व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्याच्या प्रस्थानासाठी प्रेषितांची तयारी करणे

त्याच्या प्रस्थानासाठी प्रेषितांची तयारी करणे

अध्याय ११६

त्याच्या प्रस्थानासाठी प्रेषितांची तयारी करणे

स्मारक भोजन आटोपले आहे. पण येशू व त्याचे प्रेषित अजूनही माडीवरील खोलीत आहेत. येशू लवकरच जाणार असला तरी अजून त्याला खूपसे सांगायचे आहे. तो त्यांचे सांत्वन करतोः “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्‍वास ठेवा. आणि माझ्यावरही विश्‍वास ठेवा.”

येशू पुढे म्हणतोः “माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. . . . मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो . . . ह्‍यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.” स्वर्गात जाण्याबद्दल येशू बोलत असल्याचे प्रेषितांच्या ध्यानात येत नाही. त्यामुळे थोमा विचारतोः “प्रभुजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही. मग, मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार?”

येशू उत्तर देतोः “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.” होय, येशूचा स्वीकार करून व त्याच्या जीवनक्रमाचे अनुकरण करूनच कोणीही पित्याच्या स्वर्गीय घरात प्रवेश करू शकतो; कारण येशूने म्हटल्याप्रमाणे “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.”

फिलिप्प विनंती करतोः “प्रभुजी, आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हास पुरे आहे.” प्राचीन काळी मोशे, एलिया व यशया यांना दृष्टांतात दिले गेले तसे देवाचे दृश्‍य प्रकटीकरण येशूने दाखवावे अशी बहुधा फिलिप्पाची इच्छा असावी. पण प्रत्यक्षात, त्या प्रकारच्या दृष्टांतापेक्षा प्रेषितांपाशी अधिक बरे काही आहे. येशू म्हणतो तसे, “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.”

येशू त्याच्या पित्याचे व्यक्‍तीमत्व इतके हुबेहुब व्यक्‍त करतो की, त्याच्याबरोबर राहणे व त्याला पाहणे म्हणजे पित्यालाच प्रत्यक्षात पाहण्यासारखे आहे. पण येशू मान्य करतो तसा पिता, पुत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. तो म्हणतोः “ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही.” त्याच्या शिकवणींचे श्रेय यथार्थपणे येशू आपल्या स्वर्गीय पित्याला देतो.

“मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्‍वास ठेवणाराही करील आणि त्यांपेक्षा मोठी करील.” असे आता येशूने म्हटलेले ऐकून प्रेषितांना किती उत्तेजन मिळाले असेल! त्याच्यापेक्षा त्याचे अनुयायी मोठ्या अद्‌भुत शक्‍ती वापरतील असा येशूच्या बोलण्याचा अर्थ नव्हे. तर अधिक काळ, अधिक मोठ्या प्रदेशावर व अत्यंत अधिक लोकांसाठी ते सेवाकार्य करतील असा त्याच्या बोलण्याचा अर्थ आहे.

येशू आपल्या गमनानंतर शिष्यांना वाऱ्‍यावर टाकणार नाही. तो वचन देतो, “तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.” तो पुढे म्हणतोः “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.” मागाहून तो स्वर्गास चढून गेल्यावर येशू आपल्या शिष्यांवर पवित्र आत्मा, म्हणजेच दुसरा कैवारी, ओततो.

तो म्हणतो तसे येशूचे प्रस्थान जवळ आहे. “आता थोडाच वेळ आहे; मग जग मला आणखी पाहणार नाही.” येशू कोणाही मानवाला न दिसणारी आत्मिक व्यक्‍ती होईल. पण येशू पुन्हा आपल्या विश्‍वासू प्रेषितांना वचन देतोः “पण तुम्ही मला पाहाल, मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.” होय, येशू त्याच्या पुनरुत्थानानंतर त्यांना मानवी रुपात प्रकट होईल इतकेच नव्हे तर यथाकाळी आत्मिक व्यक्‍ती म्हणून स्वर्गात स्वतःपाशी राहण्यासाठी तो त्यांचे पुनरुत्थान करील.

आता येशू एक साधा नियम सांगतोः “ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन.”

तेव्हा तद्दय म्हटलेला प्रेषित यहूदा मध्येच म्हणतोः “प्रभुजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?”

