व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“खरोखर हा देवाचा पुत्र होता”

“खरोखर हा देवाचा पुत्र होता”

अध्याय १२६

“खरोखर हा देवाचा पुत्र होता”

येशूला वधस्तंभावर फारसा वेळ झाला नसताना, मध्यान्ही, गूढ रितीने तीन तासांचा अंधार होतो. त्याचे कारण सूर्यग्रहण नव्हे. कारण ते केवळ अमावास्येच्या दिवशी होते. वस्तुतः वल्हांडण सणाच्या वेळी पौर्णिमा आहे. शिवाय सूर्यग्रहणे ही काही मिनिटेच राहतात. तेव्हा त्या अंधाराची उत्पत्ती ही ईश्‍वरी आहे हे स्पष्ट आहे! कदाचित यामुळेच येशूची निंदा करणाऱ्‍यांना त्यांचे टोमणे थांबविण्याइतका आळा बसतो.

वधस्तंभावरील एका अपराध्याने दुसऱ्‍याची खरडपट्टी काढली होती आणि त्याची आठवण ठेवण्याची विनंती केली होती, त्यापूर्वी अंधःकार होण्याची ही भयप्रद गोष्ट घडली असल्यास, त्याच्या पश्‍चातापाला कारणीभूत गोष्टींपैकी ती एक असावी. कदाचित, या अंधाराच्या काळात चार स्त्रिया म्हणजे येशूची आई, तिची बहीण सलोमे, मरिया मग्दालिया आणि धाकट्या प्रेषित याकोबाची आई मरीया वाट काढीत वधस्तंभापाशी येतात. येशूचा प्रिय प्रेषित योहान हा देखील तेथे त्यांच्याबरोबर आहे.

ज्याला तिने अंगावर पाजले आणि जोपासले त्या आपल्या मुलाला वधस्तंभावर यातनांमध्ये टांगलेल्या स्थितीत असलेला पाहताना येशूच्या आईच्या हृदयातून कशी ‘तरवार भोसकून’ गेली असेल! तरीही येशू स्वतःच्या यातनांबद्दल विचार करीत नाही. तो तिच्या हिताबद्दल विचार करतो. मोठ्या कष्टाने, डोके हालवून, तो योहानाकडे निर्देश करतो आणि आपल्या आईला म्हणतोः “बाई पाहा, हा तुझा मुलगा!” मग, डोके हलवून मरीयेकडे निर्देश करून तो योहानाला म्हणतोः “पाहा, ही तुझी आई!”

आतापर्यंत नक्कीच विधवा झालेल्या आपल्या आईची जबाबदारी अशा तऱ्‍हेने येशू आपल्या विशेष जिवलग प्रेषितावर टाकतो. मरीयेच्या इतर मुलांनी अजून त्याच्यावर विश्‍वास प्रकट केला नसल्याने तो असे करतो. या प्रकारे आपल्या आईच्या केवळ भौतिक गरजाच नव्हे तर आध्यात्मिक गरजांसाठी तरतूद करण्याचे उत्तम उदाहरण तो घालून देतो.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येशू म्हणतोः “मला तहान लागली आहे.” त्याच्या सचोटीची संपूर्ण परिक्षा व्हावी म्हणून त्याच्या पित्याने जणू त्याला रक्षण देणे थांबवले आहे याची येशूला जाणीव होते. त्यामुळे तो मोठ्याने म्हणतोः “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?” हे ऐकून जवळ उभे असलेल्यांपैकी काही म्हणतातः “पाहा, तो एलियाला हाक मारतो आहे.” तात्काळ एकजण धावत जातो आणि बोरुच्या टोकावर आंबेने भरलेला स्पंज ठेवून त्याला ती पाजतो. पण इतर म्हणतातः “असू द्या. एलिया ह्‍याला खाली उतरावयास येतो की काय हे पाहू.”

आंब घेतल्यावर येशू मोठ्याने ओरडतोः “पूर्ण झाले आहे.” होय, त्याच्या पित्याने पृथ्वीवर जे काम करण्यासाठी त्याला पाठवले आहे ते त्याने पूर्ण केले आहे. शेवटी तो म्हणतोः “हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” अशा तऱ्‍हेने, देव आपल्याला जीवन शक्‍ती पुन्हा प्रदान करील या खात्रीने तो आपले जीवन देवाच्या हाती सोपवतो. मग, तो आपले मस्तक लववतो आणि मरतो.

येशूने शेवटला श्‍वास सोडल्याक्षणीच एक जबरदस्त भूकंप होतो. त्याने खडक फुटतात. तो भूकंप इतका जोरदार आहे की, यरुशलेमाबाहेरच्या कबरा फुटून उघडतात आणि त्यातून प्रेते बाहेर फेकली जातात. मृत शरीरे उघड्यावर आल्याचे जे जवळून जाणारे पाहतात ते शहरात येऊन त्याची बातमी कळवतात.

त्याशिवाय, येशूच्या मृत्यूच्या क्षणी देवाच्या मंदिरातील पवित्र आणि परमपवित्र स्थानांना विभागणारा मोठा पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभंगतो. हा सुंदर नक्षीकाम केलेला पडदा जवळपास १८ मीटर उंच असून अतिशय जड आहे असे दिसते! या आश्‍चर्यजनक चमत्काराने आपल्या पुत्राचा खून करण्याबद्दल देवाचा संतापच प्रकट होत नसून, येशूच्या मृत्युने परमपवित्र स्थानात, स्वर्गात, जाण्याचा मार्ग खुला झाल्याचेही सूचित होते.

लोकांना भूंकप जाणवतो आणि घडणाऱ्‍या गोष्टी दिसतात तेव्हा त्यांना अतिशय भीती वाटू लागते. वधस्थानावर नेमलेला सैन्याचा अधिकारी देवाचे गौरव करतो. तो म्हणतोः “खरोखर, हा देवाचा पुत्र होता.” पिलातासमोर झालेल्या येशूच्या चौकशीत ईश्‍वरी पुत्रत्वाच्या दाव्याची चर्चा झाली तेव्हा बहुधा हा उपस्थित असावा, आणि आता त्याची खात्री पटली आहे की येशू देवाचा पुत्र आहे. होय, सर्वकाळामध्ये झालेला हा खरोखरच सर्वश्रेष्ठ माणूस आहे.

इतर देखील या चमत्काराच्या घटनांनी अतिशय प्रभावीत होतात आणि उर बडवून आपला पराकोटीचा शोक व लज्जा सूचित करीत घरी परतू लागतात. येशूच्या अनेक शिष्या हे दृश्‍य दूरवरुन पाहात आहेत व या महत्त्वाच्या घटनांमुळे त्या अंतःकरणापासून हेलावल्या आहेत. प्रेषित योहानही उपस्थित आहे. मत्तय २७:४५-५६; मार्क १५:३३-४१; लूक २३:४४-४९; २:३४, ३५; योहान १९:२५-३०.

▪ तीन तासांच्या अंधाराला सूर्यग्रहण का कारणीभूत नाही?

▪ वृद्ध माता-पिता असलेल्यांसाठी येशू आपल्या मृत्युच्या थोड्या आधी कोणते उत्तम उदाहरण देतो?

▪ येशूने मृत्युपूर्वी केलेली चार विधाने कोणती?

▪ भूकंपाने काय साध्य होते आणि मंदिरातील पडदा फाटून दुभंगण्याला काय महत्त्व आहे?

▪ या चमत्कारांनी, वधस्थानावर नेमलेल्या सैन्याच्या अधिकाऱ्‍यावर काय परिणाम होतो?