व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“पाहा, हा मनुष्य!”

“पाहा, हा मनुष्य!”

अध्याय १२३

“पाहा, हा मनुष्य!”

येशूच्या वर्तनाने प्रभावीत होऊन, त्याचे निरपराधित्व ओळखून, त्याला सोडण्यासाठी पिलात आणखी एक मार्ग काढतो. तो जमावाला सांगतोः “वल्हांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे.”

बरब्बा हा एक कुप्रसिद्ध खुनीही तुरुंगात आहे. म्हणून पिलात विचारतोः “मी तुम्हाकरिता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बाला की ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?”

लोक, त्यांना चिथावणाऱ्‍या मुख्य याजकांनी त्यांचे मन वळवल्याप्रमाणे, बरब्बाची सुटका करावी व येशूला मारावे अशी मागणी करतात. आपला प्रयत्न न सोडता पिलात पुन्हा विचारतोः “तुम्हाकरिता ह्‍या दोघातून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?”

“बरब्बा,” ते ओरडतात.

“तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” पिलात गोंधळून विचारतो.

ते एकमुखाने गर्जना करतातः “त्याला वधस्तंभावर खिळून टाका!” “वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!”

एका निरपराध माणसाच्या मृत्युची ते मागणी करीत आहेत हे जाणून पिलात आर्जव करतोः “का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही. म्हणून मी ह्‍याला फटके मारून सोडून देतो.”

पिलाताने कितीही प्रयत्न केले तरी, धार्मिक नेत्यांच्या चिथवण्यांमुळे संतप्त जमाव “त्याला वधस्तंभावर खिळाच!” असे मोठ्याने ओरडत राहतो. याजकांनी त्यांना बहकवल्यामुळे जमावाला रक्‍त हवे आहे. आणि केवळ पाच दिवसांपूर्वी राजा म्हणून यरुशलेमामध्ये येशूचे स्वागत करणाऱ्‍यात बहुधा त्यामधीलच काही होते हे खरेही वाटत नाही. हे सर्व चालू असताना, उपस्थित असल्यास, येशूचे शिष्य मूक आणि नजरेत न येतील असे राहतात.

आपल्या विनंत्यांचा काही उपयोग होत नाही, पण उलट दंगल सुरु होत आहे असे पाहिल्यावर पिलात पाणी घेतो, जमावासमोर आपले हात धूतो आणि म्हणतोः “मी या मनुष्याच्या रक्‍ताविषयी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पाहा.”

तेव्हा लोक उत्तर देतातः “त्याचे रक्‍त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”

त्यामुळे, त्यांच्या मागणीनुसार—काय योग्य ते त्याला माहीत असताना ते करण्यापेक्षा जमावाचे समाधान करण्याच्या इच्छेने—पिलात त्यांच्यासाठी बरब्बाला सोडतो. येशूचे कपडे काढवून मग तो त्याला फटके मारवतो. हे साधेसुधे फटके नव्हते. रोमी लोकांच्या फटके मारण्याच्या पद्धतीचे वर्णन द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन असे करतेः

“सामान्यतः वेगवेगळ्या लांबीच्या व लोखंडाचे लहान गोळे किंवा मेंढीच्या हाडांचे अणकुचीदार तुकडे अंतराअंतराने बांधलेल्या अनेक, एकेरी वा गुंफलेल्या चामड्याच्या वाद्यांचा आखूड आसूड [त्याला फ्लॅग्रम वा फ्लॅजेलम म्हणत] हे शस्त्र असे. . . . सर्व बळ एकवटून रोमी शिपाई त्या व्यक्‍तिच्या पाठीवर पुनःपुन्हा मारू लागले की लोखंडाच्या गोळ्यांनी खोलवर मुका मार बसे आणि चामड्याच्या वाद्या व मेंढीच्या हाडांनी त्वचा व त्याखालच्या शिरा कापल्या जाई. मग फटके मारणे चालू असताना त्या घावांनी त्याही खालचे स्नायु फाटत व रक्‍तबंबाळ मांसाच्या थरथरत्या चिंध्या बनत.”

या यातनामय मारानंतर येशूला वाड्यात नेण्यात येते व शिपायांची सर्व तुकडी जमवली जाते. तेथे काट्यांचा मुकुट गुंफून तो त्याच्या डोक्यावर खोचून बसवून शिपाई येशूचा आणखी उपहास करतात. ते त्याच्या उजव्या हातात वेत देतात व राजघराण्यातील लोक वापरतात तसा जांभळा झगा त्याला घालतात. मग, उपहासाने ते त्याला म्हणतातः “हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!” तसेच ते त्याच्यावर थुंकतात व त्याच्या तोंडात मारतात. त्याच्या हातातील बळकट वेत घेऊन तोच त्याच्या डोक्यावर मारण्यासाठी वापरतात व त्यामुळे त्याच्या लांच्छनास्पद “मुकुटा”चे टोकदार काटे त्याच्या डोक्यामधील कातडीत अधिक खोलवर घुसवतात.

अशा दुर्व्यवहारातही येशूची विलक्षण सभ्यता व बळ यांची पिलातावर इतकी छाप पडते की त्याला सोडवण्याचा आणखी एक प्रयत्न करण्याची त्याला प्रेरणा मिळते. तो जमावाला सांगतोः “पहा, त्याच्याठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो.” येशूच्या यातनामय स्थितीने कदाचित त्यांचे हृदय पाघळेल अशी तो कल्पना करतो. काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला आणि त्याच्या रक्‍तबंबाळ चेहऱ्‍यावर जणू यातना कोरल्या आहेत असा येशू त्या निष्ठुर जमावापुढे उभा राहतो, तेव्हा पिलात म्हणतोः “पहा, हा मनुष्य!”

मारपीट झालेला आणि जखमी असला तरी, सर्व इतिहासातील सर्वात लक्षणीय माननीय व्यक्‍ती, सर्वकाळातील खरोखर सर्वश्रेष्ठ माणूस येथे उभा आहे! होय, पिलातानेही दाद द्यावी अशी श्रेष्ठता सूचित करणारी शांत सभ्यता व निश्‍चलता येशू प्रदर्शित करतो. कारण पिलाताच्या शब्दात आदर व सहानुभूती यांचा संगम असल्यासारखे दिसते. योहान १८:३९–१९:५; मत्तय २७:१५-१७, २०-३०; मार्क १५:६-१९; लूक २३:१८-२५.

▪ पिलात कोणकोणत्या मार्गांनी येशूला सोडवण्याचा प्रयत्न करतो?

▪ पिलात स्वतःला जबाबदारीतून मुक्‍त करण्याचा कसा प्रयत्न करतो?

▪ फटके मारण्यात काय गोवलेले आहे?

▪ फटके मारल्यानंतर येशूचा कसा उपहास केला जातो?

▪ येशूला सोडण्यासाठी पिलात आणखी कोणता प्रयत्न करतो?