व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

क्षमेविषयी धडा

क्षमेविषयी धडा

अध्याय ६४

क्षमेविषयी धडा

अजूनही येशू आपल्या शिष्यांबरोबर कफर्णहूमातील घरी आहे असे दिसते. भावांमधील प्रश्‍न कसे हाताळावे याबद्दल तो चर्चा करीत आहे. पेत्र विचारतोः “प्रभुजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी?” यहुदी धार्मिक नेते तीन वेळा क्षमा करण्याची शिफारस करीत असल्याने पेत्र विचारतो की, “सात वेळा” का? असे म्हटल्याने ते मोठे औदार्य होईल अशी बहुधा पेत्राची कल्पना आहे.

परंतु, अशी मोजणी करणेच मुळात चूक आहे. येशू पेत्राची दुरुस्ती करतो व म्हणतो की, “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तरवेळा.” पेत्राने आपल्या भावाला क्षमा करण्याला, किती वेळा अशी मर्यादा घालू नये असे तो दाखवत आहे.

त्यांच्यावरील क्षमाशीलतेचे बंधन शिष्यांच्या मनावर ठसवण्यासाठी येशू त्यांना एक उदाहरण देतो. आपल्या दासांचा हिशोब घेणाऱ्‍या राजाचे ते उदाहरण आहे. ६,००,००,००० दिनार एवढे प्रचंड कर्ज असलेला एक दास त्याच्यापुढे आणण्यात आला. ते फेडणे त्याला अशक्य आहे. त्यामुळे राजा हुकूम करतो की, त्याची स्वतःची, त्याची बायको तसेच मुले यांची विक्री होऊन कर्जवसूली व्हावी.

तेव्हा आपल्या धन्याच्या पाया पडून तो दास विनंती करतोः “मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.”

त्याची दया येऊन त्याचा धनी त्याला सर्व कर्ज माफ करतो. येशू पुढे म्हणतो की, तसे झाल्याबरोबर लगेच हा दास जातो व त्याचे १०० दिनार कर्जाऊ घेतलेल्या दुसऱ्‍या दासाला गाठतो. तो आपल्या बरोबरच्या त्या दासाचा गळा धरतो व नरडी आवळून त्याला म्हणतोः “तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक.”

पण त्याच्या सोबतीच्या दासाजवळ तेवढा पैसा नाही. म्हणून, तो ज्याच्याकडून त्याने कर्ज घेतले होते, त्याच्या पाया पडून विनवू लागतोः “मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.” त्याच्या धन्याच्या विपरीत, हा दास दयाळू नाही व तो आपल्या सोबतच्या दासाला तुरुंगात टाकतो.

येशू पुढे म्हणतो की, घडलेली गोष्ट पाहणारे इतर दास ती आपल्या धन्याला सांगतात. तो संतापून दासाला बोलावतो व म्हणतो, “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तू देखील आपल्या सोबतच्या दासावर दया करावयाची नव्हतीस का?” रागावून धनी, त्या दयाहीन दासाला, तो सर्व देणे फेडीपर्यंत, तुरुंगाधिकाऱ्‍याच्या ताब्यात देतो.

मग, येशू समारोप करतोः “यास्तव, जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचेही करील.”

क्षमाशीलतेचा किती उत्तम हा धडा! देवाने आपल्याला क्षमा केलेल्या पापाच्या मोठ्या कर्जाच्या तुलनेने आपल्या विरुद्ध एखाद्या ख्रिस्ती बांधवाने केलेला कोणताही गुन्हा खरोखर लहानसा आहे. याशिवाय, यहोवा देवाने आपल्याला हजारो वेळा क्षमा केलेली आहे. अनेकदा आपण त्याच्याविरुद्ध केलेल्या गुन्ह्यांची आपल्याला जाणीवही नसते. असे असताना, तक्रार करण्यास आपल्यापाशी सार्थ कारण असले, तरीही आपण आपल्या भावाला थोड्या वेळा क्षमा करू शकत नाही का? लक्षात ठेवा, येशूने डोंगरावर केलेल्या उपदेशानुसार ‘जसे आपण आपल्या ऋण्यांना ऋण सोडले आहे’ तसाच देव आपली ऋणे आपल्याला सोडील. मत्तय १८:२१-३५; ६:१२; कलस्सैकर ३:१३.

▪ आपल्या बंधूला क्षमा करण्याबद्दल पेत्र का प्रश्‍न करतो व एखाद्याला सात वेळा क्षमा करणे हे औदार्याचे आहे असे त्याला का वाटते?

▪ दासाने दयेसाठी केलेल्या विनवणीला राजाने दिलेला प्रतिसाद व त्या दासाने सोबतच्या दासाच्या विनवणीला दिलेला प्रतिसाद यात कसा फरक आहे?

▪ येशूने दिलेल्या या उदाहरणापासून आपण काय शिकतो?