व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला

तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला

अध्याय ४६

तिने त्याच्या वस्त्राला स्पर्श केला

येशू दकापलीसहून परतल्याची बातमी कफर्णहूमाला पोहोचते व त्याच्या स्वागतासाठी लोकांचा मोठा समुदाय समुद्रकिनाऱ्‍यावर जमतो. त्याने वादळ शमविल्याचे व भूतग्रस्त माणसांना बरे केल्याचे त्यांनी ऐकले आहे यात शंका नाही. आता तो किनाऱ्‍यावर उतरत असताना, उत्सुकतेने व अपेक्षेने ते त्याच्याभोवती गोळा होतात.

येशूला पाहण्यासाठी आतुर झालेल्यांमध्ये, सभास्थानाचा अध्यक्ष याइर आहे. तो येशूच्या पाया पडतो व वारंवार विनवतोः “माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे. ती बरी होऊन वाचावी म्हणून आपण येऊन तिजवर हात ठेवावा.” ती त्याची एकुलती एक मुलगी असून केवळ बारा वर्षांची असल्याने याइरची विशेष लाडकी आहे.

येशू याइरच्या घराकडे निघतो. जमावही त्याच्याबरोबर जातो. आणखी एका चमत्काराच्या अपेक्षेने उडालेल्या खळबळीची आपण कल्पना करू शकतो. पण त्या जमावातील एका स्त्रीचे लक्ष तिच्या स्वतःच्या असह्‍य समस्येवर केंद्रित झाले आहे.

ही स्त्री १२ वर्षांपासून रक्‍तस्रावाने आजारी आहे. अनेक वैद्यांकडून उपचार करून घेण्यात तिने आपला सर्व पैसा खर्च केला आहे. पण तिला काहीही फायदा न होता तिचा आजार अधिकच बळावला आहे.

कदाचित तुम्हाला जाणीव असेल की, तिला अतिशय अशक्‍तता आणण्याशिवाय तिचा आजार लाजिरवाणा व मानहानी करणाराही आहे. अशा आजारांबद्दल चार-चौघात कोणी सहसा बोलत नाही. या व्यतिरिक्‍त, मोशेच्या नियमानुसार रक्‍तस्रावामुळे स्त्री अशुद्ध होते व तिला वा तिच्या रक्‍ताने डागाळलेल्या वस्त्रांना स्पर्श करणाऱ्‍याला स्नान करावे लागते व संध्याकाळपर्यंत अशुचि राहायचे असते.

त्या स्त्रीने येशूच्या चमत्कारांबद्दल ऐकले असून आता ती त्याच्याकडे आली आहे. तिची अशुचिता लक्षात घेता ती शक्यतो कोणाच्या नजरेत न भरता जमावातून वाट काढत स्वतःशी म्हणतेः “केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” तसे तिने केल्यावर तात्काळ आपला रक्‍तस्राव थांबल्याचे तिच्या ध्यानात येते.

“माझ्या कपड्यांना कोण शिवले?” या येशूच्या शब्दांनी तिला किती धक्का बसला असेल! त्याला ते कसे कळले? पेत्र म्हणतोः ‘गुरुजी, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणताः “मला कोण शिवले?”’

त्या स्त्रीला सभोवार पाहण्यासाठी बघत येशू म्हणतोः “कोणीतरी मला स्पर्श केलाच. कारण माझ्यातून शक्‍ती निघाली हे मला समजले.” खरोखर, तो काही सर्वसामान्य स्पर्श नव्हता. कारण त्या बरे होण्यात येशूची शक्‍ती खेचली जाते.

आपण नजरेतून सुटलो नसल्याचे पाहून, घाबरलेली व थरथरणारी ती स्त्री येऊन येशूच्या पाया पडते. सर्व लोकांसमक्ष आपल्या आजाराबद्दल व ती नुकतीच कशी बरी झाली त्याबद्दल खरे ते सांगते.

तिच्या कबूली जबाबाने हेलावून जाऊन येशू दयाळूपणे तिचे सांत्वन करतोः “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्‍त राहा.” पृथ्वीवर राज्य करण्यासाठी देवाने निवडलेली व्यक्‍ती इतकी प्रेमळ व दयाळू असून लोकांची काळजी करणारी व त्यांना मदत करण्याचे सामर्थ्य असलेली आहे हे जाणणे किती चांगले आहे! मत्तय ९:१८-२२; मार्क ५:२१-३४; लूक ८:४०-४८; लेवीय १५:२५-२७.

▪ याईर कोण आहे व तो येशूकडे का येतो?

▪ एका स्त्रीला कोणती पिडा आहे व येशूकडे मदतीसाठी येणे तिला इतके अवघड का आहे?

▪ ती स्त्री कशी बरी होते व येशू तिचे सांत्वन कसे करतो?