व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दाखल्यांनी शिकवणे

दाखल्यांनी शिकवणे

अध्याय ४३

दाखल्यांनी शिकवणे

येशूने परुशांची कानउघाडणी केली तेव्हा तो बहुधा कफर्णहूमात असावा. त्याच दिवशी काही वेळानंतर तो ते घर सोडून जवळच्या गालील समुद्राकडे चालत जातो. तेथे लोकांचा समुदाय गोळा होतो. तेथे तो एका मचव्यात बसतो, मचवा किनाऱ्‍यापासून दूर नेतो व किनाऱ्‍यावरील लोकांना स्वर्गाच्या राज्याबद्दल शिकवू लागतो. अनेक दाखल्यांचा वा दृष्टांतांच्या मदतीने तो शिकवतो. प्रत्येक दाखल्याची पार्श्‍वभूमि लोकांच्या परिचयाची आहे.

प्रथम येशू बी पेरणाऱ्‍याबद्दल सांगतो. काही बी रस्त्याच्या कडेला पडते व त्याला पक्षी खातात. काही बी खडकाळ जमिनीवर पडते. तेथे रुजलेल्या बीला मूळ धरण्यास माती न मिळाल्याने ते कडक उन्हात वाळून जाते. आणखी काही बी काटेरी झुडपात पडते. काटे त्याची वाढ खुंटवतात. शेवटी काही बी उत्तम जमिनीत पडते. ते काही शंभरपट, काही साठपट तर काही तीसपट पीक देते.

आणखी एका दाखल्यात येशू देवाच्या राज्याची तुलना बी पेरणाऱ्‍या माणसाशी करतो. माणूस झोपतो, उठतो तसे दिवस जातात व बी रुजते व वाढते. पण ही गोष्ट कशी होते ते त्या माणसाला कळत नाही. ते स्वतःहून वाढते व धान्य पिकवते. पीक तयार झाल्यावर तो माणूस त्याची कापणी करतो.

येशू एक तिसरा दाखला देतो. त्यात एक माणूस गव्हाचे चांगले बी पेरतो. परंतु, “लोक झोपेत असताना,” एक वैरी येऊन त्या गव्हात निदण पेरून जातो. या माणसाचे चाकर त्याला विचारतात की त्यांनी निदण उपटून टाकावे का? पण तो उत्तर देतोः “नाही, तुम्ही निदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग, कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्‍यांना सांगेन की पहिल्याने निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”

किनाऱ्‍यावरील जनसमुदायाला भाषण देत येशू आणखी दोन दाखले देतो. तो खुलासा करतो की, “स्वर्गाचे राज्य” एका माणसाने पेरलेल्या मोहरीच्या दाण्याप्रमाणे आहे. तो म्हणतो की, ते सर्वात लहान बी असले तरी ते वाढले म्हणजे सर्व भाज्यांपेक्षा मोठे होते. त्याच्या फांद्यांवर पक्षांना वस्ती मिळते असा तो वृक्ष होतो.

मोहरीच्या दाण्यापेक्षा लहान बी असते असा आक्षेप आज काही लोक घेतात. परंतु येथे येशू वनस्पतीशास्त्रावर धडा देत नव्हता. त्याच्या दिवसातील गालीलकरांना परिचय असलेल्या बियांपैकी, मोहरीचा दाणा हा खरोखरच सर्वात लहान असल्याचे माहीत होते. त्यामुळेच येशू येथे चित्रित करीत असलेल्या प्रचंड वाढीबद्दल त्यांना जाण आहे.

शेवटी येशू, “स्वर्गाच्या राज्या”ची तुलना एका स्त्रीने तीन मापे पिठात मिसळलेल्या खमीराबरोबर करतो. तो म्हणतो, काही वेळाने ते खमीर कणकेच्या सर्व गोळ्याला आंबवून टाकते.

हे तीन दृष्टांत दिल्यानंतर येशू जमावाला निरोप देतो व मुक्कामाच्या घरी परततो. लवकरच त्याचे १२ प्रेषित व इतर तेथे त्याच्याकडे येतात.

येशूच्या दृष्टांतांपासून फायदा घेणे

समुद्र किनाऱ्‍यावर जनसमुदायाला भाषण दिल्यानंतर येशूकडे शिष्य येतात तेव्हा त्यांना या नव्या शिक्षणपद्धतीबद्दल कुतूहल वाटत आहे. दाखले देताना त्यांनी त्याची भाषणे आधी नक्कीच ऐकली आहेत. पण ते दाखले इतक्या विपुलतेने नव्हते. यासाठीचे ते विचारतातः “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?”

