व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दया दाखवण्याबद्दल धडा

दया दाखवण्याबद्दल धडा

अध्याय ४०

दया दाखवण्याबद्दल धडा

बहुतेक येशू अजून, जेथे त्याने एका विधवेच्या मुलाचे पुनरुत्थान केले त्या नाईन गावात किंवा जवळपास कोणा गावाला भेट देत असावा. अशी असामान्य कामे करणाऱ्‍या माणसाला जवळून पाहण्याची, शिमोन नावाच्या एका परुश्‍याची इच्छा आहे. म्हणून तो येशूला आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण देतो.

उपस्थितांची सेवा करण्याची चांगली संधी या दृष्टीने, येशू, त्याने जकातदार व पापी लोकांकडील जेवणाची निमंत्रणे स्वीकारली होती, त्याचप्रमाणे याही आमंत्रणाचा स्वीकार तो करतो. परंतु तो शिमोनाच्या घरात प्रवेश करतो तेव्हा, सर्वसाधारणपणे पाहुण्यांचे जसे हार्दिक स्वागत केले जाते तसे त्याचे केले जात नाही.

धुळीच्या रस्त्यावर चालल्यामुळे चपला घातलेले पाय उष्ण होतात व धुळीने माखतात. त्यामुळे पाहुण्यांचे पाय थंड पाण्याने धुणे ही आदरातिथ्याच्या नेहमीची पद्धत आहे. परंतु येशू आल्यावर त्याचे पाय धुतले जात नाहीत. तसेच सर्वसाधारण शिष्टाचाराप्रमाणे त्याला स्वागतपर चुंबनही दिले जात नाही. शिवाय आदरातिथ्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याच्या केसासाठी तेलही दिले जात नाही.

जेवणाच्या वेळी टेबलाभोवती सर्व पाहुणे रेलून बसलेले असताना एक स्त्री गुपचूप त्या खोलीत येते. तिचे जीवन अनैतिक असल्याचे गावात माहीत आहे. कदाचित तिने येशूची शिकवण ऐकली असावी. त्यामध्ये ‘सर्व भाराक्रांत लोकांना विसाव्यासाठी त्याच्याकडे येण्याचे’ निमंत्रण होते. आणि तिने पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टींमुळे अतिशय प्रभावीत होऊन ती आता येशूच्या शोधात आली आहे.

ती स्त्री, टेबलापाशी, येशूच्या मागे येते व त्याच्या पायाशी बसते. तिचे अश्रू त्याच्या पायावर पडतात तसे ती ते आपल्या केसांनी पुसते. तसेच आपल्याजवळच्या कुपीतून सुवासिक तेल घेऊन, त्याच्या पायांचा मायेने मुका घेऊन, त्यांना ते तेल लावते. या सर्व गोष्टी शिमोनाला मुळीच पसंत पडत नाहीत. तो विचार करतो: “हा माणूस संदेष्टा असता तर आपल्याला शिवणारी स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे याला कळले असते.”

त्याचे विचार ओळखून येशू म्हणतोः “शिमोना, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.”

“गुरुजी, बोला.” तो उत्तरतो.

येशू बोलू लागतोः “एका सावकाराचे दोन कर्जदार होते. एकाला पाचशे रुपये देणे होते व एकाला पन्‍नास होते. देणे फेडावयास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांस ते सोडले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?”

हा प्रश्‍न अप्रासंगिक वाटल्याने शिमोन बेपर्वाईने म्हणतोः “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.”

येशू म्हणतोः “बरोबर ठरवले.” मग, त्या स्त्रीकडे वळून तो शिमोनाला म्हणतोः “तुम्ही या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही. परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही. परंतु, मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही. परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लावले.”

अशा रितीने, त्या स्त्रीने आपल्या गतकाळच्या अनैतिक कृत्यांचा पश्‍चाताप झाल्याचा पुरावा दिला आहे. त्यामुळे शेवटी येशू म्हणतोः “ह्‍या कारणास्तव, मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे. कारण हिने फार प्रीती केली. ज्याला थोडक्यांची क्षमा झाली आहे तो थोडकी प्रीती करतो.”

येथे येशू अनैतिकतेला मुभा वा मान्यता देत नसून, जे लोक जीवनात चुका करतात, पण मग त्यांच्याबद्दल पश्‍चाताप प्रकट करून मदतीसाठी येशूकडे येतात अशा लोकांबद्दल येशूची दयापूर्ण जाण या प्रसंगातून दिसून येते. त्या स्त्रीला खरा विसावा पुरवीत येशू म्हणतोः “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे . . . तुझ्या विश्‍वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.” लूक ७:३६-५०; मत्तय ११:२८-३०.

▪ येशूचे त्याच्या यजमानाकडून, शिमोनाकडून कसे स्वागत होते?

▪ येशूचा शोध कोण घेते व का?

▪ येशू कोणते उदाहरण देतो व तो ते कसे लागू करतो?