णहूमास घरी परतणे

आतापर्यंत येशूची किर्ती दूरवर पसरली असून अनेक लोक तो राहात असलेल्या आडवळणांच्या जागांना येतात. परंतु काही दिवसानंतर तो गालील समुद्राजवळच्या कफर्णहूमाला परत येतो. तो घरी परतल्याची बातमी लागलेच शहरभर पसरते; आणि अनेक लोक तो राहात असलेल्या घराकडे येतात. शास्त्री व परुशीही दूरवरच्या यरुशलेमाहून येतात.

तेथे इतकी गर्दी होते की, दरवाजात जाण्यास जराही जागा राहात नाही. आणि आतमध्येही कोणाला शिरण्याइतकी जागा नसते. आता एक खरोखरी विलक्षण घटना घडण्याची सर्व सज्जता झाली आहे. या प्रसंगी घडलेली गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे मानवांच्या सर्व दुःखाचे मूळ काढून टाकून, त्याची इच्छा असेल त्या सर्वांचे आरोग्य पुनर्स्थापित करण्याचे सामर्थ्य येशूपाशी आहे हे मर्म जाणण्यास आपल्याला मदत होते.

येशू त्या जनसमुदायाला शिकवत असताना, चार माणसे एका पक्षघाती माणसाला बाजेवरुन त्या घरापाशी आणतात. आपल्या मित्राला येशूने बरे करावे अशी त्यांची इच्छा आहे. पण ते आत जाऊ शकत नाहीत. केवढी ही घोर निराशा! तरी ते माघार घेत नाहीत. ते घराच्या छपरावर चढतात, कौले काढून वाट तयार करतात आणि बाजेसह त्या पक्षघाती माणसाला खाली येशूपाशी सोडतात.

हे सर्व बघून आणि आपल्या भाषणात व्यत्यय आल्याचे पाहून येशू चिडतो का? मुळीच नाही! उलट, तो त्यांच्या विश्‍वासाने प्रभावीत होतो. तो पक्षघाती माणसाला म्हणतोः “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” परंतु येशू खरोखरच पापांची क्षमा करू शकतो का? शास्त्री व परुश्‍यांना तसे वाटत नाही. ते आपल्या मनात विचार करतातः “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?”

त्यांचे विचार ओळखून येशू त्यांना म्हणतोः “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करत आहात? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, किंवा उठून चाल, ह्‍यातून कोणते म्हणणे सोपे?”

मग, पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा आपल्याला अधिकार असून तो जगातला सर्वात महान मनुष्य असल्याचे प्रदर्शित करणारी एक विलक्षण गोष्ट, येशू, त्याच्या टीकाकारांसकट जमलेल्या सर्व लोकांपुढे करून दाखवितो. पक्षघाती माणसाकडे वळून तो आज्ञा करतोः “उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.” तात्काळ तो उठतो व आपली बाज घेऊन सर्वांच्या देखत निघून जातो! थक्क होऊन लोक देवाचे गौरव करतात व म्हणतातः “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”

पापांचा संबंध आजाराशी असल्याचा व पापांच्या क्षमेचा संबंध शारीरिक स्वास्थ्य मिळण्याशी असल्याचा उल्लेख येशूने केल्याचे तुमच्या लक्षात आले का? पवित्र शास्त्र स्पष्ट करते की, आपला पहिला पूर्वज आदाम याने पाप केले व त्या पापाचे परिणाम म्हणजे आजारपण व मृत्यु, हे आपल्याला वारशाने मिळाले आहेत. परंतु देवाच्या राज्याच्या शासनाखाली, देवावर प्रीती करून त्याची सेवा करणाऱ्‍या सर्वांना येशू त्यांच्या पापांची क्षमा करील. मग, सर्व आजार दूर होतील. ते किती चांगले असेल! मार्क २:१-१२; लूक ५:१७-२६; मत्तय ९:१-८; रोमकर ५:१२, १७-१९.

▪ एक खरोखर विलक्षण घटना घडण्यासाठी सज्जता कशी झाली होती?

▪ पक्षघाती माणूस येशूपर्यंत कसा पोहोंचला?

▪ आपण सर्व पापी का आहोत, परंतु आपल्या पापांची क्षमा व पूर्ण स्वास्थ्य शक्य असल्याबद्दल येशूने कशी आशा दिली?