व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गालील समुद्रापाशी

गालील समुद्रापाशी

अध्याय १३०

गालील समुद्रापाशी

येशूने अगोदरच सूचना दिल्याप्रमाणे, आता शिष्य गालीलात परततात. पण तेथे काय करावे याबद्दल ते अनिश्‍चित आहेत. काही वेळाने थोमा, नथनेल, याकोब आणि त्याचा भाऊ योहान आणि इतर दोन प्रेषितांना पेत्र सांगतोः “मी मासे धरावयास जातो.”

“आम्हीही तुझ्याबरोबर येतो,” असे ते सर्व सहाजण त्याला सांगतात.

संपूर्ण रात्रभर काहीही धरण्यात त्यांना यश येत नाही. पण नुकतीच पहाट होत असताना येशू किनाऱ्‍यावर प्रकट होतो. परंतु तो येशू असल्याचे प्रेषितांच्या लक्षात येत नाही. तो ओरडून विचारतोः “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?”

“नाही,” ते पाण्यावरुन ओरडून सांगतात.

“मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल.” तो म्हणतो. आणि ते तसे करतात तेव्हा अतिशय माशांमुळे त्यांच्याने जाळे ओढवत नाही.

“[तो] प्रभू आहे,” असे योहान ओरडतो.

हे ऐकून पेत्र अंगरखा घालतो, कारण त्याने वरचे कपडे काढले आहेत आणि समुद्रात उडी घेतो. मग तो किनाऱ्‍यापर्यंत, सुमारे ९० मीटर्स पोहून जातो. इतर प्रेषित मासे भरलेले जाळे ओढत मचव्यातून मागाहून येतात.

ते किनाऱ्‍यावर पोहंचतात तेव्हा तेथे कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी असते. येशू म्हणतोः “तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा.” मचव्यावर चढून, पेत्र जाळे किनाऱ्‍यावर ओढून आणतो. त्यात १५३ मोठे मासे आहेत!

“या, न्याहारी करा.” येशू बोलावतो.

तो येशू असल्याचे त्यांना कळते, त्यामुळे “आपण कोण आहा?” असे विचारण्यास त्यांच्यातील कोणी धजत नाही. पुनरुत्थानानंतर हे त्याचे सातवे दर्शन असून सर्व प्रेषितांच्या गटाला तिसरे आहे. आता तो प्रत्येकाला थोडी भाकरी आणि मासळीची न्याहारी देतो.

त्यांचे खाणे संपल्यावर, बहुधा जाळ्यातील माशांकडे पाहात, येशू पेत्राला विचारतोः “योहानाच्या पुत्रा, शिमोना, ह्‍यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” निःसंशये, येशूच्या बोलण्याचा अर्थ हा की, तुझ्यासाठी मी ठरवलेल्या कामापेक्षा मासेमारीच्या धंद्याची तुला अधिक ओढ आहे का.

यावर पेत्र म्हणतोः “होय, प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे.”

त्यावर येशू म्हणतोः “माझी कोकरे चार.”

पुन्हा दुसऱ्‍यांदा तो विचारतोः “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय?”

“होय प्रभू. मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे,” पेत्र निश्‍चयाने म्हणतो.

येशू पुन्हा आज्ञा देतोः “माझी मेंढरे पाळ.”

मग, पुन्हा तिसऱ्‍यांदा तो विचारतोः “योहानाच्या पुत्रा, शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?”

आता मात्र पेत्र दुःखी झाला आहे. येशूला त्याच्या निष्ठेबद्दल शंका आहे की काय असा प्रश्‍न त्याला पडला असेल. नाही तरी, येशूला मृत्युदंड द्यावा किंवा नाही यासाठी त्याची नुकतीच चौकशी झाली तेव्हा त्याला ओळखत असल्याचे पेत्राने तीन वेळा नाकारले होते. यामुळे पेत्र म्हणतोः “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे. मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.”

येशू तिसऱ्‍यांदा आज्ञा करतोः “माझी मेंढरे चार.”

आपल्या शिष्यांनी जे काम करावे अशी येशूची इच्छा आहे ते इतरांच्या मनावर ठसवण्यासाठी येशू पेत्रावर चाचणी प्रयोग करतो. लवकरच तो पृथ्वी सोडून जाईल, तेव्हा देवाच्या मेंढवाड्याकडे आकर्षित होणाऱ्‍यांची सेवा करण्यात त्यांनी पुढाकार घ्यावा अशी त्याची इच्छा आहे.

देवाने त्याला नेमून दिलेले काम केल्यामुळे जसे येशूला बांधले गेले व त्याची हत्या झाली त्यासारखाच अनुभव पेत्राला सोसावा लागेल असे तो आता स्पष्ट करतो. येशू त्याला सांगतोः “तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास. परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल.” पेत्राला हुतात्म्याचा मृत्यु येणार असला तरी येशू त्याला आग्रह करतोः “माझ्या मागे येत राहा.”—न्यू.व.

मागे वळल्यावर पेत्राला योहान दिसतो. तो विचारतोः “प्रभू ह्‍याचे काय?”

येशू म्हणतोः “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय?” योहान कधीही मरणार नाही असा येशूच्या या शब्दांचा अर्थ आहे अशी अनेक शिष्यांची समजूत होते. परंतु प्रेषित योहानाने कालांतराने खुलासा केल्याप्रमाणे, तो कधीही मरणार नाही असे येशू म्हणाला नाही, तर येशूने केवळ म्हटलेः “मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय?”

यानंतर योहान अशीही महत्त्वाची गोष्ट सांगतोः “येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत. ती सर्व लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्‍या जगात मावणार नाहीत.” योहान २१:१-२५; मत्तय २६:३२; २८:७, १०.

▪ गालीलात काय करावे याविषयी प्रेषित अनिश्‍चित असल्याचे कशावरून दिसते?

▪ गालील समुद्रापाशी प्रेषित येशूला कसे ओळखतात?

▪ येशू त्याच्या पुनरुत्थानापासून किती वेळा प्रकट झाला आहे?

▪ प्रेषितांनी जे करावेसे येशूला वाटते त्यावर तो कसा जोर देतो?

▪ पेत्र कशा तऱ्‍हेने मरेल हे येशू कसे सूचित करतो?

▪ योहानाबद्दल येशूच्या कोणत्या विधानाबाबत अनेक शिष्यांची गैरसमजूत होते?