व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाने सांगितलेले सर्व येशू पूर्ण करतो

देवाने सांगितलेले सर्व येशू पूर्ण करतो

अध्याय १३३

देवाने सांगितलेले सर्व येशू पूर्ण करतो

लढवय्या राजा येशू ख्रिस्त सैतान व त्याच्या दुष्ट जगाला निपटून टाकील तेव्हा आनंदोत्सव करण्यासाठी किती उत्तम कारण असेल! शेवटी एकदाची येशूची हजार वर्षांची कारकीर्द सुरु होते!

येशू व त्याच्या सहकारी राजांच्या मार्गदर्शनाखाली, हर्मगिदोनातून वाचलेले लोक, त्या धर्मयुद्धाने मागे सोडलेले भग्नावशेष काढून टाकतील. बहुधा पृथ्वीवरील वाचलेल्या लोकांना काही काळ मुलेही होतील. आणि या पृथ्वीची एखादी सुंदर उपवनासारखी बाग करण्यासाठी कराव्या लागणाऱ्‍या आनंददायी मशागतीच्या कामात ती सहभागी होतील.

या सुंदर सुखलोकाचा आनंद लुटण्यासाठी येशू कोट्यावधी लोकांना यथाकाळी त्यांच्या कबरेतून बाहेर आणील. “कबरेतील सर्व माणसे . . . बाहेर येतील अशी वेळ येत आहे,” ही त्याने स्वतः दिलेली हमी पूर्ण करताना तो हे करील.

येशू ज्यांना पुनरुत्थान देईल अशांमध्ये, वधस्तंभावर त्याच्या शेजारी मेलेला तो पूर्वाश्रमीचा कुकर्मी माणूसही असेल. आठवण करा की, येशूने त्याला वचन दिले होतेः “आज मी तुला खचित सांगतो, तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” येशूबरोबर राज्य करण्यासाठी, राजा या नात्याने, त्या माणसाला स्वर्गाला नेले जाणार नाही; तसेच येशूही पुन्हा मनुष्य बनून पृथ्वीवरील सुखलोकात त्याच्याबरोबर राहणार नाही. तर येशू त्याला सुखलोकातील जीवनासाठी उठवील आणि पुढील पानावर सचित्र दाखवल्याप्रमाणे, त्याच्या भौतिक व आध्यात्मिक, दोन्ही गरजा पुरवल्या जातील याकडे लक्ष देईल या अर्थी येशू त्या पूर्वाश्रमीच्या कुकर्मी माणसाबरोबर असेल.

जरा विचार करा! येशूच्या प्रेमळ देखरेखीखाली सर्व मानवी कुटुंबे—हर्मगिदोनातून वाचलेले, त्यांची मुले आणि त्याला आज्ञाधारक राहणारे मृतातून पुनरुत्थान दिलेले कोट्यावधी लोक—मानवी पूर्णत्वात वाढत जातील. यहोवा देव आपला शाही पुत्र येशू ख्रिस्तामार्फत मानवजातीसोबत आध्यात्मिक रितीने वस्ती करील. योहानाने ऐकलेली वाणी म्हणतेः “तो [देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; यापुढे मरण हे नाही. शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत.” पृथ्वीवरील एकाही माणसाला दुःख किंवा आजार सोसावे लागणार नाहीत.

येशूच्या हजार वर्षांच्या कारकिर्दीच्या अंतापर्यंत देवाच्या मूळ उद्देशासारखी परिस्थिती असेल. त्यावेळी देवाने आदाम व हव्वा या पहिल्या मानवी जोडप्याला बहुगुणित होऊन पृथ्वी व्यापून टाकण्यास सांगितले होते. येशूच्या खंडणी बलिदानाचे फायदे प्रत्येकाला लागू केले जातील. आदामाच्या पापामुळे येणारा मृत्यु नाहीसा होईल!

अशा रितीने, यहोवाने येशूला सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याने साध्य केलेल्या असतील. त्यामुळे हजार वर्षांच्या शेवटी ते राज्य आणि पूर्णत्वाला आणलेले मानवी कुटुंब तो परत त्याच्या पित्याला सुपूर्त करील. मग, देव सैतान व त्याच्या दुरात्म्यांना मृत्युसारख्या निष्क्रियतेच्या अथांग डोहातून मुक्‍त करील.

हजार वर्षांच्या शेवटी सुखलोकामध्ये राहणारे बहुअंशी लोक, ज्यांच्या विश्‍वासाची परिक्षा झालेली नाही असे पुनरुत्थान पावलेले लोक असतील. मरण्याआधी त्यांना देवाची अभिवचने माहीतच नव्हती आणि त्यामुळे त्यांना त्या अभिवचनांवर विश्‍वास प्रदर्शित करता आला नाही. मग, पुनरुत्थान होऊन पवित्र शास्त्रातील सत्ये शिकवण्यात आल्यावर कोणताही विरोध नसल्याने सुखलोकात देवाची सेवा करणे त्यांना सोपे होते. पण देवाची सेवा करण्यात त्यांना रोखण्याची संधी सैतानाला दिली गेल्यास, परिक्षेत ते निष्ठावंत असल्याचे सिद्ध करतील का? या प्रश्‍नाचा छडा लावण्यासाठी सैतानाला मोकळे करण्यात येईल.

