व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जुलमी राजापासून सुटका

जुलमी राजापासून सुटका

अध्याय ८

जुलमी राजापासून सुटका

एक तातडीची बातमी सांगण्यासाठी योसेफ मरीयेला जागे करतो. यहोवाच्या दूताने नुकतेच प्रकट होऊन त्याला सांगितले आहेः “उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा. आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा. कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे.”

लगेच ते तिघे पळून जातात. ते पळाले ते अगदी वेळेवर, कारण ज्योतिषी आपल्याला फसवून देश सोडून गेल्याचे हेरोदाला कळले आहे. येशू सापडल्यावर ज्योतिषांनी हेरोदाकडे परत येऊन ते त्याला सांगायचे होते हे ध्यानात घ्या. हेरोद भडकला आहे. यामुळेच येशूला ठार मारण्याच्या प्रयत्नात तो आज्ञा करतो की, बेथलहेम व आसपासच्या प्रांतातील दोन वर्षांचे व त्याहून लहान वयाचे सर्व मुलगे मारून टाकावे. पूर्वेकडून आलेल्या ज्योतिषांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याने मुलांच्या वयाचे अनुमान केले आहे.

सर्व लहान मुलांची ती कत्तल बघवत नाही! हेरोदाचे शिपाई एका पाठोपाठ एकेका घरात घुसतात व तेथे लहान मुलगा दिसताच ते त्याला त्याच्या आईच्या हातातून हिसकावून घेतात. ते किती मुले मारतात याची आपल्याला कल्पना नाही. त्यांच्या मातांच्या रडण्याचा व आकांताचा आवाज, देवाचा संदेष्टा यिर्मया याने केलेला पवित्र शास्त्रातील भविष्यवाद पूर्ण करतो.

या दरम्यान योसेफ व त्याचे कुटुंब मिसरात सुखरूप येऊन पोहंचले असून आता ते तेथे राहात आहेत. परंतु एका रात्री यहोवाचा दूत योसेफाला पुन्हा स्वप्नात प्रकट होतो. तो म्हणतोः “उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएलाच्या देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पहात होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा, देवाचा पुत्र मिसर देशातून बोलावला जाईल या, पवित्र शास्त्रातील आणखी एका भविष्यवादाच्या पूर्ततेत ते कुटुंब आपल्या मायदेशी परतते.

मिसराला पळून जाण्यापूर्वी, ते राहात असलेल्या यहूदीयातील बेथलहेम गावी स्थाईक होण्याचा बहुधा योसेफाचा विचार आहे. परंतु हेरोदाचा दुष्ट मुलगा अर्खेलाव आता यहूदीयात राजा असल्याचे त्याला कळते व आणखी एका स्वप्नात यहोवा त्या धोक्याची सूचना त्याला देतो. म्हणून योसेफ व त्याचे कुटुंब उत्तरेकडे प्रवास करून गालीलातील नासरेथ गावी स्थाईक होतात. येथील समाजात, यहुदी धार्मिक केंद्रापासून दूर, येशू मोठा होतो. मत्तय २:१३-२३; यिर्मया ३१:१५; होशेय ११:१.

▪ ज्योतिषी परतले नाहीत तेव्हा हेरोद राजा कोणते भयंकर कृत्य करतो, परंतु येशूचे संरक्षण कसे होते?

▪ मिसरातून परत आल्यावर योसेफ पुन्हा बेथलहेमात का राहात नाही?

▪ या कालावधीत पवित्र शास्त्रातील कोणते भविष्यवाद पूर्ण होतात?