व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ते येशूला धरण्यात अपयशी होतात

ते येशूला धरण्यात अपयशी होतात

अध्याय १०८

ते येशूला धरण्यात अपयशी होतात

येशू मंदिरात शिकवत असून त्याच्या धार्मिक शत्रूंचा दुष्टपणा उघडकीस आणणारे तीन दाखले त्याने नुकतेच दिले असल्यामुळे परुशी संतापतात आणि ज्यासाठी त्याला कैद करता येईल असे काहीतरी बोलण्यात धरण्याचे ते ठरवतात. ते डाव रचतात आणि त्याची कोंडी करण्यासाठी हेरोद्यांबरोबर आपल्या शिष्यांना पाठवतात.

हे लोक म्हणतातः “गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात, देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरीत नाही. कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. आपल्याला काय वाटते हे आम्हास सांगा. कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”

त्यांच्या या खुषामतीला येशू फसत नाही. ‘हा कर देणे कायदेशीर वा योग्य नव्हे,’ असे म्हटल्यास तो रोमशी विद्रोही ठरेल हे त्याच्या ध्यानात येते. पण, ‘होय. तुम्ही कर दिला पाहिजे’ असे म्हटल्यास रोमच्या वर्चस्वाखाली असल्याबद्दल मनस्वी चीड असणारे यहुदी त्याचा द्वेष करतील. यामुळे तो उत्तर देतोः “अहो ढोंग्यांनो, माझी परिक्षा कशाला पाहता? कैसराचे नाणे मला दाखवा.”

त्यांनी त्याला एक नाणे दिल्यावर तो विचारतोः “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?”

“कैसराचा,” असे ते उत्तर देतात.

“तर मग, कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.” येशूचे हे समर्पक उत्तर ऐकल्यावर ते लोक थक्क होतात. ते निघून जातात व त्याच्या वाटेस जात नाहीत.

येशूविरुद्ध पुरावा मिळवण्यात परुशांना अपयश आलेले पाहून, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदुकी त्याच्याकडे येतात व ते विचारतातः “गुरुजी, मोशेने सांगितले आहे की, ‘जर एखादा मनुष्य निःसंतान मेला तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’ आम्हामध्ये सात भाऊ होते. त्यातला पहिला लग्न करून मेला. आणि त्याला संतती नसल्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली. अशा प्रकारे दुसरा व तिसरा असे ते सातही जण मेले. आणि सर्वांमागून ती स्त्रीही मेली. तर पुनरुत्थान झाल्यावर ती सात जणांपैकी कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होती.”

येशू उत्तर देतोः “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहा ना? कारण मेलेल्यातून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत. तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात. पण मेलेल्यांविषयी सांगावयाचे म्हणजे ते उठवले जातात याबद्दल मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटलेः ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे’? तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.”

येशूच्या उत्तराने जमाव पुन्हा आश्‍चर्यचकित होतो. काही शास्त्रीही मान्य करतातः “गुरुजी, ठीक बोललात.”

येशूने सदुक्यांची तोंडे बंद केल्याचे पाहून परुशी एकत्र होऊन त्याच्याकडे येतात. येशूची अधिक परिक्षा घेण्यासाठी त्यांच्यामधील एक शास्त्री विचारतोः “गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?”

येशू उत्तर देतोः “पहिली ही की, ‘हे इस्राएला ऐक. आपला देव यहोवा हा अनन्य परमेश्‍वर आहे. आणि तू आपला देव यहोवा याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धिने व संपूर्ण शक्‍तीने प्रीती कर.’ दुसरी ही की, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर.’ ह्‍यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.” इतकेच नव्हे तर येशू पुढे म्हणतोः “ह्‍या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”—न्यू.व.

तो शास्त्री सहमत दर्शवून सांगतोः “गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की, ‘तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही.’ आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्‍तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करणे हे सर्व होमार्पणे व यज्ञ ह्‍यांपेक्षा अधिक आहे.”

त्या शास्त्र्याने सूज्ञतेने उत्तर दिल्याचे जाणून येशू त्याला सांगतोः “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.”

गेले तीन दिवस—रविवार, सोमवार व मंगळवार—येशू मंदिरात शिकवत आहे. लोक आनंदाने त्याचे ऐकतात पण त्याला मारण्याची धार्मिक नेत्यांची इच्छा आहे. परंतु आतापर्यंत त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले आहेत. मत्तय २२:१५-४०; मार्क १२:१३-३४; लूक २०:२०-४०.

▪ परुशी कोणता कट रचतात व येशूने होय वा नाही असे उत्तर दिल्यास काय होईल?

▪ येशूला कोंडीत धरण्याचे सदुक्यांचे प्रयत्न तो कसे हाणून पाडतो?

▪ येशूची परिक्षा घेण्याचा आणखी कोणता प्रयत्न परुशी करतात व त्यातून काय निष्पन्‍न होते?

▪ यरुशलेममधील त्याच्या शेवटच्या सेवाकार्यात येशू किती दिवस मंदिरात शिकवतो व त्याचा काय परिणाम होतो?