येशू उत्तर देतोः “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील . . . ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही.” त्याच्या अनुयायांच्या विरुद्ध जग ख्रिस्ताच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तो स्वतःला त्यांच्यापुढे प्रकट करीत नाही.

आपल्या पृथ्वीवरील सेवाकार्यात येशूने त्याच्या प्रेषितांना अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. पण विशेषतः या क्षणापर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या ध्यानात येत नाहीत तेव्हा त्यांना त्या कशा आठवणार? आनंदाची गोष्ट अशी की, येशू हे वचन देतोः “ज्याला माझा पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल.”

पुन्हा त्यांचे सांत्वन करत येशू म्हणतोः “मी तुम्हास शांती देऊन ठेवतो . . . तुमचे अंतःकरण अस्वस्थ . . . होऊ नये.” येशू जाणार आहे हे खरे, पण तो खुलासा करतोः “माझ्यावर तुमची प्रीती असली तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.”

येशू त्यांच्याबरोबर थोडा काळ आहे. तो म्हणतोः “ह्‍यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही. कारण जगाचा अधिकारी येतो. तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.” यहूदामध्ये शिरून त्यावर ताबा मिळवू शकलेला दियाबल सैतान हाच जगाचा अधिकारी आहे. पण येशूला देवाच्या सेवेपासून परावृत्त करण्यासाठी सैतान ज्याचा फायदा घेऊ शकेल अशी कोणतीही पापजन्य दुर्बलता येशूमध्ये नाही.

एका घनिष्ट नात्याचा आनंद लुटणे

स्मारक भोजन झाल्यावर आडपडदा न ठेवता अनौपचारिक संभाषणाने येशू आपल्या प्रेषितांना उत्तेजन देत आहे. मध्यरात्र टळली असावी. या कारणास्तव येशू आग्रह करतोः “उठा, आपण येथून जाऊ.” परंतु ते जाण्यापूर्वी, त्यांजवरील त्याच्या प्रेमाने प्रवृत्त होऊन एक प्रेरणादायक दाखला देत तो बोलत राहतो.

तो आरंभ करतोः “मीच खरा द्राक्षवेल आणि माझा बाप माळी आहे.” इ. स. २९ मधील पानझडीच्या ऋतुमध्ये येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याच्यावर पवित्र आत्मा ओतून मोठ्या माळ्याने, यहोवा देवाने, हा प्रतिकात्मक द्राक्षवेल लावला. पण तो द्राक्षवेल त्याच्यासकट अधिक असे कशाचे प्रतिक असल्याचे येशू पुढे दाखवतो. तो म्हणतोः “माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. . . . जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही. तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा.”

एक्कावन दिवसानंतर, पेंटेकॉस्टला प्रेषित व इतरांवर पवित्र आत्मा ओतला गेल्यावर ते वेलाचे फाटे होतात. यथाकाळी १,४४,००० व्यक्‍ती त्या लाक्षणिक वेलाचे फाटे होतात. वेलाच्या खोडासह, म्हणजे येशू ख्रिस्तासह हे, देवाच्या राज्याची फळे उत्पन्‍न करणारा तो लाक्षणिक द्राक्षवेल बनतात.

येशू फळे उत्पन्‍न करण्याच्या गुरुकिल्लीचा खुलासा करतोः “जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही.” परंतु जर एखाद्या व्यक्‍तीने फळे उत्पन्‍न केली नाहीत तर येशू म्हणतोः “त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.” याउलट, येशू वचन देतोः “तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल.”

पुढे येशू त्याच्या प्रेषितांना म्हणतोः “तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.” त्यांनी ख्रिस्तासारखे गुण, विशेषतः प्रेम प्रकट करावे या फळाची फाट्यापासून देवाला अपेक्षा आहे. त्याशिवाय ख्रिस्त देवाच्या राज्याची घोषणा करणारा होता म्हणून अपेक्षित फळांमध्ये, त्याने शिष्य बनवले तसे शिष्य बनवण्याच्या त्यांच्या कार्याचाही समावेश आहे.

आता येशू आग्रह करतोः “तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.” पण त्याच्या प्रेषितांना तसे करणे कसे शक्य आहे? तो म्हणतोः “तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल.” पुढे येशू स्पष्टीकरण देतोः “जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्‍यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.”

