व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गालीलात प्रचाराचा आणखी एक दौरा

गालीलात प्रचाराचा आणखी एक दौरा

अध्याय ४९

गालीलात प्रचाराचा आणखी एक दौरा

साधारण दोन वर्षे प्रचाराचे जोरदार कार्य केल्यावर आता येशूचा वेग थंडावणार व तो आपले काम मंदगतीने करील का? त्याऐवजी, आणखी एका दौऱ्‍यावर, गालीलातील तिसऱ्‍या दौऱ्‍यावर निघून तो आपले प्रचार कार्य वाढवतो. सभास्थानांमध्ये शिकवत व राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत तो त्या प्रांतातील सर्व शहरांना व खेड्यांना भेट देतो. या दौऱ्‍यावर त्याला दिसलेल्या गोष्टींमुळे प्रचार कार्याचा वेग वाढवण्याची गरज त्याला अधिकच पटते.

येशू जिकडे जातो तिकडे जनसमुदायाला आध्यात्मिक उपचाराची व सांत्वनाची गरज असल्याचे तो पाहतो. गांजलेले व पांगलेले ते लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे आहेत व त्याला त्यांची दया येते. तो आपल्या शिष्यांना सांगतोः “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”

येशूपाशी एक योजना आहे. जवळपास एका वर्षापूर्वी त्याने निवडलेल्या १२ प्रेषितांना तो आपल्यापाशी बोलावतो. त्यांच्या जोड्या लावून प्रचारकांचे सहा गट बनवतो व त्यांना सूचना देतो. तो म्हणतोः “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्‍या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’”

येशूने नमुनेदार प्रार्थनेमध्ये त्यांना ज्या राज्याबद्दल प्रार्थना करायला शिकवले त्याच राज्याबद्दल त्यांना प्रचार करायचा आहे. देवाने नियुक्‍त केलेला राजा, येशू ख्रिस्त, उपस्थित आहे या अर्थी ते राज्य जवळ आले आहे. त्या अतिमानवी शासनाचे प्रतिनिधी या नात्याने त्याच्या शिष्यांची ओळख होण्यासाठी येशू त्यांना, रोग्यांना बरे करण्याचे व मृतांना उठवण्याचे, सामर्थ्य देतो. ही सेवा विनामूल्य करण्याची सूचना तो त्यांना देतो.

त्यानंतर, त्यांच्या प्रचाराच्या दौऱ्‍यासाठी त्याच्या शिष्यांनी सामानाची तयारी करू नये असे तो त्यांना सांगतो. “सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका; वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका. कारण कामकऱ्‍याचे पोषण व्हावे हे योग्य आहे.” त्या संदेशाची कदर करणारे अन्‍न व निवारा देऊन प्रतिसाद देतील. येशूने म्हटल्याप्रमाणे, “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा.”

यानंतर येशू, घरमालकाकडे राज्याचा संदेश घेऊन कसे जावे याबद्दलच्या सूचना देतो. “घरात जाताना,” तो कळवतो, “‘तुला शांती असो,’ असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही, व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झाडून टाका.”

त्यांच्या संदेशाचा अव्हेर करणाऱ्‍या शहराबद्दल येशू स्पष्ट करतो की, त्यांचा न्याय कठोर होईल. तो खुलासा देतोः “मी तुम्हास खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरांपेक्षा सदोम व गमोरा ह्‍या प्रदेशाला सोपे जाईल.” मत्तय ९:३५–१०:१५; मार्क ६:६-१२; लूक ९:१-५.

▪ येशू गालीलचा तिसरा दौरा कधी सुरु करतो व त्यामुळे त्याची काय खात्री होते?

▪ आपल्या १२ प्रेषितांना प्रचारासाठी पाठवताना तो त्यांना कोणत्या सूचना देतो?

▪ ‘राज्य जवळ आले आहे,’ असे शिष्यांनी शिकवणे का उचित आहे?