व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचे आगाऊ दर्शन

ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचे आगाऊ दर्शन

अध्याय ६०

ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचे आगाऊ दर्शन

येशू फिलिप्पाच्या कैसरियाच्या भागात आलेला असून एका जमावाला शिकवण देत आहे. त्या जमावामध्ये त्याचे प्रेषितही आहेत. त्यांच्यासमोर तो अशी आश्‍चर्यचकित करणारी घोषणा करतो की, “मी तुम्हास खचित सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”

येशूच्या शिष्यांना असा प्रश्‍न पडला असावाः ‘याच्या या म्हणण्याचा अर्थ तरी काय असावा?’ त्यानंतर साधारण एका आठवड्याने येशू पेत्र, याकोब व योहान यांना बरोबर घेतो व ते एका उंच डोंगरावर चढतात. ती रात्र असू शकेल, कारण शिष्य झोपेला आले आहेत. येशू प्रार्थना करीत असताना त्यांच्या देखत त्याचे रुप पालटते. त्याचा चेहरा सूर्यासारखा चमकू लागतो व त्याचे कपडे प्रकाशासारखे तेजस्वी होतात.

मग, “मोशे व एलीया” म्हटलेल्या दोन आकृती प्रकट होतात व ‘यरुशलेममध्ये होऊ घातलेल्या त्याच्या निर्गमना’बद्दल ते येशूसोबत बोलू लागतात. हे निर्गमन म्हणजे येशूचा मृत्यु व त्यानंतरचे पुनरुत्थान होय, हे उघड आहे. अशा रितीने येशूचा मानहानीकारक मृत्यु पेत्राच्या इच्छेप्रमाणे टाळता येण्यासारखा नाही.

आता संपूर्ण जागे झालेले शिष्य आश्‍चर्याने बघतात व ऐकतात. हा दृष्टांत असला तरी इतका वास्तव वाटतो की, पेत्र त्या दृश्‍यात, “प्रभुजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करतो; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक,” असे म्हणत सहभागी होऊ लागतो.

पेत्र बोलत असताना एक तेजस्वी मेघ त्यांच्यावर छाया करतो व मेघातून एक आवाज म्हणतोः “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्‍याचे तुम्ही ऐका.” तो आवाज ऐकून शिष्य पालथे पडतात. पण येशू म्हणतोः “उठा, भिऊ नका.” ते उठतात तेव्हा त्यांना येशू व्यतिरिक्‍त कोणी दिसत नाही.

दुसऱ्‍या दिवशी डोंगरावरुन उतरत असताना येशू आज्ञा देतोः “मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका.” त्या दृष्टांतात एलीयाच्या प्रकट होण्याने शिष्यांच्या मनात एक प्रश्‍न उठतो. ते विचारतातः “एलीया प्रथम आला पाहिजे असे शास्त्री का म्हणतात?”

येशू सांगतोः “एलीया तर आलाच आहे; आणि त्यांनी त्याला ओळखले नाही.” परंतु एलीयासारखीच भूमिका केलेल्या बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाबद्दल येशू बोलत आहे. एलीयाने अलीशासाठी मार्ग तयार केला तसा बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाने ख्रिस्तासाठी केला.

हा दृष्टांत येशू व त्याच्या शिष्यांना किती धैर्य देणारा ठरतो! तो दृष्टांत जणू ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचे अगाऊ दर्शन आहे. एका आठवड्यापूर्वी येशूने वचन दिल्याप्रमाणे शिष्यांनी “मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना” जणू पाहिलेच. यामुळेच, पेत्राने, येशूच्या मृत्युनंतर, आपल्या लिखाणात ‘त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना’ त्यांनी ‘त्याचे ऐश्‍वर्य प्रत्यक्ष पाहिल्या’बद्दल लिहिले.

पवित्र शास्त्रामध्ये देवाचा नियुक्‍त राजा होण्यासाठी ज्याच्याबद्दल वचन दिले होते तो, तोच असल्याचे सिद्ध करण्यासाठी परुशांनी येशूपाशी चिन्हाची मागणी केली होती. त्यांना असे कोणतेही चिन्ह दिले गेले नाही. या ऊलट, राज्याविषयीच्या भविष्यांची खात्री पटण्यासाठी येशूच्या जिवलग शिष्यांना येशूचे रुपांतर पाहण्याची मुभा मिळते. म्हणून पेत्राने पुढे लिहिलेः “त्यामुळे आपल्याला संदेष्ट्यांच्या वचनांची अधिक खात्री वाटते”. मत्तय १६:१३, मत्तय १६:२८–१७:१३; मार्क ९:१-१३; लूक ९:२७-३७; २ पेत्र १:१६-१९.

▪ काही जण मरणापूर्वी, ख्रिस्ताला त्याच्या राज्यऐश्‍वर्यासह येताना कसे पाहतात?

▪ दृष्टांतामध्ये मोशे व एलीया येशूसोबत कशाबद्दल बोलतात?

▪ हा दृष्टांत शिष्यांसाठी धैर्य देणारा का आहे?