योहानाला दिलेले प्रकटीकरण स्पष्ट करते की, येशूच्या हजार वर्षांच्या कारकिर्दीनंतर काही अनिश्‍चित संख्येच्या लोकांना देवाच्या सेवेपासून परावृत्त करण्यामध्ये सैतान यशस्वी होईल. पण मग, शेवटची परिक्षा संपल्यावर सैतान व त्याचे दुरात्मे आणि ज्यांना गैरमार्गाला लावण्यात तो यशस्वी होतो त्या सर्वांना कायमचे नष्ट केले जाईल. उलटपक्षी, संपूर्णपणे पारखलेले व निष्ठावंत असे वाचलेले लोक सदासर्वकाळ त्यांच्या स्वर्गीय पित्याच्या आशीर्वादांचा उपभोग घेण्यासाठी जगात राहतील.

देवाची गौरवशाली उद्दिष्टे साध्य करण्यात येशूने महत्त्वाची भूमिका केली आहे आणि करीत राहील हे स्पष्ट आहे. देवाचा श्रेष्ठ स्वर्गीय राजा या नात्याने त्याने साध्य केलेल्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून आपण किती उत्तम भवितव्य उपभोगू शकू! तरीही माणूस असताना त्याने केलेल्या अनेक गोष्टी आपण विसरू शकत नाही.

येशू राजी-खुषीने पृथ्वीवर आला आणि त्याने त्याच्या पित्याबद्दल आपल्याला शिकवले. त्या पलिकडे त्याने देवाचे अनमोल गुण स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले. त्याचे उदात्त धैर्य व मर्दपणा, त्याची अतुलनीय विद्वत्ता, शिक्षक म्हणून त्याचे उत्कृष्ट नैपुण्य, त्याचे निडर नेतृत्त्व आणि त्याची प्रेमळ दया व दुसऱ्‍याच्या भावना अनुभवण्याची कुवत यांचा विचार करतो तेव्हा आपली हृदये हेलावतात. ज्या एकमेव गोष्टीमुळे आपल्याला जीवन मिळू शकते ती खंडणी देताना त्याने वर्णन करता येणार नाहीत अशा यातना कशा सहन केल्या ते आपण आठवतो तेव्हा त्याच्याबद्दलच्या आदराने आपली हृदये भरून येतात!

खरोखर, येशूच्या जीवनाच्या या अभ्यासात आपण एका अत्यंत विलक्षण माणसाला पाहिले आहे! त्याचे श्रेष्ठत्व स्पष्ट आणि प्रचंड आहे. हे सर्व आठवून, “पहा, हा माणूस!” या रोमी सुभेदार पंतय पिलाताच्या शब्दांची पुनरूक्‍ती करण्याची प्रेरणा आपल्याला होते. खरोखर “हा माणूस,” सर्व काळामधील सर्वश्रेष्ठ माणूस होय!

येशूच्या खंडणीच्या बलिदानाची तरतुद आपण स्वीकारल्यामुळे आदामाकडून वारशात मिळालेल्या पाप व मृत्युचे ओझे आपल्यावरुन काढून टाकता येते आणि येशू आपला “सनातन पिता” होऊ शकतो. सार्वकालिक जीवन प्राप्त करणाऱ्‍या सर्वांनी केवळ देवाचीच नव्हे तर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचीही माहिती मिळवून घेतली पाहिजे. या पुस्तकाचे वाचन आणि अभ्यास, तुम्हाला असे जीवनदायी ज्ञान मिळवण्यात साहाय्यक ठरो! १ योहान २:१७; १:७; योहान ५:२८, २९; ३:१६; १७:३; १९:५; लूक २३:४३; उत्त्पती १:२८; १ करिंथकर १५:२४-२८; प्रकटीकरण २०:१-३, ६-१०; २१:३, ४; यशया ९:६.

▪ हर्मगिदोनमधून वाचणाऱ्‍यांना व त्यांच्या मुलांना कोणता आनंदमय विशेषाधिकार असेल?

▪ हर्मगिदोनमधून वाचलेले आणि त्यांची मुले ह्‍यांच्या व्यतिरिक्‍त सुखलोकाचा उपभोग कोण घेईल आणि कोणत्या अर्थाने येशू त्यांच्याबरोबर असेल?

▪ हजार वर्षांनंतर कशी परिस्थिती असेल आणि तेव्हा येशू काय करील?

▪ अथांग डोहातून सैतानाला मोकळे का करण्यात येईल आणि शेवटी त्याचे व त्याला अनुसरणाऱ्‍या सर्वांचे काय होईल?

▪ येशू आपला “सनातन पिता” कसा होऊ शकेल?