काही तासांतच, त्याच्या प्रेषितांसाठी तसेच त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांसाठी आपला प्राण देण्याची ही अतुलनीय प्रीती येशू दाखवील. त्याच्या उदाहरणाने, एकमेकांवर तसेच आत्मत्यागी प्रेम करण्यास त्यांनी प्रवृत्त व्हावे. येशूने पूर्वी म्हटल्याप्रमाणे या प्रेमानेच त्यांची ओळख पटेल. तो म्हणाला होताः “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”

आपल्या मित्रांची ओळख देताना येशू म्हणतोः “मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही. कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते. परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.”

येशूचे घनिष्ट मित्र होणे म्हणजे किती अनमोल नाते मिळणे होय! पण या नात्याचा आनंद सतत लुटता येण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी “फळे उत्पन्‍न करीत राहावे.” (न्यू.व.) त्यांनी तसे केल्यास येशू म्हणतोः ‘तुम्ही पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल.’ राज्याची फळे उत्पन्‍न केल्याबद्दल हे निश्‍चितच मोठे फळ आहे! “एकमेकांवर प्रीती करावी” असा प्रेषितांना पुन्हा आग्रह केल्यानंतर येशू खुलासा करतो की, जग त्यांचा द्वेष करील. पण तो त्यांचे सांत्वन करतोः “जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे.” त्यानंतर, “तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते” असे म्हणून जग त्याच्या अनुयायांचा द्वेष का करते ते येशू स्पष्ट करतो.

जगाच्या हेव्याच्या कारणाचा अधिक खुलासा करताना येशू पुढे म्हणतोः “ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील. कारण ज्याने [यहोवा देव] मला पाठविले त्याला ते ओळखत नाहीत.” त्याने नमूद केल्याप्रमाणे येशूची चमत्काराची कार्ये वस्तुतः त्याचा द्वेष करणाऱ्‍यांना दोषी ठरवतातः “जी कृत्ये दुसऱ्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.” अशा रितीने येशूने म्हटल्याप्रमाणे “विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,” हे शास्त्रवचन पूर्ण झाले आहे.

त्याने आधी केल्याप्रमाणे पुन्हा, देवाची सामर्थ्यवान कृतीशील शक्‍ती, पवित्र आत्मा, म्हणजेच कैवारी पाठवण्याचे वचन देऊन येशू त्यांचे सांत्वन करतो व म्हणतोः “तो [पवित्र आत्मा] माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल.’

जाता जाता अधिक ताकीद

येशू व त्याचे प्रेषित माडीवरील खोली सोडण्याच्या बेतात आहेत. तेव्हा तो पुढे म्हणतोः “तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्‍या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत.” मग, तो असा गंभीर इशारा देतो की, “ते तुम्हाला सभाबहिष्कृत करतील. इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्‍या प्रत्येकाला, आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल, अशी वेळ येत आहे.”

या इशाऱ्‍याने प्रेषित अतिशय अस्वस्थ होतात हे उघड आहे. जग त्यांचा द्वेष करील असे येशूने त्यांना मागेच सांगितले असले तरी ते मारले जातील असे त्याने उघड प्रकट केले नव्हते. येशू खुलासा करतोः “ह्‍या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हाला सांगितल्या नाहीत कारण मी तुमच्याबरोबर होतो.” तरी जाण्यापूर्वी या माहितीने त्यांना इशारा देणे किती चांगले आहे!

येशू पुढे म्हणतोः “परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी आता जातो.” आणि ‘आपण कोठे जाता?’ असे तुमच्यापैकी कोणी मला विचारीत नाही”. संध्याकाळी काही वेळापूर्वी तो कोठे जात आहे याबद्दल त्यांनी विचारले होते. पण आता त्याने सांगितलेल्या गोष्टींमुळे ते इतके हादरले आहेत की, त्याबद्दल अधिक काही विचारणे त्यांना सुचत नाही. येशूने म्हटल्याप्रमाणे, “ह्‍या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे.” त्यांना अनन्वित छळ सोसावा लागेल व ते मारले जातील म्हणूनच नव्हे तर त्यांचा धनी त्यांना सोडून जात असल्यानेही प्रेषित दुःखी झाले आहेत.

या कारणामुळे येशू खुलासा करतोः “मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन.” माणूस म्हणून येशू एका वेळी एकाच ठिकाणी असू शकतो. पण तो स्वर्गात असल्यावर त्याचे अनुयायी पृथ्वीवर कोठेही असले तरी देवाच्या पवित्र आत्म्याला वा कैवाऱ्‍याला तो तेथे पाठवू शकतो. तेव्हा येशूचे जाणे हे हितावह आहे.

