व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धन्यतेचा स्रोत

धन्यतेचा स्रोत

अध्याय ७५

धन्यतेचा स्रोत

गालीलातील सेवाकार्यात येशूने चमत्कार केले व आता तो यहूदीयात त्यांची पुनरावृत्ती करतो. उदाहरणार्थ, बोलू न देणाऱ्‍या भूताला तो एका माणसातून काढून टाकतो. जनसमुदाय आश्‍चर्यचकित होतो; पण गालीलातील टिकाकारांप्रमाणेच हेही आक्षेप घेतात. ते दावा करतातः “भूतांचा अधिपती, जो बालजबूल, त्याच्या साहाय्याने हा भूते काढतो.” त्याची ओळख पटवण्यासाठी इतर लोकांना अधिक पुरावा हवा असतो व स्वर्गीय चिन्ह मागून ते त्याची परिक्षा घेण्याचा प्रयत्न करतात.

त्यांचे विचार माहीत असल्यामुळे गालीलातील टिकाकारांना त्याने दिलेले उत्तरच तो यहूदीयातील टिकाकारांना देतो. तो म्हणतो की, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य कोसळेल. यास्तव तो विचारतोः “सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल?” “परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुम्हावर आले आहे,” असे म्हणून तो त्याच्या टिकाकारांची असुरक्षित स्थिती दाखवतो.

अनेक शतकांपूर्वी मोशाने केलेले चमत्कार पाहणाऱ्‍यांनी दाखवली तशी प्रतिक्रिया येशूचे चमत्कार पाहणाऱ्‍यांनी दाखवली पाहिजे. मोशाचे चमत्कार पाहणारे उद्‌गारले होतेः “यात देवाचा हात आहे!” दगडाच्या पाट्यांवर दहा आज्ञा कोरणारेही ‘देवाचे बोट’ होते. तसेच भूते काढण्यास व आजाऱ्‍यांना बरे करण्यास येशूला सामर्थ्य देणारे ‘देवाचे बोट’च त्याचा पवित्र आत्मा किंवा क्रियाशील शक्‍ती आहे. तेव्हा देवाच्या राज्याने या टिकाकारांना खरोखरच गाठले आहे, कारण त्या राज्याचा नियुक्‍त राजा, येशू, अगदी त्यांच्यामध्येच आहे.

जसा एखादा बलवान माणूस येतो व स्वतःचे घर राखणाऱ्‍या सशस्त्र माणसावर मात करतो तसे भूते काढण्याची त्याची कुवत हा सैतानावरील त्याच्या श्रेष्ठपणाचा पुरावा असल्याचे येशू उदाहरणाने सिद्ध करतो. तसेच गालीलात एका अशुद्ध आत्म्याबद्दल सांगितलेल्या दाखल्याची तो पुनरावृत्ती करतो. तो आत्मा एका माणसाला सोडतो. पण त्या माणसाने ती पोकळी चांगल्या गोष्टींनी भरून न काढल्यामुळे तो आत्मा आणखी सात जणांसह परत येतो व त्या माणसाची शेवटली दशा सुरवातीपेक्षा वाईट होते.

या शिकवणी ऐकत असताना त्या जनसमुदायातील एक स्त्री मोठ्याने म्हणतेः “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखली ती धन्य!” एखाद्या संदेष्ट्याची व विशेषतः मशीहाची माता होण्याची प्रत्येक यहुदी स्त्रीची इच्छा असल्यामुळे या स्त्रीने असे म्हणावे हे साहजिक आहे. येशूची आई असल्याने मरीया विशेष धन्य असावी, असे बहुधा तिला वाटले असे दिसते.

परंतु, धन्यतेच्या खऱ्‍या स्रोताविषयी येशू त्या स्त्रीची चूक तात्काळ दुरुस्त करतो. तो म्हणतोः “पण, त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य!” त्याची आई मरीया हिला विशेष आदर द्यावा असे येशूने कधी आडवळणानेही सुचवले नाही. त्याऐवजी, नातेसंबंध किंवा अनेक कौशल्ये किंवा कामे साध्य केल्याने नव्हे तर देवाचा विश्‍वासू दास होण्यामुळे खरी धन्यता मिळते असे त्याने दाखवले.

गालीलात त्याने लोकांना दोष दिला तसा स्वर्गीय चिन्ह मागणाऱ्‍या यहूदीयातील लोकांनाही तो दोष देतो. योनाच्या चिन्हाशिवाय इतर कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही असे तो त्यांना सांगतो. माशाच्या पोटात तीन दिवस घालवल्याने तसेच निनवेकरांना पश्‍चातापाला प्रवृत्त करणाऱ्‍या त्याच्या साहसी प्रचाराने योना एक चिन्ह बनला. येशू म्हणतोः “आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.” तसेच शिबाच्या राणीला शलमोनाच्या विद्वत्तेचे नवल वाटले. येशू म्हणतोः “आणि पहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.”

येशू खुलासा करतो की, एखादा माणूस दिवा पेटवतो तेव्हा तो त्याला तळघरात किंवा टोपल्याखाली ठेवत नाही, तर लोकांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो. त्याच्या श्रोत्यांमध्ये असलेल्या या हटवादी लोकांपुढे चमत्कार करणे किंवा त्यांना शिकवणे म्हणजे दिवा लपवून ठेवण्यासारखे आहे असे कदाचित तो सूचित करीत आहे. अशा प्रेक्षकांचे डोळे निर्दोष किंवा लक्षावर केंद्रित नाहीत व त्यामुळे त्याच्या चमत्कारांचा निहित हेतू साध्य होत नाही.

येशूने नुकतेच एक भूत काढले आहे व एका मुक्या माणसाला बोलते केले आहे. त्यामुळे निर्दोष व लक्षावर केंद्रित दृष्टी असलेल्या लोकांनी या उत्कृष्ट कामाची स्तुती करण्यास व सुवार्तेची घोषणा करण्यास प्रवृत्त व्हायला हवे! परंतु या टिकाकारांच्या बाबतीत तसे होत नाही. म्हणून येशू समारोप करतोः “तेव्हा तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पहा. तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधारमय नसेल तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.” लूक ११:१४-३६; निर्गम ८:१८, १९; ३१:१८; मत्तय १२:२२, २८.

▪ येशूने त्या माणसाला बरे करण्यावर काय प्रतिक्रिया होते?

▪ ‘देवाचे बोट’ काय आहे आणि देवाच्या राज्याने येशूच्या श्रोत्यांना कसे गाठले होते?

▪ खऱ्‍या धन्यतेचा मूळ स्रोत काय आहे?

▪ एखाद्या व्यक्‍तीला निर्दोष डोळा कसा असू शकेल?