व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्राक्षमळ्याच्या दाखल्याने वस्तुस्थिती उघडकीस आणणे

द्राक्षमळ्याच्या दाखल्याने वस्तुस्थिती उघडकीस आणणे

अध्याय १०६

द्राक्षमळ्याच्या दाखल्याने वस्तुस्थिती उघडकीस आणणे

येशू मंदिरात आहे. कोणत्या अधिकाराने तो गोष्टी करतो असा प्रश्‍न करणाऱ्‍या धार्मिक नेत्यांना त्याने नुकतेच गोंधळात टाकले आहे. आणि त्या गोंधळातून ते पुरते सावरण्यापूर्वीच तो म्हणतोः “तुम्हास काय वाटते ते सांगा बरे.” आणि त्यानंतर, ते खरे कशाप्रकारचे लोक आहेत हे एका दाखल्याद्वारे तो त्यांना दाखवतो.

येशू सांगतोः “एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणालाः ‘मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ त्याने उत्तर दिले, ‘जातो, महाराज.’ पण तो गेला नाही. मग, दुसऱ्‍याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले. पण तो म्हणाला, ‘मी नाही जात.’ तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. ह्‍या दोघातून कोणी बापाच्या इच्छप्रमाणे केले?”

“दुसऱ्‍या मुलाने,” असे त्याचे विरोधी उत्तर देतात.

तेव्हा येशू खुलासा करतोः “मी तुम्हास खचित सांगतो, जकातदार व कसबिणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात.” वस्तुतः जकातदार व कसबिणींनी सुरवातीला देवाची सेवा करण्यास नकार दिला होता. पण त्यानंतर दुसऱ्‍या मुलाप्रमाणे त्यांना पश्‍चाताप होऊन त्यांनी देवाची सेवा केली. या उलट, पहिल्या मुलाप्रमाणे धार्मिक नेते देवाची सेवा करण्याचा दावा करत होते. पण येशूने नमूद केल्याप्रमाणेः “योहान [बाप्तिस्मा करणारा] नीतीच्या मार्गाने तुम्हाकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवला नाही. जकातदार व कसबिणी ह्‍यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवावा असा नंतरही तुम्हाला पस्तावा झाला नाही.”

यानंतर येशू दाखवतो की, केवळ देवाची सेवा करण्यात हयगय हीच या धार्मिक पुढाऱ्‍यांची चूक नव्हे; तर वास्तविक ते दुष्ट व वाईट लोक आहेत. येशू सांगतोः “कोणीएक गृहस्थ होता. त्याने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला, आणि तो माळ्यांस लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले, कोणाला धोंडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठविले. त्यांच्याशीही ते तसेच वागले.”

तो “गृहस्थ” म्हणजे यहोवा देव. त्याने त्याच्या “द्राक्षमळ्या”च्या “माळ्यां”कडे पाठवलेले हे “दास” म्हणजे संदेष्टे होत. पवित्र शास्त्रात देवाचा “द्राक्षमळा” म्हटलेल्या इस्राएल राष्ट्राचे प्रमुख प्रतिनिधी म्हणजे ते माळी होत.

येशू पुढे स्पष्टीकरण देतो की, ते “माळी” “दासां”ना वाईट वागणूक देत असल्यामुळे व जिवे मारत असल्याने, “शेवटी, माझ्या मुलाचा ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणालेः ‘हा तर वारीस आहे. चला, आपण ह्‍याला जिवे मारू व ह्‍याचे वतन घेऊ.’ तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले.”

आता धार्मिक नेत्यांना उद्देशून येशू विचारतोः “द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो माळ्यांचे काय करील?”

धार्मिक नेते उत्तर देतातः “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील, आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्‍यांकडे तो द्राक्षमळा लावून देईल.”

यहोवा देवाच्या इस्राएल राष्ट्राच्या “द्राक्षमळ्या”च्या इस्राएली “माळ्यां”मध्ये त्यांचा समावेश असल्यामुळे, अजाणतेपणाने ते स्वतःचा न्याय करतात. खरा मशीहा असलेल्या आपल्या मुलावर त्यांनी विश्‍वास ठेवावा, अशा फळाची या माळ्यांकडून यहोवाची अपेक्षा आहे. अशी फळे देण्यात उणे पडल्याबद्दल येशू इशारा देतोः “‘बांधणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला तो कोपऱ्‍याचा मुख्य झाला आहे. ही यहोवाची करणी आहे हे आमच्या दृष्टीने आश्‍चर्यकारक आहे,’ असे शास्त्रात [स्तोत्रसंहिता ११८:२२, २३ मध्ये] तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल, तिला ते दिले जाईल. परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.”—न्यू.व.

येशू आपल्याच बद्दल बोलत आहे असे आता शास्त्री व प्रमुख याजकांच्या ध्यानात येते व त्याला, कायदेशीर “वारसा”ला, मारण्याची त्यांची इच्छा सुप्त होते. या कारणामुळे देवाच्या राज्यात शास्ते होण्याचा विशेषाधिकार एक राष्ट्र या नात्याने त्यांच्यापासून काढून घेतला जाईल व योग्य ती फळे देणाऱ्‍या ‘द्राक्षमळ्याच्या माळ्यां’चे एक नवे राष्ट्र निर्माण करण्यात येईल.

येशूला संदेष्टा मानणाऱ्‍या जमावाला ते धार्मिक नेते घाबरत असल्याने, या प्रसंगी ते येशूला मारण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मत्तय २१:२८-४६; मार्क १२:१-१२; लूक २०:९-१९; यशया ५:१-७.

▪ येशूच्या पहिल्या दाखल्यातील दोन मुले कोणाला चित्रित करतात?

▪ दुसऱ्‍या दाखल्यामध्ये “गृहस्थ,” “द्राक्षमळा,” “माळी,” “दास,” व “वारस” कोणाचे प्रतिनिधित्व करतात?

▪ ‘द्राक्षमळ्याच्या माळ्यां’चे काय होईल व कोण त्यांची जागा घेतील?