येशू म्हणतो की, पवित्र आत्मा “पापाविषयी, नीतीमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खातरी करील.” देवाच्या पुत्रावर विश्‍वास न ठेवण्यामुळे जगाचे पाप उघड करण्यात येईल. त्याशिवाय, येशूचे त्याच्या पित्याकडे आरोहण, त्याच्या नीतीमत्त्वाबद्दल खात्रीलायक पुरावा देईल. आणि सैतान व त्याच्या दुष्ट जगाला येशूची सचोटी भंग करण्यात आलेले अपयश हा, या जगाच्या अधिकाऱ्‍याचा प्रतिकूल न्याय झाल्याचा, खात्रीलायक पुरावा आहे.

येशू पुढे म्हणतोः “मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत. परंतु आत्ताच त्या तुमच्याने सोसवणार नाहीत.” त्यामुळे येशू वचन देतो की, पवित्र आत्मा, देवाची कार्यकारी शक्‍ती तो ओतेल तेव्हा, त्यांच्या आकलनशक्‍तीच्या कुवतीनुसार या गोष्टींची समज होण्यात तो [पवित्र आत्मा] त्यांचे मार्गदर्शन करील.

विशेषतः, येशू मरण पावेल व त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्यांना प्रकट होईल ही गोष्ट प्रेषितांना कळत नाही. त्यामुळे ते एकमेकांना विचारतातः “हा आम्हास, ‘थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय ‘मी पित्याकडे जातो,’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?”

आपले प्रेषित आपणाला प्रश्‍न विचारु इच्छित आहेत हे येशूच्या लक्षात येते म्हणून तो खुलासा करतोः “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील, तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.” त्या दिवशी काही वेळाने, दुपारी, येशू मारला जातो तेव्हा प्रपंचासक्‍त धार्मिक नेते आनंदी होतात, पण शिष्य शोक करतात. परंतु, येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्यांचे दुःख आनंदात बदलते; आणि पेंटेकॉस्टला त्याचे साक्षीदार व्हावे म्हणून त्याने त्यांच्यावर देवाचा पवित्र आत्मा ओतल्यावर त्यांचा आनंद अखंड चालू राहतो.

प्रेषितांच्या परिस्थितीची तुलना, प्रसूती वेदना होत असलेल्या स्त्रीशी करत येशू पुढे म्हणतोः “स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते; कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते.” पण येशू म्हणतो की, मुलाचा जन्म झाल्यावर तिला आपल्या वेदना आठवत नाहीत. आणि “ह्‍याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल; व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही,” असे म्हणून तो आपल्या प्रेषितांना उत्तेजन देतो.

या वेळेपर्यंत प्रेषितांनी येशूच्या नावाने कधीही विनंती केलेली नाही. पण आता तो म्हणतोः “तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल . . . कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे. आणि मी पित्यापासून आलो असा विश्‍वास धरला आहे. मी पित्यापासून निघून आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.”

येशूच्या शब्दांनी प्रेषितांना मोठे उत्तेजन मिळते. ते म्हणतातः “ह्‍यावरुन आपण देवापासून आला आहा असा आम्ही विश्‍वास धरतो.” येशू विचारतोः “आता तुम्ही विश्‍वास धरता काय? पहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे की, तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल.” त्यावर विश्‍वास ठेवणे अशक्य वाटत असले तरी ती रात्र संपण्यापूर्वीच असे घडते!

येशू समारोप करतोः “माझ्याठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्‍या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा. मी जगाला जिंकले आहे.” येशूच्या सचोटीचा भंग करण्याचा सैतान व त्याच्या जगाने सर्वतोपरि प्रयत्न केला असला तरी, विश्‍वासूपणे देवाची इच्छा साध्य करून येशूने जगाला जिंकले आहे.

माडीवरील खोलीत समारोपाची प्रार्थना

आपल्या प्रेषितांवरील सखोल प्रेमाने प्रवृत्त होऊन, आपल्या, येऊन ठेपलेल्या प्रस्थानासाठी येशू त्यांची तयारी करत आहे. आता त्यांना प्रदीर्घ ताकीद व सांत्वन दिल्यावर तो आकाशाकडे डोळे करतो आणि आपल्या पित्याला विनंती करतोः “पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहे.”

