व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुष्ठरोग्यावर दया

कुष्ठरोग्यावर दया

अध्याय २५

कुष्ठरोग्यावर दया

येशू व त्याचे चौघे शिष्य गालील प्रांताच्या गावांना भेटी देत असताना तो करीत असलेल्या अद्‌भुत गोष्टींची बातमी त्या सर्व प्रदेशात पसरते. एक कुष्ठरोगी राहात असलेल्या गावापर्यंत येशूच्या कृत्यांची वार्ता पोचते. लूक नावाचा वैद्य त्याचे वर्णन करताना “कुष्ठरोगाने भरलेला” असे म्हणतो. हा भयंकर रोग पराकोटीला पोचल्यावर शरीराच्या वेगवेगळ्या भागानां हळूहळू विद्रुप करतो. याचा अर्थ, हा कुष्ठरोगी दयनीय अवस्थेत आहे.

येशू त्या गावात येतो तेव्हा हा कुष्ठरोगी त्याच्याकडे येतो. देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे, इतर लोक अतीनिकट आल्याने त्यांना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून कुष्ठरोग्याने “अशुद्ध, अशुद्ध!” असे ओरडून इशारा दिला पाहिजे. आता तो कुष्ठरोगी येशूपुढे दंडवत घालून त्याला विनंती करतोः “प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.”

त्या माणसाला येशूवर किती विश्‍वास आहे! पण त्याच्या रोगामुळे तो किती दयनीय दिसत असावा! येशू काय करील? तुम्ही काय कराल? दया येऊन तो हात लांब करतो व त्याला स्पर्श करून म्हणतोः “माझी इच्छा आहे. शुद्ध हो.” आणि तात्काळ त्याचा कुष्ठरोग नाहीसा होतो.

अशा प्रकारचा दयाळू माणूस तुमचा राजा म्हणून तुम्हाला आवडेल का? येशूने या कुष्ठरोग्याशी केलेल्या वर्तनाने आपल्याला आश्‍वासन मिळते की, त्याच्या राज्य-कारभाराखाली “दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करील. दरिद्र्‌यांचे जीव तो तारील,” हा पवित्र शास्त्राचा भविष्यवाद पूर्ण होईल. होय, सर्व दुखणेकऱ्‍यांना मदत करण्याची स्वतःची हार्दिक इच्छा येशू तेव्हा पूर्ण करील.

कुष्ठरोग्याला बरे करण्यापूर्वीही येशूच्या सेवाकार्याने लोकांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. यशयाचा भविष्यवाद पूर्ण करीत येशू त्या बऱ्‍या झालेल्या माणसाला आज्ञा करतोः “कोणाला सांगू नकोस.” त्यानंतर तो त्याला म्हणतोः “जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर.”

परंतु त्या माणसाला इतका आनंद होतो की, त्या चमत्काराबद्दल गप्प राहणे त्याला शक्य होत नाही. तो निघून जातो व सर्वत्र ही बातमी पसरवू लागतो. बहुधा त्यामुळे लोकांमध्ये इतके कुतुहल व आस्था उत्पन्‍न होते की येशूला उघडपणे गावात जाणे अशक्य होते. अशारितीने, कोणी राहात नसलेल्या एकांत जागी येशू राहतो आणि त्याचे भाषण ऐकण्यास तसेच आपले रोग बरे करून घेण्यास लोक चोहोकडून त्याच्याकडे येतात. लूक ५:१२-१६; मार्क १:४०-४५; मत्तय ८:२-४; लेवीय १३:४५; १४:१०-१३; स्तोत्रसंहिता ७२:१३; यशया ४२:१, २.

▪ कुष्ठरोगाचा कसा परिणाम होऊ शकतो, व कुष्ठरोग्याने कोणता इशारा द्यायचा होता?

▪ एक कुष्ठरोगी येशूला कशी विनंती करतो व येशूच्या प्रतिसादाने आपण काय शिकू शकतो?

▪ रोगमुक्‍त झालेला माणूस येशूची आज्ञा पाळण्यात कसा उणा पडतो व त्याचे काय परिणाम होतात?