व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या उजव्या हाताशी

देवाच्या उजव्या हाताशी

अध्याय १३२

देवाच्या उजव्या हाताशी

पेंटेकॉस्टला पवित्र आत्मा ओतला जाणे हा येशू स्वर्गात परतल्याचा पुरावा आहे. थोड्याच कालावधीनंतर स्तेफन या शिष्याला दिलेल्या दृष्टांतानेही सिद्ध होते की तो तेथे (स्वर्गात) आलेला आहे. स्तेफन, त्याच्या प्रामाणिक साक्षीसाठी दगडमार होण्याच्या जरा आधी असे उद्‌गारतोः “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”

देवाच्या उजव्या हाताशी असताना, “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर,” अशी आज्ञा आपल्या पित्याकडून मिळण्याची वाट येशू पाहतो. परंतु तो आपल्या शत्रूंविरुद्ध कृती करीपर्यंत, दरम्यान, येशू काय करतो? आपल्या शिष्यांच्या प्रचाराच्या कार्यात मार्गदर्शन करीत आणि पुनरुत्थानाद्वारे, त्याच्या पित्याच्या राज्यात त्याचे सहकारी राजे बनण्यासाठी त्यांना तयार करीत तो या अभिषिक्‍त शिष्यांवर राज्य अथवा अधिपत्य करतो.

उदाहरणार्थ, इतर देशांमध्ये शिष्य बनविण्याच्या कामात नेतृत्व करण्यासाठी तो शौलाची [कालांतराने हा पौल या त्याच्या रोमी नावाने प्रसिद्ध झाला] निवड करतो. शौलाला देवाच्या नियमशास्त्राबद्दल अतिशय आदर आहे; पण यहूदी धार्मिक नेत्यांकडून त्याची दिशाभूल झाली आहे. परिणामी शौलाला स्तेफनाचा वध मान्य होता, इतकेच नव्हे तर दिमिष्कमध्ये, येशूचे अनुयायी असणारे जे पुरुष व स्त्रिया त्याला आढळतील, त्यांना बांधून यरुशलेमामध्ये आणण्यासाठी प्रमुख याजक कयफाकडून अधिकारपत्र घेऊन तो जातो. परंतु शौल मार्गावर असताना अचानक त्याच्याभोवती प्रखर प्रकाश पडतो, आणि तो जमिनीवर कोसळतो.

एक अदृश्‍य स्रोतापासून येणारा आवाज विचारतोः “शौला, शौला, माझा छळ का करतोस?” तेव्हा शौल प्रतिप्रश्‍न करतोः “प्रभो, तू कोण आहेस?”

आता उत्तर येतेः “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.”

त्या अद्‌भूत प्रकाशाने अंधळ्या झालेल्या शौलाला, दिमिष्कमध्ये प्रवेश करून पुढील सूचनांची वाट पाहण्यास येशू सांगतो. मग, हनन्या नावाच्या आपल्या एका शिष्याला येशू एका दृष्टांतात दर्शन देतो. शौलाबद्दल येशू हनन्याला सांगतोः “परराष्ट्रीय, राजे व इस्राएलांची संतती ह्‍यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे.”

येशूच्या पाठबळाने, प्रचार व शिकवणींच्या कार्यामध्ये शौल [आता पौल म्हणून ओळखला जाणारा] आणि इतर सुवार्तिकांना खरोखर मोठे यश मिळत आहे. इतके की, दिमिष्कच्या वाटेवर पौलाला येशूचे दर्शन झाल्याच्या सुमारे २५ वर्षांनंतर पौल लिहितो की, ‘सुवार्ते’ची घोषणा “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” झालेली आहे.

आणखी बरीच वर्षे गेल्यावर येशू त्याच्या प्रिय प्रेषित योहानाला एक दृष्टांत-मालिका देतो. पवित्र शास्त्राच्या प्रकटीकरण या पुस्तकात योहानाने वर्णन केलेल्या या दृष्टांताद्वारे वस्तुतः येशू राज्य-सामर्थ्यासह परतल्याचे पहायला तो जिवंत असतो. योहान म्हणतो की, “आत्म्याने संचरित” झाल्यामुळे त्याला भविष्य काळातील ‘प्रभूच्या दिवसात’ आणले गेले. हा “दिवस” म्हणजे काय?

