व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निकदेमास शिक्षण

निकदेमास शिक्षण

अध्याय १७

निकदेमास शिक्षण

.स. ३०च्या वल्हांडण सणाला उपस्थित असताना येशू उल्लेखनीय चिन्हे व चमत्कार करतो. परिणामी, अनेक लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवतात. सन्हेद्रीन या यहुदी उच्च न्यायालयाचा सभासद निकदेम प्रभावीत होतो व त्याला अधिक माहिती मिळविण्याची इच्छा होते. तो रात्रीच्या अंधारात येशूची भेट घेतो. कोणी पाहिल्यास इतर यहुदी पुढाऱ्‍यात आपली बदनामी होईल अशी कदाचित त्याला भीती असावी.

तो म्हणतोः “गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहा हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता ती, देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.” उत्तरादाखल येशू निकदेमाला सांगतो की, देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्‍तीला ‘पुन्हा जन्मले’ पाहिजे.

पण एखाद्या व्यक्‍तीला पुन्हा जन्मणे कसे शक्य आहे? निकदेम विचारतोः “त्याला मातेच्या उदरात दुसऱ्‍यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?”

नाही, पुन्हा जन्मण्याचा तो अर्थ नव्हे. येशू समजावतो, “पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.” जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला व पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला तेव्हा त्याचा “पाण्यापासून व आत्म्यापासून” जन्म झाला. त्यासोबत, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे,” अशा स्वर्गातून झालेल्या घोषणेने, स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्याची भावी आशा असलेला पुत्र आपण उत्पन्‍न केला असल्याचे देवाने जाहीर केले. पुढे इ. स. ३३च्या पेंटेकॉस्ट सणाच्या वेळी बाप्तिस्मा झालेल्या इतरांना पवित्र आत्मा मिळेल व अशा रितीने ते देखील देवाचे आध्यात्मिक पुत्र म्हणून जन्म घेतील.

परंतु, देवाच्या विशेष मानवी पुत्राची भूमिका महत्त्वाची आहे. येशू निकदेमाला सांगतोः “जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, ह्‍यासाठी की जो कोणी विश्‍वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” होय, जीव वाचविण्यासाठी त्या विषारी साप चावलेल्या इस्राएली लोकांना जसे त्या तांब्याच्या सापाकडे पहावे लागत होते तसे आपल्या मरणोन्मुख स्थितीतून वाचण्यासाठी सर्व मानवांनी देवाच्या पुत्रावर विश्‍वास ठेवला पाहिजे.

यातील यहोवाच्या प्रेमळ भूमिकेवर भर देताना येशू निकदेमाला पुढे सांगतोः “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” अशा रितीने, येथे यरुशलेममध्ये, त्याचे सेवाकार्य सुरु झाल्यापासून केवळ सहा महिन्यांनी, येशूने स्पष्ट केले की, तो, मानवजातीला वाचवण्याचे देवाचे साधन आहे.

येशू पुढे निकदेमाला समजावतोः “देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी पाठवलेले नाही,” म्हणजे त्याला शिक्षा करण्यासाठी, दोषी ठरवून मानवजातीला नाशाची शिक्षा ठोठावण्यासाठी पाठवलेले नाही. उलट, येशूने म्हटल्याप्रमाणे “त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे” म्हणून पाठवले होते.

निकदेम रात्रीच्या अंधाराच्या बुरख्याखाली घाबरत येशूकडे आला आहे. म्हणून येशू निकदेमासह आपले संभाषण जसे संपवतो ते विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. तो म्हणतोः “निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश [ज्याचे मूर्तिमंत उदाहरण येशूच्या जीवनात व शिकवणीत आहे] आला आहे. आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, ह्‍यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.” योहान २:२३–३:२१; मत्तय ३:१६, १७; प्रे. कृत्ये २:१-४; गणना २१:९.

▪ निकदेम कोणत्या कारणाने भेटीस येतो व तो रात्री का येतो?

▪ ‘पुन्हा जन्मणे’ याचा काय अर्थ होतो?

▪ येशू, तारणातील स्वतःची भूमिका उदाहरणाने कशी स्पष्ट करतो?

▪ येशू जगाचा न्याय करण्यासाठी आला नव्हता याचा अर्थ काय?