त्याने असे करण्याचे एक कारण म्हणजे, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन,” हे संदेष्ट्याचे शब्द पूर्ण व्हावे. पण त्यात याहूनही अधिक गोवलेले आहे. त्याने केलेल्या दाखल्यांच्या वापरामुळे लोकांच्या अंतःकरणाचा कल उघड होण्यास मदत होते.

प्रत्यक्षात प्रभु म्हणून ज्याची सेवा करावी व निःस्वार्थपणे अनुसरावा अशा दृष्टीने बहुतेक लोक त्याच्यात रस घेत नसून फक्‍त एक उत्तम कथा-निवेदक व चमत्कार करणारा या दृष्टीने त्याच्याकडे पाहात आहेत. त्यांचा दृष्टीकोण वा जीवनक्रम यात जराही फरक करण्याची त्यांची इच्छा नाही. त्याचा संदेश इतका खोलवर जावा अशी त्यांची इच्छा नाही.

यामुळे येशू म्हणतोः “मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलावे कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, “. . . कारण ह्‍या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे.”

“पण,” येशू पुढे म्हणतो, “धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खचित सांगतो की, तुम्ही जे पाहात आहा ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतीमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही. आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते तरी त्यांना ऐकावयास मिळाले नाही.”

होय, ते १२ प्रेषित व त्यांच्या बरोबर असलेल्यांची मने गुणग्राहक आहेत. यामुळे येशू म्हणतोः “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे. परंतु त्यांना दिलेले नाही.” समजून घेण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे येशू त्यांना पेरणाऱ्‍याच्या दाखल्याचा खुलासा करतो.

येशू म्हणतोः “बी हे देवाचे वचन आहे” व अंतःकरण ही माती आहे. रस्त्याच्या कडेवरील कठीण पृष्ठभागावर पेरलेल्या बीबद्दल तो सांगतो. “त्यांनी विश्‍वास ठेवू नये व त्यांस तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.”

उलटपक्षी, खडकाळ जमिनीवर पेरलेले बी, वचन आनंदाने स्वीकारणाऱ्‍या लोकांच्या अंतःकरणाला उद्देशून आहे. परंतु अशा अंतःकरणामध्ये वचनाला मूळ धरता येत नसल्याने परीक्षा वा छळाचा काळ आल्यास असे लोक मागे पडतात.

येशू पुढे म्हणतो की, काट्यांमध्ये पडलेले बी, वचन ऐकलेल्या लोकांना उद्देशून आहे. परंतु अशा लोकांवर चिंता, धन व जीवनाच्या सुखांचा फार परिणाम होतो व त्यामुळे त्यांची वाढ खुंटून ते कोणतीच गोष्ट पूर्णपणे करीत नाहीत.

शेवटी, येशू म्हणतो की, उत्तम मातीत पेरलेले बी म्हणजे वचन ऐकल्यावर ते निष्कपट व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवणारे व धीराने फळ देणारे लोक होत.

येशूकडे, त्याच्या शिकवणींचा खुलासा मिळण्यासाठी आलेले हे शिष्य किती धन्य! इतरांना सत्य कळावे म्हणून त्याचे दाखले समजावे अशी येशूची इच्छा आहे. तो विचारतोः “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय?” नाही. “दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात.” यासाठी येशू पुढे म्हणतोः “म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्‍याविषयी जपून राहा.”

अधिक शिक्षणाचे वरदान लाभणे

पेरणाऱ्‍याच्या दाखल्याचा खुलासा येशूकडून मिळाल्यावर त्याच्या शिष्यांना अधिक जाणण्याची इच्छा आहे. ते विनंती करतातः “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा.”

समुद्रकिनाऱ्‍यावरील इतर जमावापेक्षा या शिष्यांचा कल किती वेगळा आहे! त्यांच्यापुढे मांडलेल्या गोष्टींच्या नुसत्या रुपरेषेवर संतुष्ट असल्याने, लोकांमध्ये त्या दृष्टांतामागील अर्थ समजावून घेण्याच्या इच्छेची कमतरता आहे. समुद्र किनाऱ्‍यावरील त्या श्रोत्यांपेक्षा घरात त्याच्याकडे आलेल्या आपल्या शिष्यांची तुलना करताना येशू म्हणतोः

“ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल.” ते शिष्य येशूकडे उत्कट जिज्ञासेने लक्ष देत आहेत व म्हणून अधिक शिक्षण मिळण्याची कृपा त्यांच्यावर झाली आहे. या कारणामुळे आपल्या शिष्यांच्या चौकशीला उत्तरादाखल येशू खुलासा करतोः

“चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत.”

