व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्याला धरण्यात अपयश येते

त्याला धरण्यात अपयश येते

अध्याय ६७

त्याला धरण्यात अपयश येते

मंडपांचा सण चालू असताना धार्मिक नेते येशूला धरण्यासाठी शिपायांना पाठवतात. तो लपण्याचा प्रयत्न करीत नाही. उलट येशू जाहीरपणे शिकवण देत राहतो. तो म्हणतोः “मी आणखी थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. मग, ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही; आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.”

यहुद्यांना याचा अर्थ कळत नाही. ते आपसात विचारतातः “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो ग्रीक लोकांत पांगलेल्या यहुद्यांकडे जाणार आणि ग्रीक लोकांस शिकवणार काय? ‘तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हाला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ ह्‍या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?” (न्यू.व.) येशू, अर्थातच, जवळ येणाऱ्‍या त्याच्या मृत्यू व स्वर्गातील जीवनाच्या पुनरुत्थानाबद्दल बोलत आहे. तेथे त्याचे शत्रू त्याच्या पाठोपाठ जाऊ शकत नाहीत.

सणाचा सातवा व शेवटचा दिवस येतो. सणात दररोज सकाळी, शिलोहच्या तळ्यातून घेतलेले पाणी एका याजकाने, वेदीच्या पायथ्याकडे वाहील असे ओतले आहे. बहुधा लोकांना या विधीची आठवण करून देत येशू मोठ्याने म्हणतोः “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.’”

पवित्र आत्मा ओतला गेल्यावर होणाऱ्‍या मोठ्या परिणामांबद्दल वस्तुतः येशू येथे बोलत आहे. पुढील वर्षी पेंटेकॉस्टला हा पवित्र आत्मा ओतला जातो. तेव्हा ते १२० शिष्य लोकांची सेवा करू लागतात त्यावेळी जिवंत पाणी वाहू लागते. पण तोपर्यंत ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी कोणालाही पवित्र आत्म्याचा अभिषेक होत नाही, तसेच कोणाला स्वर्गीय जीवनासाठी बोलावले जात नाही, या अर्थाने अजून आत्मा आलेला नसतो.

येशूच्या शिकवणीला प्रतिसाद म्हणून काही म्हणू लागतातः “हा खरोखर संदेष्टा आहे.” ज्याच्या येण्याबद्दल वचन देण्यात आले होते त्या मोशेपेक्षा श्रेष्ठ संदेष्ट्याला अनुलक्षून ते बोलत असल्याचे उघड आहे. इतर म्हणतातः “हा ख्रिस्त आहे.” पण इतर कित्येक विरोधाने म्हणतातः “ख्रिस्त गालीलातून येतो काय? दावीदाच्या वंशाचा व ज्या बेथलहेमात दावीद होता त्या गावातून ख्रिस्त येणार असे शास्त्रात सांगितले नाही काय?”

यामुळे लोकसमुदायात फूट पडते. येशू धरला जावा अशी काहींची इच्छा आहे, पण त्याच्यावर कोणी हात टाकीत नाही. अधिकारी येशूशिवाय परत येतात तेव्हा प्रमुख याजक व परुशी विचारतातः “तुम्ही त्याला का आणले नाही?”

अधिकारी उत्तर देतातः “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”

ते धार्मिक नेते रागावून उपहास, विपर्यास व शिव्या देण्याइतक्या खालच्या थराला पोहोचतात. ते नाक मुरडून म्हणतातः “तुम्हीही फसलात का? अधिकाऱ्‍यांपैकी किंवा परुशांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्‍वास ठेवला आहे का? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”

तेव्हा एक परुशी व यहुद्यांचा अधिकारी, (म्हणजे न्यायसभेचा एक सभासद) निकदेम, येशूच्या वतीने बोलण्याचा धीर करतो. अडीच वर्षांपूर्वी निकदेम रात्रीच्या वेळी येशूकडे आला होता व त्याने येशूवर आपला विश्‍वास प्रकट केला होता, हे तुम्हाला आठवतच असेल. आता हा निकदेम म्हणतोः “एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते का?”

आपल्यातील एकाने येशूची कड घेतलेली पाहून परुशांना अधिकच संताप येतो. ते बोचकपणे म्हणतातः “तुम्हीही गालीलातील आहात काय? शोध करून पाहा की, गालीलातून कोणी संदेष्टा उद्‌भवत नाही.”

गालीलातून एक संदेष्टा येईल असे नियमशास्त्रात स्पष्टपणे म्हटलेले नसले तरी त्या प्रांतातून “मोठा प्रकाश” दिसेल असे म्हणून ख्रिस्त तेथून येणार असल्याचे ते नजरेस आणून देते. याशिवाय येशू बेथलहेमात जन्मला होता व दावीदाचा वंशज होता. कदाचित परुशांना याची जाणीव असली तरी येशूबद्दल लोकांत असलेले गैरसमज पारखण्यास ते जबाबदार आहेत. योहान ७:३२-५२; यशया ९:१, २; मत्तय ४:१३-१७.

▪ सणात दररोज सकाळी काय घडते व येशू त्याकडे लक्ष कसे वेधतो?

▪ अधिकारी येशूला धरण्यात का अपयशी होतात व या गोष्टीला धार्मिक नेते कसा प्रतिसाद देतात?

▪ निकदेम कोण आहे, येशूबद्दल त्याचा कल कसा आहे व त्याच्या सोबतच्या परुशांकडून त्याला कशी वागणूक मिळते?

▪ ख्रिस्त गालीलातून येईल याबद्दल काय पुरावा आहे?