व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कफर्णहूम येथे आणखी चमत्कार

कफर्णहूम येथे आणखी चमत्कार

अध्याय २३

कफर्णहूम येथे आणखी चमत्कार

येशूने आपल्या पहिल्या चार शिष्यांना—पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान यांना—पाचारण केल्यानंतरच्या शब्बाथाच्या दिवशी ते सर्व कफर्णहूम येथील सभास्थानात जातात. तेथे येशू शिकवू लागतो. शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा तो शिकवत असल्यामुळे लोक थक्क होतात.

या शब्बाथाच्या दिवशी दुरात्म्याने ग्रासलेला एक मनुष्य तेथे उपस्थित आहे. काही वेळाने तो मोठ्या आवाजात ओरडतोः “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच.”

त्या मनुष्यावर ताबा करून बसलेला तो दुरात्मा हा वस्तुतः सैतानाचा एक दूत आहे. त्या दुरात्म्याला धमकावून येशू म्हणतोः “उगाच राहा व ह्‍याच्यातून नीघ!”

तेव्हा तो दुरात्मा त्याला पिळवटून मोठ्या आवाजात ओरडतो. परंतु त्या माणसाला इजा न करता तो त्याच्यातून बाहेर येतो. सर्वजण नुसते आश्‍चर्यचकित होतात! ते विचारतातः “हे आहे तरी काय? . . . हा दुरात्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.” या घटनेची बातमी आसपासच्या सर्व प्रदेशात पसरते.

येशू व त्याचे शिष्य सभास्थानातून निघून शिमोन पेत्राच्या घरी जातात. तेथे पेत्राची सासू तापाने खूप आजारी आहे. ते विनवणी करतातः “कृपया तिला मदत करा.” येशू तिच्यापाशी जातो व तिला हात धरून उठवतो. तात्काळ ती बरी होते व त्यांच्यासाठी भोजनाची तयारी करू लागते!

त्यानंतर, सूर्य मावळल्यावर लोक चहूकडून दुखणाईतांना घेऊन पेत्राच्या घरी येऊ लागतात. थोड्याच वेळात सबंध गाव दरवाजापाशी गोळा होते! आणि त्या दुखणाईतांचे आजार कोणतेही असले तरी येशू त्या सर्वांना बरे करतो. तो दुरात्म्यांनी ग्रासलेल्यांनाही मुक्‍त करतो. बाहेर येताना ते दुरात्मे ओरडतातः “तू देवाचा पुत्र आहेस.” पण येशू त्यांना दटावतो व बोलू देत नाही, कारण तो ख्रिस्त असल्याचे त्यांना माहीत आहे. मार्क १:२१-३४; लूक ४:३१-४१; मत्तय ८:१४-१७.

▪ येशूने त्याच्या चार शिष्यांना पाचारण केल्यानंतरच्या शब्बाथाच्या दिवशी सभास्थानात काय घडते?

▪ सभास्थानातून निघून येशू कोठे जातो व तेथे तो काणता चमत्कार करतो?

▪ नंतर त्याच संध्याकाळी काय घडते?