व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जन्मापूर्वीच सन्मानित केलेला

जन्मापूर्वीच सन्मानित केलेला

अध्याय २

जन्मापूर्वीच सन्मानित केलेला

गब्रीएल देवदूताने तरुण मरीयेला, ती, सर्वकाळ राजा होईल अशा मुलाला जन्म देणार, असे सांगितल्यावर, मरीया विचारतेः “हे कसे होईल? कारण माझा पुरुषासोबत शरीरसंबंध आलेला नाही.”

गब्रीएल सांगतोः “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्‍या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे म्हणतील.”

आपल्या संदेशावर मरीयेचा विश्‍वास बसावा म्हणून गब्रीएल पुढे म्हणतोः “पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे. आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य नाही.”

मरीया गब्रीएलच्या शब्दांवर विश्‍वास ठेवते. तिची प्रतिक्रिया काय आहे? ती उद्‌गारतेः “पाहा, मी यहोवाची दासी. आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.”

गब्रीएल निघून गेल्यावर लगेच मरीया तयारी करते व यहूदीयाच्या डोंगराळ भागात राहणाऱ्‍या अलीशिबेला भेटण्यास जाते. अलीशिबेचा पती, जखऱ्‍या हा देखील तेथेच आहे. नासरेथमधील मरीयेच्या घरापासून हा प्रवास लांबचा, बहुधा तीन ते चार दिवसांचा आहे.

शेवटी जखऱ्‍याच्या घरी पोहंचल्यावर मरीया अलीशिबेला अभिवादन करते. तेव्हा अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन मरीयेला म्हणतेः “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली.”

हे ऐकून मरीया हार्दिक कृतज्ञतेने म्हणतेः “माझा जीव यहोवाला थोर मानतो. आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्लासला आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे. पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरता महत्कृत्ये केली आहेत.” मरीयेला कृपा दाखवली असली तरी ती सर्व आदर-सन्मान देवाला देते. “त्याचे नाव पवित्र आहे,” असे ती म्हणते, “आणि जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यान्‌पिढ्या आहे.”

मरीया, प्रेरित भविष्यवाणीच्या गीतामध्ये देवाची स्तुती करीत पुढे म्हणतेः “त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतींस ओढून काढले आहे व दीनांस उंच केले आहे. त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे, व धनवानांस रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांस त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान ह्‍यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरुन, त्याने आपला सेवक इस्राएल ह्‍याला साहाय्य केले आहे.”

मरीया साधारणपणे तीन महिने अलीशिबेकडे राहते. अलीशिबेच्या गरोदरपणाच्या या शेवटल्या काळात मरीयेची अतिशय मदत होत आहे यात शंका नाही. देवाच्या मदतीने पुत्रगर्भ लाभलेल्या या दोन्ही विश्‍वासू स्त्रिया त्यांच्या जीवनाच्या या आशीर्वादित काळात एकत्र आहेत हे खूपच चांगले आहे.

येशूच्या जन्माच्या आधीच त्याला दिला गेलेला सन्मान तुम्हाला कळला का? अलीशिबेने त्याला “माझ्या प्रभू” म्हटले व मरीया प्रथम आली तेव्हा अलीशिबेच्या गर्भाने आनंदाने उडी मारली. पण तेच, नंतर इतरांनी मरीया व तिच्या जन्माला येणाऱ्‍या बाळाला खूपच अनादराने वागवले, जे आपण पाहणार आहोत. लूक १:२६-५६.

▪ मरीया गर्भवती कशी होईल हे तिला समजून सांगण्यासाठी गब्रीएल काय म्हणतो?

▪ जन्माला येण्यापूर्वी येशूचा सन्मान कसा झाला?

▪ देवाची स्तुती करताना भविष्यवादीत गायनात मरीया काय म्हणते?

▪ मरीया अलीशिबेसोबत किती काळ राहते, आणि या काळात मरीयेने अलीशिबेसोबत राहावे हे का योग्य आहे?