व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गर्भवती पण अविवाहित

गर्भवती पण अविवाहित

अध्याय ४

गर्भवती पण अविवाहित

मरीया तीन महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळात ती अलीशिबेला भेटायला गेली होती. पण आता ती नासरेथमधील आपल्या घरी परतली आहे हे तुम्ही जाणून आहात. लवकरच तिची अवस्था गावभर माहीत होईल. खरोखरच ती अतिशय दुःखदायक स्थितीत आहे!

मरीया, योसेफ नावाच्या सुताराची वाग्दत्त वधू असल्याने परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. इस्राएलांना देवाने दिलेल्या नियमानुसार एका पुरुषाशी वाड्‌·निश्‍चय झालेला असताना एखाद्या स्त्रीने दुसऱ्‍या पुरुषाशी स्वेच्छेने लैंगिक समागम केल्यास तिला मरेपर्यंत दगडमार करीत हे तिला माहीत होते. योसेफासमोर ती आपल्या गर्भारपणाचा खुलासा कसा करणार?

मरीया तीन महिने दूर गेल्याने तिला भेटण्यास योसेफ नक्कीच उत्सुक असणार. ते भेटतात तेव्हा बहुधा मरीया ही गोष्ट त्याला सांगते. आपण देवाच्या आत्म्याने गर्भवती असल्याचे समजावण्याचा तिने खूप प्रयत्न केला असेल. परंतु यावर विश्‍वास ठेवणे योसेफाला किती कठीण वाटले असेल याची कल्पना तुम्ही करू शकता.

योसेफाला मरीयेच्या सद्वर्तनाचा लौकिक माहीत आहे. तिने आवर्जून सांगितले आहे व त्याचेही तिच्यावर उत्कट प्रेम आहे; परंतु तरीही कोणातरी पुरुषाकडून ती गर्भवती राहिली आहे ही वस्तुस्थिती आहे. तथापि, तिला मरेपर्यंत दगडमार व्हावा वा लोकांपुढे तिची बेअब्रू व्हावी अशी योसेफाची इच्छा नाही. यासाठी तो तिला गुप्तपणे घटस्फोट देण्याचे ठरवतो. त्या काळात लग्नासाठी वचनबद्ध झालेल्या व्यक्‍ती जणू विवाहबद्ध आहेत असे समजले जाई व म्हणून नाते तोडण्यासाठी घटस्फोट घ्यावा लागत असे.

नंतर, या गोष्टींचा विचार करत असताना योसेफ झोपी जातो. यहोवाचा दूत स्वप्नात येऊन त्याला म्हणतोः “मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस. कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल, आणि तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.”

योसेफ झोपेतून उठतो तेव्हा त्याचे मन कृतज्ञतेने भरून येते! वेळ न दवडता देवदूताने सांगितल्याप्रमाणे तो सर्वकाही करतो. तो मरियेला आपल्या घरी आणतो. ही उघड कृती वस्तुतः विवाह विधीचे काम करते व योसेफ आणि मरीया कायदेशीररित्या विवाहबद्ध झाल्याचे जाहीर करते. परंतु येशूचा जन्म होईपर्यंत योसेफ मरीयेशी समागम करीत नाही.

पाहा, गरोदरपणाचे दिवस पूर्ण होत आल्याने मरीया भारावली आहे, तरीही योसेफ तिला गाढवावर बसवीत आहे. ते कोठे जात आहेत? मरीयेची प्रसूती जवळ आलेली असताना ते प्रवास का करीत आहेत? लूक १:३९-४१, ५६; मत्तय १:१८-२५; अनुवाद २२:२३, २४.

▪ मरीयेच्या गर्भारपणाबद्दल ऐकून योसेफाची मनःस्थिती कशी होते व का?

▪ लग्न झालेले नसताना योसेफ मरीयेला घटस्फोट कसा देऊ शकत होता?

▪ कोणती जाहीर कृती मरीया व योसेफ यांच्या विवाह-विधीचे काम करते?