व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नम्रतेचा धडा

नम्रतेचा धडा

अध्याय ६२

नम्रतेचा धडा

फिलिप्पाच्या कैसरियाजवळच्या प्रदेशात भूतग्रस्त मुलाला बरे केल्यावर, कफर्णहूमाला घरी परतण्याची येशूची इच्छा आहे. परंतु त्याचा मृत्यु व त्यानंतरच्या जबाबदाऱ्‍यांबद्दल त्यांची अधिक तयारी करून देता यावी म्हणून, या प्रवासात आपल्या शिष्यांसह एकांतात असण्याची त्याची इच्छा आहे. तो त्यांना खुलासा करतोः “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्‍या दिवशी तो पुन्हा उठेल.”

या बाबतीत येशू यापूर्वी बोलला होता व येशूचे रुपांतर व त्यावेळी त्याच्या “निर्गमना”ची झालेली चर्चा या गोष्टी तीन प्रेषितांनी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. तरीही, या गोष्टींबद्दल त्याच्या अनुयायांना अजूनही समज आलेली नाही. मागे पेत्राने नाकारले तसे तो मारला जाईल हे नाकारण्याचा प्रयत्न कोणी करीत नाही. तरी त्याबद्दल अधिक विचारण्यास ते भितात.

येशूच्या सेवाकार्याचा एक प्रकारे प्रमुख तळ झालेल्या कफर्णहूमाला अखेरीस ते येतात. पेत्र व इतर अनेक प्रेषितांचे ते मूळ गाव देखील आहे. तेथे मंदिराची पट्टी वसूल करणारे लोक पेत्राकडे येतात. कदाचित सर्वमान्य रुढी मोडण्यामध्ये येशूला गोवण्याच्या प्रयत्नात ते विचारतातः “तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय?”

पेत्र म्हणतो: “हो, देतो.”

येशू यानंतर थोड्याच वेळाने त्या घरात आला असावा. झालेल्या घटनेची त्याला जाणीव आहे; म्हणून पेत्राने विषय काढण्यापूर्वीच येशू विचारतोः “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणाकडून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून?”

पेत्र उत्तर देतोः “परक्यांपासून.”

“तर पुत्र मोकळे आहेत,” असे येशू म्हणतो. मंदिरात ज्याची भक्‍ती होते तो येशूचा पिता विश्‍वाचा राजा असल्यामुळे खरे तर देवाचा पुत्र पट्टी देण्यास कायद्याने बांधलेला नाही. येशू म्हणतोः “तथापि, आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”

कफर्णहूमाला परतल्यावर, कदाचित पेत्राच्या घरी शिष्य एकत्र जमतात तेव्हा ते विचारतातः “स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण?” त्यांनी हा प्रश्‍न का विचारला ते येशूला माहीत आहे. फिलिप्पाच्या कैसरियाहून परत येताना, त्याच्या मागे चालत असताना, त्यांच्यामध्ये आपसात काय चालले होते याची त्याला जाणीव आहे. त्यामुळेच तो विचारतोः “तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता?” ओशाळून शिष्य उगे राहतात. कारण सर्वात मोठा कोण ह्‍याबद्दल त्यांची वाटेत चर्चा चालली होती.

येशूच्या जवळजवळ तीन वर्षांच्या शिकवणीनंतर देखील शिष्यांमध्ये असला विवाद व्हावा यावर विश्‍वास ठेवणे कठीण वाटते का? यात, मानवी असिद्धता व धार्मिक पूर्वपीठिका यांचा प्रखर परिणाम दिसून येतो. शिष्य ज्या यहुदी धर्मात वाढले त्यात सर्व बाबतीत पद व स्थानावर भर दिला जात असे. शिवाय राज्याच्या काही “किल्ल्या” मिळण्याबद्दल येशूने वचन दिल्यामुळे आपण वरचढ असल्याचे पेत्राला वाटले. येशूचे रुपांतर पाहण्याची विशेष कृपा झाल्याने याकोब व योहानाच्या देखील मनात तशाच कल्पना आल्या असाव्या.

ते काहीही असो, त्यांचा कल सुधारण्यासाठी येशू काळजाला भिडणारे एक प्रदर्शन देतो. तो एका बालकाला बोलावतो, त्यांच्यामध्ये उभे करतो, त्याला मिठीत घेतो व म्हणतोः “तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्‍यास्तव, जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या सर्वात मोठा होय; आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो.”

शिष्यांची चूक सुधारण्याचा हा किती अद्‌भुत मार्ग! येशू त्यांच्यावर संतापत नाही व त्यांना गर्विष्ठ, लोभी वा महत्त्वाकांक्षी म्हणत नाही. तर नम्रता ज्यांचा गुणविशेष असतो, महत्त्वाकांक्षेपासून जी मुक्‍त असतात व सर्वसाधारणपणे ज्यांच्या मनात आपसातील उच्च-नीच पदाचे विचारही नसतात, अशा लहान बालकांचे उदाहरण देऊन तो सुधारणा करण्याच्या शिकवणीचे स्पष्टीकरण करतो. अशा रितीने नम्र बालकाचे वैशिष्ट्य असलेले हे गुण, आपल्या शिष्यांनी जोपासण्याची गरज असल्याचे येशू दाखवतो. समारोप करताना येशू म्हणतोः “तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.” मत्तय १७:२२-२७; १८:१-५; मार्क ९:३०-३७; लूक ९:४३-४८.

▪ कफर्णहूमला परतल्यावर येशू कोणत्या शिकवणीची पुनरावृत्ती करतो व त्याचा शिष्यांवर काय परिणाम होतो?

▪ मंदिराची पट्टी भरण्याचे बंधन येशूवर का नाही, पण तरीही तो ती का भरतो?

▪ शिष्यांमधील वादाचे कारण कदाचित काय असावे व येशू त्यांना कसे सुधारतो?