व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जन्मांध माणासाला बरे करणे

जन्मांध माणासाला बरे करणे

अध्याय ७०

जन्मांध माणासाला बरे करणे

यहुदी येशूला दगडमार करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो यरुशलेम सोडून जात नाही. त्यांनतर शब्बाथ दिवशी तो व त्याचे शिष्य शहरातून चालत असताना जन्मांध असलेला एक माणूस त्यांना दिसतो. शिष्य येशूला विचारतातः “गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा अंधळा जन्मास आला? याच्या किंवा ह्‍याच्या आईबापांच्या?”

कदाचित काही गुरुंप्रमाणे त्या शिष्यांचाही विश्‍वास आहे की, माणूस आईच्या उदरात असताना पाप करू शकतो. परंतु येशू उत्तर देतोः “ह्‍याने किंवा याच्या आईबापाने पाप केले असे नाही. तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला.” त्या माणसाने किंवा त्याच्या आईवडीलाने केलेल्या कोणा विशिष्ट पापामुळे या माणसाचा अंधळेपणा आलेला नाही. पहिला माणूस आदाम याच्या पापामुळे सर्व माणसे अपूर्ण झाली असून त्यांना जन्मांध होण्यासारखी व्यंगे होऊ शकतात. या माणसातील या व्यंगामुळे देवाची कार्ये प्रकट करण्यास येशूला संधि मिळते.

ही कार्ये करण्याच्या निकडीवर येशू भर देतो. तो म्हणतोः “ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” लवकरच, त्याला मृत्यु येणार होता त्यामुळे त्याला जेथे काहीही करता येणार नाही अशा कबरेच्या अंधारात जावे लागणार होते. पण या आधी तो जगाला ज्ञानप्रकाशाचा स्रोत आहे.

या गोष्टी सांगितल्यावर तो जमिनीवर थुंकतो व त्या थुंकीने थोडा चिखल बनवतो. तो चिखल आंधळ्या माणसाच्या डोळ्यावर लावतो व म्हणतोः “जा, शिलोह नावाच्या तळ्यात धू.” तो माणूस त्याची आज्ञा पाळतो व तसे केल्यावर त्याला दिसू लागते! आयुष्यात प्रथमच पाहू शकल्याने, तो परतल्यावर किती आनंदीत होतो!

शेजारी व त्याला ओळखणारे इतर आश्‍चर्यचकित होतात. ते विचारतातः “भीक मागत बसणारा तो हाच की नाही?” काही म्हणतातः “तोच हा.” पण इतर काहींचा त्यावर विश्‍वासच बसत नाही. ते म्हणतातः “नाही, हा त्याच्यासारखा आहे.” परंतु तो माणूस म्हणतोः “मी तोच आहे.”

“तुझे डोळे कसे उघडले?” लोकांना हे जाणण्याची इच्छा आहे.

“येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांस लावला आणि मला सांगितले, ‘शिलोहवर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.”

“तो कोठे आहे?” ते विचारतात.

“मला ठाऊक नाही.” तो म्हणतो.

आता ते लोक त्या माणसाला त्यांच्या धार्मिक नेत्यांकडे, परुशांकडे, नेतात. त्याला दृष्टी कशी आली असे तेही विचारू लागतात. तो माणूस खुलासा करतोः “त्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला. तो मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.”

परुशांनी नक्कीच त्या बऱ्‍या झालेल्या भिकाऱ्‍याबरोबर हर्षोल्लास करायला हवा! याऐवजी ते येशूवर दोष ठेवतात. ते दाव्याने म्हणतातः “हा मनुष्य देवापासून नाही!” ते असे का करतात? “कारण तो शब्बाथ पाळत नाही.” पण काही परुशी विचारात पडतातः “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो?” अशाप्रकारे त्यांच्यामध्ये फूट पडते.

या कारणामुळे ते त्या माणसाला विचारतातः “त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस?”

तो उत्तर देतोः “तो संदेष्टा आहे.”

ते परुशी त्याच्यावर विश्‍वास ठेवायला नकार देतात. लोकांना फसवण्यासाठी येशू व या माणसात गुप्त करार झाला असावा अशी त्यांची खात्री आहे. तेव्हा एकंदरीत गोष्टीचा उलगडा व्हावा या उद्देशाने ते त्याच्या आईवडीलाला प्रश्‍न विचारण्यासाठी बोलावतात. योहान ८:५९; ९:१-१८.

▪ त्या माणसाच्या अंधत्वाला काय जबाबदार आहे व काय नाही?

▪ कोणाही माणसाला काम करता येत नाही अशी रात्र कोणती?

▪ त्या माणसाला बरे केल्यावर त्याला ओळखणाऱ्‍या लोकांची प्रतिक्रिया काय आहे?

▪ त्या माणसाच्या बरे होण्यावर परुशांमध्ये कशी फूट पडते?