येशू किती उत्तेजक कल्पना मांडतो—सार्वकालिक जीवन! “मनुष्यमात्रावर अधिकार” दिला गेल्यामुळे, मरत असलेल्या सर्व मानवजातीला येशू त्याच्या खंडणीच्या बलिदानाचे फायदे देऊ शकतो. तरीही, त्याचा पिता ज्यांना पसंत करतो केवळ त्यांनाच तो “सार्वकालिक जीवन” बहाल करतो. सार्वकालिक जीवनाच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारून येशू पुढे प्रार्थना करतो:

“सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान त्यांनी संपादावे.” होय, देव आणि त्याचा पुत्र या दोघांना ओळखण्यावर [त्यांच्याविषयी माहिती, ज्ञान मिळवण्यावर] तारण अवलंबून आहे. पण नुसती माहिती करून घेण्यापेक्षा अधिक गोष्टींची गरज आहे.

त्यांच्याशी परस्परांच्या समजुतीवर आधारीत मैत्री होईल असा त्यांचा दाट परिचय झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टींबाबत त्यांना वाटते तसे वाटले पाहिजे व त्यांच्या दृष्टीकोणातून पाहिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांशी व्यवहार करताना त्यांच्या अद्वितीय गुणांचे अनुकरण करण्यासाठी झटले पाहिजे.

यानंतर येशू प्रार्थना करतोः “जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.” या घटकेपर्यंत त्याला सोपवलेले काम पूर्ण करून आणि भविष्यातील यशाची खात्री असल्याने तो विनंती करतोः “हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते तसे तू आपणाजवळ माझे गौरव कर.” (न्यू.व.) होय, पुनरुत्थानाद्वारे आपल्या भूतपूर्व स्वर्गीय गौरवाची पुनर्स्थापना व्हावी अशी विनंती आता तो करतो.

पृथ्वीवरील त्याच्या प्रमुख कामाचा आढावा घेता तो म्हणतोः “जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले आहे. ते तुझे होते व तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.” येशूने आपल्या सेवाकार्यात देवाचे यहोवा हे नाव वापरले आणि त्याचा योग्य उच्चार दाखवला. परंतु प्रेषितांना देवाचे नाव प्रकट करण्यापेक्षा अधिक त्याने केले. त्याने यहोवा, त्याचे व्यक्‍तीमत्त्व आणि त्याचे हेतु यांजबद्दल त्यांचे ज्ञान व आदरही वाढविला.

ज्याच्या हाताखाली तो काम करतो असा त्याचा वरिष्ठ म्हणून यहोवाला श्रेय देत येशू नम्रतेने मान्य करतोः “जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठविले असा त्यांनी विश्‍वास ठेवला.”

त्याचे अनुयायी आणि बाकीची मानवजात यांमध्ये भेद करून येशू पुढे प्रार्थना करतोः “मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी [करतो]. . . . जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत . . . मी त्यांना राखले. मी त्यांचा संभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही.” तो नाशाचा पुत्र म्हणजेच यहूदा इस्कर्योत. आणि याच क्षणाला येशूचा विश्‍वासघात करण्याच्या आपल्या घृणास्पद कामासाठी गेलेला आहे. अशा रितीने यहूदा अजाणतेपणे शास्त्रलेख पूर्ण करीत आहे.

येशू प्रार्थनेत पुढे म्हणतोः “जगाने त्यांचा द्वेष केला . . . तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.” येशूचे अनुयायी, सैतानाच्या अधिपत्याखाली संगठित केलेल्या या मानवी समाजात, जगात आहेत. परंतु ते त्यापासून व त्याच्या दुष्टपणापासून वेगळे आहेत व राहिले पाहिजे.

येशू पुढे म्हणतोः “तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.” ज्यातून तो सतत उतारे उद्धृत करीत असे त्या इब्री शास्त्राला, येथे येशू “सत्य” म्हणून संबोधित आहे. पण त्याचप्रमाणे, त्याच्या शिष्यांना त्याने दिलेली शिकवण आणि देवाच्या प्रेरणेने त्यांनी पुढे जे लिहिले ते ख्रिस्ती ग्रीक शास्त्र देखील “सत्य” आहे. हे सत्य व्यक्‍तीला पवित्र करू शकते, त्याचे जीवन पार बदलू शकते आणि त्याला जगापेक्षा वेगळी अशी व्यक्‍ती करू शकते.

