व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परुशांचा मूढ विश्‍वास

परुशांचा मूढ विश्‍वास

अध्याय ७१

परुशांचा मूढ विश्‍वास

परुशांपुढे बोलावल्यामुळे, पूर्वी अंधळा असलेल्या भिकाऱ्‍याचे आईवडील घाबरतात. येशूवर जो कोणी विश्‍वास व्यक्‍त करील त्याला सभेतून बहिष्कृत करण्यात येईल असे ठरल्याचे त्यांना माहीत आहे. अशा प्रकारे, समाजातील इतरांशी संबंध तुटल्यामुळे, विशेषतः एखाद्या गरीब कुटुंबावर अतिशय आपत्ती ओढवू शकते. या कारणाने ते आईवडील जपून आहेत.

परुशी त्यांना विचारतातः “तुमचा जो मुलगा अंधळा जन्मला असे म्हणता तो हाच काय? तर आता त्याला दृष्टी कशी आली?”

ते आईवडील खात्रीने सांगतातः “हा आमचा मुलगा आहे व तो अंधळा जन्मला हे आम्हाला ठाऊक आहे. तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला ठाऊक नाही. किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हाला ठाऊक नाही.” घडलेल्या सर्व गोष्टी त्यांच्या मुलाने त्यांना नक्कीच सांगितल्या असतील. पण धोरणीपणे ते आईवडील म्हणतातः “त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल.”

त्यामुळे परुशी त्या माणसाला पुन्हा बोलावतात. या वेळी, येशूच्या विरुद्ध गुन्हा शाबीत करणारा पुरावा त्यांनी गोळा केला असल्याचे दर्शवून ते त्याला धाक धपटशा दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतातः “देवाचे गौरव कर. तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला ठाऊक आहे.”

पूर्वी अंधळा असलेला तो माणूस त्यांचा आरोप न नाकारता म्हणतोः “तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही.” तो पुढे म्हणतोः “पण एक गोष्ट मला ठाऊक आहे की मी पूर्वी अंधळा होतो व आता मला दिसते.”

त्याच्या बोलण्यात दोष काढण्यासाठी परुशी पुन्हा विचारतातः “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”

तक्रारीच्या सुरात तो माणूस म्हणतोः “आत्ताच मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही. पुन्हा ऐकायची इच्छा का करता?” उपरोधाने तो विचारतोः “तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय?”

या उत्तराने परुशांना संताप येतो. ते आरोप करतातः “तू त्याचा शिष्य आहेस. आम्ही मोशेचे शिष्य आहो. देव मोशाबरोबर बोलला आहे हे आम्हाला ठाऊक आहे. हा कोठला आहे हे आम्हाला ठाऊक नाही.”

तो दीन भिकारी नवल व्यक्‍त करीत म्हणतोः “हेच तर मोठे आश्‍चर्य आहे की तो कोठला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. पण त्याने तर माझे डोळे उघडले.” यापासून काय निष्कर्ष काढावा? तो भिकारी सर्वमान्य गृहिताकडे लक्ष वेधवितोः “आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही. तर जो कोणी देवाचा भक्‍त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते.” यावरुन निष्कर्ष उघड असला पाहिजेः “हा देवापासून नसता तर ह्‍याला काही करता आले नसते.”

अशा सरळ व स्पष्ट युक्‍तीवादाला परुशांजवळ उत्तर नाही. त्यांना सत्याला तोंड देता येत नाही; म्हणून ते त्या माणसाची निंदा करतातः “तू सर्वस्वी पापात जन्मलास, आम्हाला शिकवतोस काय?” त्यानंतर ते त्याला बाहेर घालवतात, सभाबहिष्कृत करतात असे दिसते.

त्यांनी जे केले ते येशूला कळल्यावर तो त्या माणसाला शोधतो व म्हणतोः “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्‍वास ठेवतोस काय?”

अधिक स्पष्टीकरण मिळावे या उद्देशाने तो पूर्वी अंधळा असलेला भिकारी विचारतोः “महाराज, मी विश्‍वास ठेवावा असा तो कोण आहे?”

येशू उत्तर देतोः “तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”

तत्काळ तो येशूला नमन करतो व म्हणतोः “प्रभूजी, मी विश्‍वास ठेवतो.”

मग, येशू खुलासा करतोः “मी न्यायनिवाड्यासाठी ह्‍या जगात आलो आहे; ह्‍यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे व ज्यांना दिसते त्यांनी अंधळे व्हावे.”

तेव्हा हे ऐकणारे परुशी विचारतातः “आम्हीही अंधळे आहोत काय?” मनाने अंधळे असल्याचे त्यांनी कबूल केल्यास, ते येशूला करीत असलेल्या विरोधाला काही सबब मिळाली असती. येशू त्यांना सांगतोः “तुम्ही अंधळे असता तर तुम्हाला पाप लागले नसते.” तथापि, आपण अंधळे नसून आपल्याला आत्मिक ज्ञानाची गरज नाही असा आग्रह ते निष्ठुरपणे करतात. या कारणास्तव येशू त्यांना म्हणतोः “परंतु, आम्हाला दिसते असे तुम्ही आता म्हणता म्हणून तुमचे पाप तसेच राहते.” योहान ९:१९-४१.

▪ परुशांपुढे बोलावल्यावर पूर्वी अंधळा असलेल्या भिकाऱ्‍याच्या आईवडीलाला भीती का वाटते व त्यामुळे ते कसे जपून उत्तर देतात?

▪ पूर्वी अंधळा असलेल्या माणसाला परुशी कसा धाक-धपटशा दाखवण्याचा प्रयत्न करतात?

▪ त्या माणसाच्या कोणत्या तर्कशुद्ध युक्‍तीवादाने परुशांना संताप येतो?

▪ येशूला त्यांनी केलेल्या विरोधाबद्दल परुशांना काही सबब का सांगता येत नाही?