व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गर्विष्ठ आणि नम्र

गर्विष्ठ आणि नम्र

अध्याय ३९

गर्विष्ठ आणि नम्र

बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाच्या सद्‌गुणांचे वर्णन केल्यानंतर, येशू आपले लक्ष त्याच्या सभोवार असलेल्या गर्विष्ठ व चंचल लोकांकडे वळवतो. तो म्हणतोः “जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतातः ‘आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही उर बडवून घेतले नाहीत,’ त्यांच्यासारखी ही पिढी आहे.”

असे म्हणण्याचा येशूचा काय अर्थ आहे? तो खुलासा करतोः “योहान खातपीत आला नाही तर त्याला भूत लागले असे म्हणतात; मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी म्हणतातः ‘पहा, खादाड व दारुबाज मनुष्य, जकातदारांचा व पापीजनांचा मित्र!’”

लोकांचे समाधान करणे अशक्य आहे. ते कशानेही संतुष्ट होत नाहीत. देवदूताने योहानाविषयी आधी सांगितले होते की, “तो द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही.” त्यानुसार, नाजीर या नात्याने योहान स्वसुखत्यागाचे खडतर जीवन जगला आहे; आणि तरीही लोक म्हणतात की, त्याल भूत लागले आहे. याउलट येशू इतर लोकांप्रमाणे, खडतर जीवनचर्या न आचरता, जीवन व्यतित करतो तर त्याच्यावर अतिसेवनाचा आरोप आहे.

लोकांना संतुष्ट करणे महाकठीण! इतर मुलांनी पावा वाजवला तर नाचून व आक्रोश केला तर ऊर बडवून प्रतिसाद न देणाऱ्‍या सवंगड्यांसारखे ते लोक आहेत. तरीही येशू म्हणतोः “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” होय, उपलब्ध पुरावा—त्यांची कृत्ये—उघड करतो की, योहान व येशूविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे आहेत.

यानंतर, त्याने जेथे आपले बहुतेक चमत्कार केले त्या खोराजिन, बेथेसैदा व कफर्णहूम या तीन शहरांना तो दोष देण्यासाठी निवडतो. येशू म्हणतो, ती कृत्ये त्याने फेनिकेच्या सोर व सीदोन शहरात केली असती तर त्यांनी अंगावर गोणताट व राख घेऊन पश्‍चाताप केला असता. या काळात त्याच्या सेवाकार्याचे केंद्र असावेसे वाटते त्या कफर्णहूमला दोषी ठरवताना येशू म्हणतोः “न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल.”

मग, येशू आपल्या स्वर्गीय पित्याची जाहीर प्रशंसा करतो. ज्ञानी व विचारवंत लोकांपासून देव हे अमूल्य सत्य गुप्त ठेवतो पण बालकांसारख्या नम्र लोकांना मात्र तो या अद्‌भुत गोष्टी प्रकट करतो म्हणून येशूला असे करावेसे वाटते.

शेवटी येशू आकर्षक निमंत्रण करतोः “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. मी जो मनाचा लीन व सौम्य आहे त्या माझे जू आपणावर घ्या, व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवांस विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”

येशू कसा विसावा देतो? जखडून टाकणाऱ्‍या शब्बाथ पाळण्याच्या नियमांसारख्या रुढींनी, धार्मिक नेत्यांनी लोकांवर ओझे लादले आहे. अशा, गुलामीत टाकणाऱ्‍या रुढींपासून मुक्‍त करून येशू लोकांना विसावा देतो. राजकीय अधिकाऱ्‍यांच्या जाचाखाली पिचलेले व पीडित विवेकामुळे, स्वतःच्या पापांचा भार दुःसह झालेल्यांनाही तो दिलासा मिळण्याचा मार्ग दाखवतो. अशा दुःखी-कष्टी लोकांना त्यांच्या पापांची क्षमा कशी होईल व देवाशी अमोल नाते जोडण्याचा आनंद त्यांना कसा मिळेल हे तो प्रकट करतो.

येशूने देऊ केलेले सोयीचे जू म्हणजे देवाला केलेले संपूर्ण आत्म-समर्पण, आपल्या दयाशील व क्षमाशील स्वर्गीय पित्याची सेवा होय. तसेच त्याच्याकडे येणाऱ्‍यांना येशू देत असलेले हलके ओझे म्हणजे जीवनासाठी देवाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होय. ते नियम म्हणजे पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या आज्ञा. आणि त्या पाळणे मुळीच कठीण नाही. मत्तय ११:१६-३०; लूक १:१५; ७:३१-३५; १ योहान ५:३.

▪ येशूच्या काळातील गर्विष्ठ व चंचल पिढी मुलांसारखी कशी आहे?

▪ आपल्या स्वर्गीय पित्याची प्रशंसा करण्यास येशू का प्रवृत्त झाला आहे?

▪ लोक कोणकोणत्या मार्गांनी ओझ्याखाली दबले आहेत व येशू कोणता दिलासा देऊ करतो?