आता येशू प्रार्थना करतोः “मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो.” अशा प्रकारे, जे त्याचे अभिषिक्‍त अनुयायी होतील, तसेच ‘एका कळपा’त गोळा केले जातील अशा इतर भावी शिष्यांसाठी येशू प्रार्थना करतो. या सर्वांसाठी तो कशाची विनंती करतो?

“[असे] त्या सर्वांनी एक व्हावे [की], हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये [आहे] . . . जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे.” येशू व त्याचा पिता हे अक्षरशः एक व्यक्‍ती नव्हेत तर सर्व बाबतीत त्यांचे एकमत आहे. त्याच्या अनुयायांनी ही एकता उपभोगावी म्हणजे त्यावरून “जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.”

त्याच्या भावी अभिषिक्‍त अनुयायांच्या वतीने येशू आता त्याच्या स्वर्गीय पित्याला एक विनंती करतो. कशासाठी? “त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्‍यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे. कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली.” याचा अर्थ आदाम व हव्वा यांनी मुले जन्माला घालण्यापूर्वी येशू ख्रिस्त झालेल्या एकुलत्या पुत्राला देवाने त्याच्याही खूप पूर्वी प्रीती केली.

प्रार्थनेचा समारोप करताना येशू पुन्हा भर देतोः “मी तुझे नाव त्यांस कळविले आहे आणि कळवीन. ह्‍यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.” प्रेषितांसाठी, देवाचे नाव शिकण्यामध्ये, वैयक्‍तीकरित्या देवाचे प्रेम समजणेही गोवलेले आहे. योहान १४:१–१७:२६; १३:२७, ३५, ३६; १०:१६; लूक २२:३, ४; निर्गम २४:१०; १ राजे १९:९-१३; यशया ६:१-५; गलतीकर ६:१६; स्तोत्रसंहिता ३५:१९; ६९:४; नीतीसूत्रे ८:२२, ३०.

▪ येशू कोठे जात आहे व तेथे जाण्याच्या मार्गाबद्दल थोमाला काय उत्तर मिळते?

▪ फिलिप्पाने केलेल्या विनंतीवरुन, येशूने काय द्यावे अशी त्याची इच्छा असल्याचे दिसते?

▪ ज्याने येशूला पाहिले आहे त्याने पित्यालाही का पाहिले आहे?

▪ येशूचे अनुयायी त्याने केली त्यापेक्षा मोठी कृत्ये कशी करतील?

▪ कोणत्या अर्थाने सैतानाची येशूवर सत्ता नाही?

▪ यहोवाने प्रतिकात्मक द्राक्षवेल कधी लावला आणि इतर लोक कधी व कसे त्याचे भाग बनतात?

▪ सरतेशेवटी त्या प्रतिकात्मक द्राक्षवेलाला किती फाटे असतात?

▪ फाट्यांहून देव कोणत्या फळांची अपेक्षा करतो?

▪ आपण येशूचे मित्र कसे बनू शकतो?

▪ जग, येशूच्या अनुयायांचा द्वेष का करते?

▪ येशूच्या कोणत्या इशाऱ्‍यामुळे त्याचे प्रेषित अस्वस्थ होतात?

▪ तो कोठे जात आहे याबद्दल प्रेषित येशूला का प्रश्‍न करीत नाहीत?

▪ प्रेषितांना विशेषतः काय लक्षात येत नाही?

▪ प्रेषितांची स्थिती शोकातून आनंदात बदलेल हे येशू कसे उदाहरण देऊन स्पष्ट करतो?

▪ प्रेषित लवकरच काय करतील असे येशू म्हणतो?

▪ येशू जगाला कसा जिंकतो?

▪ कोणत्या अर्थाने येशूला “मनुष्यमात्रावर . . . अधिकार” दिला गेला आहे?

▪ देव आणि त्याच्या पुत्राला ओळखणे म्हणजे काय?

▪ कोणत्या मार्गांनी येशू देवाचे नाव प्रगट करतो?

▪ “सत्य” काय आहे व ते एखाद्या ख्रिस्ती माणसाला “पवित्र” कसे करते?

▪ देव, त्याचा पुत्र व खरे भक्‍त कसे एक आहेत?

▪ “जगाची स्थापना” कधी झाली?