शेवटल्या काळाबद्दल येशूने स्वतः केलेल्या भविष्यवादासकट पवित्र शास्त्रातील भविष्यवादांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास स्पष्ट होते की, इतिहास घडविणाऱ्‍या १९१४ साली, होय, याच पिढीत तो ‘प्रभूचा दिवस’ सुरु झाला! तेव्हा, जाहीर गाजावाजा न करता आणि त्याच्या परतण्याबद्दल केवळ त्याच्या विश्‍वासू सेवकांना जाणीव असताना, येशू अदृश्‍यरित्या १९१४ मध्ये परतला. त्या साली आपल्या शत्रूंवर प्रभुत्व करण्याची आज्ञा यहोवाने येशूला दिली!

आपल्या पित्याची आज्ञा मानून येशू सैतान व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीवर फेकून देऊन स्वर्ग स्वच्छ करतो. हे दृष्टांतात घडताना पाहिल्यावर योहान एका स्वर्गीय वाणीची घोषणा ऐकतोः “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत.” होय, १९१४ मध्ये येशू राजा या नात्याने राज्य करू लागला आहे!

स्वर्गातील यहोवाच्या भक्‍तांसाठी ती किती उत्तम बातमी आहे! त्यांना आग्रहाने सांगण्यात येतेः “स्वर्गानो, व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा!” परंतु, पृथ्वीवर राहणाऱ्‍यांची कशी स्थिती आहे? स्वर्गातील तीच वाणी पुढे म्हणतेः “पृथ्वी व समुद्र यांच्यावर अनर्थ ओढवला आहे. कारण सैतान, आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”

सध्या आपण त्या उरलेल्या काळात आहोत. देवाच्या नवीन जगात प्रवेश करण्यासाठी वा नाश भोगण्यासाठी सध्या लोकांना वेगवेगळे केले जात आहे. खरी गोष्ट अशी की, ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली जगभर प्रचार केल्या जात असलेल्या सुवार्तेला तुम्ही कसा प्रतिसाद द्याल त्याच्याद्वारे तुमचे स्वतःचे भवितव्य आता ठरवले जात आहे.

लोकांना वेगवेगळे करणे संपले की, पृथ्वीवरून सैतानाची संपूर्ण व्यवस्था आणि तिला आधार देणाऱ्‍या सर्वांचे उच्चाटन करण्यासाठी येशू, देवाचा प्रतिनिधी म्हणून काम करील. पवित्र शास्त्रात हर्मगिदोन अथवा आर्मगिदोन म्हटलेल्या युद्धात सर्व दुष्टपणा निपटून काढण्याचे ध्येय येशू साध्य करील. त्यानंतर स्वतः यहोवा देवानंतर, विश्‍वामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला येशू, सैतान व त्याच्या दुरात्म्यांना धरून एक हजार वर्षांसाठी एका ‘अथांग डोहा’मध्ये, म्हणजेच मृत्युसारख्या निष्क्रियतेच्या स्थितीत बांधून घालील. प्रे. कृत्ये ७:५५-६०; ८:१-३; ९:१-१९; १६:६-१०; स्तोत्रसंहिता ११०:१, २; इब्रीकर १०:१२, १३; १ पेत्र ३:२२; लूक २२:२८-३०; कलस्सैकर १:१३, २३; प्रकटीकरण १:१, १०; १२:७-१२; १६:१४-१६; २०:१-३; मत्तय २४:१४; २५:३१-३३.

▪ येशूच्या स्वर्गारोहणानंतर तो कोठे असतो आणि तो कशाची वाट पाहतो?

▪ स्वर्गारोहणानंतर येशू कोणावर राज्य करतो आणि त्याचा अधिकार कसा प्रकट होतो?

▪ ‘प्रभुचा दिवस’ कधी सुरु झाला आणि त्याच्या सुरवातीला काय घडले?

▪ आज चालू असलेल्या वेगवेगळे करण्याच्या कोणत्या कामाचा आपल्या प्रत्येकावर वैयक्‍तीकरित्या प्रभाव पडत आहे, आणि हे वेगवेगळे करण्याचे काम कोणत्या आधारावर केले जात आहे?

▪ वेगवेगळे करण्याचे काम संपल्यावर कोणत्या घटना घडतील?