आपल्या दाखल्याच्या प्रत्येक वैशिष्ट्याची ओळख करून दिल्यावर येशू त्याचा परिणाम सांगतो. तो म्हणतो की, युगाच्या समाप्तीच्या वेळी कापणी करणारे वा देवदूत निदणासारख्या खोट्या ख्रिश्‍चनांना ‘राज्याच्या खऱ्‍या पुत्रां’पासून वेगळे करतील. मग, त्या दुष्टांच्या पुत्रांवर नाशासाठी लक्ष ठेवले जाईल परंतु देवाच्या राज्याचे पुत्र “नीतीमान” व्यक्‍ती आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.

यानंतर आपल्या चौकस शिष्यांना येशू आणखी तीन दृष्टांत देतो. प्रथम तो म्हणतोः “स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.”

पुढे तो म्हणतोः “आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्‍या कोणा एका व्यापाऱ्‍यासारखे आहे. त्याला एक अतिमोलवान मोती आढळला. मग, त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.”

येशू स्वतःच, लपवलेली ठेव सापडलेल्या माणसासारखा व अतिमोलवान मोती सापडलेल्या व्यापाऱ्‍यासारखा आहे. एक क्षूद्र मानव बनण्यासाठी स्वर्गातील गौरवी स्थान सोडून त्याने जणू सर्वस्व विकले. मग, पृथ्वीवरचा एक माणूस म्हणून तो निंदा व द्वेषपूर्ण छळ सहन करतो व देवाच्या राज्याचा शासक बनण्यास पात्र ठरतो.

त्याचप्रमाणे, ख्रिस्तासोबत सहशासक बनण्याचे वा राज्याचे पृथ्वीवरील प्रजाजन बनण्याचे मोठे प्रतिफळ मिळवण्यासाठी आपले सर्वस्व विकण्याचे आव्हान येशूच्या अनुयायांपुढे ठेवण्यात आले आहे. देवाच्या राज्यात सहभागी होणे हे एका अमूल्य ठेवीसारखे किंवा बहुमोल मोत्यासारखे, असे आपण, जीवनातील सर्व गोष्टींपेक्षा अधिक मूल्यवान समजू का?

शेवटी येशू, ‘स्वर्गाच्या राज्या’ला सर्व प्रकारचे मासे गोळा करणाऱ्‍या जाळ्याची उपमा देतो. मासे वेगळे केले जातात तेव्हा निरुपयोगी असलेले फेकून दिले जातात व चांगले असलेले जपले जातात. येशू म्हणतो, तसे युगाच्या समाप्तीला होईल. देवदूत नीतीमानांना दुष्टापासून वेगळे करतील व दुष्टांना नाशासाठी राखून ठेवतील.

आपल्या पहिल्या शिष्यांना “माणसे धरणारे” संबोधून येशू स्वतः हा मासे-माणसे-धरण्याचा उद्योग सुरु करतो. देवदूतांच्या देखरेखीखाली हे माणसे धरण्याचे काम शतकानुशतके चालते. शेवटी, पृथ्वीवर, ख्रिस्ती म्हणविणाऱ्‍या संस्थांना चित्रित करणारे “जाळे” गोळा करण्याची वेळ येते.

निरुपयोगी मासे नाश केले जात असले तरी जपून ठेवल्या जाणाऱ्‍या ‘चांगल्या माशां’मध्ये आपली गणना होऊ शकते. अधिक ज्ञान व समज यांच्यासाठी येशूच्या शिष्यांसारखी उत्कट इच्छा प्रकट केल्याने आपल्याला अधिक शिक्षणच नव्हे तर अनंत जीवनाच्या देवाच्या वरदानाचे भवितव्यही लाभेल. मत्तय १३:१-५२; मार्क ४:१-३४; लूक ८:४-१८; स्तोत्रसंहिता ७८:२; यशया ६:९, १०.

▪ येशू जनसमुदायाशी दाखल्यांनी कधी व कोठे बोलतो?

▪ येशू जमावाला कोणते पाच दाखले देतो?

▪ मोहरीचा दाणा सर्व बियांमध्ये लहान आहे असे येशू का म्हणतो?

▪ येशू दाखल्यांनी का बोलतो?

▪ येशूचे शिष्य, आपण जमावापेक्षा वेगळे असल्याचे कसे दर्शवतात?

▪ पेरणाऱ्‍याच्या दृष्टांताचा खुलासा येशू कसा देतो?

▪ समुद्रकिनाऱ्‍यावरील जमावापेक्षा येशूचे शिष्य कसे वेगळे आहेत?

▪ पेरणारा, शेत, चांगले बी, शत्रू, कापणी व कापणारे कोणाला वा कशाला चित्रित करतात?

▪ येशू कोणते तीन अधिक दाखले देतो व त्यापासून आपण काय शिकू शकतो?