व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परुशाचा पाहुणचार

परुशाचा पाहुणचार

अध्याय ८३

परुशाचा पाहुणचार

येशू अजूनही एका प्रतिष्ठित परुशाच्या घरी असून, जलोदराने आजारी असलेल्या एका माणसाला त्याने नुकतेच बरे केले आहे. जेवणाच्या पंक्‍तीत प्रमुख आसने निवडताना इतर पाहुण्यांना पाहून, तो नम्रतेचा एक धडा देतो.

तो म्हणतोः “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग, ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेलः ‘ह्‍यांना जागा दे.’ तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील.”

यासाठी, येशू पुढे सल्ला देतोः “पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेलः ‘मित्रा, वर येऊन बैस.’ म्हणजे, तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल.” शेवटी येशू म्हणतोः “कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.

यानंतर, येशू त्याला आमंत्रण देणाऱ्‍या परुशाला उद्देशून, देवाच्या दृष्टीने खरी गुणवत्ता असलेले भोजन कसे द्यावे याचे वर्णन तो करतो. तो म्हणतोः “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्‍यांना बोलावू नका. कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व अंधळे ह्‍यांना आमंत्रण करा. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल. कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही.”

अभागी लोकांना असे जेवण दिल्याने ते देणाऱ्‍याला धन्यता मिळेल, कारण येशूने आपल्या यजमानाला खुलासा केल्याप्रमाणे “नीतीमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.” या स्तुतीपात्र भोजनाच्या येशूच्या वर्णनावरुन तेथील एका पाहुण्याला आणखी एका प्रकारच्या भोजनाची आठवण होते. तो पाहुणा म्हणतोः “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य.” परंतु येशू पुढे एका उदाहरणाने दाखवतो त्याप्रमाणे त्या चांगल्या भवितव्याची सर्वांनाच योग्य कदर नसते.

“कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा त्याने पुष्कळांना आमंत्रण केले. आणि . . . ‘आता या, तयारी झाली आहे,’ असे आमंत्रितांस सांगावयाला त्याने आपल्या एका दासाला पाठविले. पण ते सगळेच सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणालाः ‘मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ दुसरा म्हणालाः ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ आणखी एक जण म्हणालाः ‘मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही.’”

किती या निरर्थक सबबी! सर्वसाधारणपणे शेत वा गुरांची तपासणी विकत घेण्यापूर्वी केली जाते. तेव्हा विकत घेतल्यावर त्यांची पाहणी करण्याची खरी घाई नाही. तसेच एखाद्याचे लग्न झाले आहे, यामुळे इतके महत्त्वाचे आमंत्रण स्वीकारण्यात त्याचा अडथळा होऊ नये. म्हणून अशा सबबी ऐकल्यावर धनी संतापतो व आपल्या दासांना आज्ञा करतोः

“नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा, आणि दरिद्री, व्यंग, अंधळे व लंगडे ह्‍यांस इकडे घेऊन ये.” काही वेळाने दास म्हणालाः “महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्याप जागा आहे.” मग, धनी दासाला म्हणालाः “माझे घर भरुन जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. . . . त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातील काही चाखावयास मिळणार नाही.”

या उदाहरणाने कोणत्या परिस्थितीचे वर्णन केले आहे? जेवणावळ घालणारा “धनी” यहोवा देवाचे, देणारा “दास” येशू ख्रिस्ताचे व “संध्याकाळची मोठी जेवणावळ” स्वर्गाच्या राज्यात जाण्याच्या संधीचे प्रतिनिधित्व करतात.

देवाच्या राज्यासाठी पात्रतेचे आमंत्रण मिळण्यात सर्वप्रथम, येशूच्या काळातील यहुदी धार्मिक पुढारी होते. परंतु, त्यांनी त्या आमंत्रणाला अव्हेरले. अशा रितीने, विशेषतः इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टपासून यहुदी राष्ट्रातील तिरस्कृत व खालच्या लोकांना दुसरे आमंत्रण दिले गेले. पण देवाच्या स्वर्गीय राज्यातील १,४४,००० जागा भरण्याइतक्या लोकांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून साडेतीन वर्षांनंतर इ. स. ३६ मध्ये तिसरे व शेवटचे आमंत्रण सुंता न झालेल्या यहुद्देत्तरांना देण्यात आले व अशांना गोळा करण्याचे काम आपल्या दिवसापर्यंत चालत आले आहे. लूक १४:१-२४.

▪ येशू नम्रतेचा कोणता धडा शिकवतो?

▪ देवाच्या दृष्टीने गुणवत्ता असलेले भोजन एखादा यजमान कसे देऊ शकतो व त्यामुळे त्याला धन्यता का मिळू शकेल?

▪ आमंत्रित पाहुण्यांनी सांगितलेल्या सबबी का निरर्थक होत्या?

▪ ‘संध्याकाळच्या मोठ्या जेवणावळी’च्या येशूच्या दाखल्याद्वारे काय सूचित होते?