व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पितृत्वाचा प्रश्‍न

पितृत्वाचा प्रश्‍न

अध्याय ६९

पितृत्वाचा प्रश्‍न

त्यासणाच्या काळात येशूची, यहुदी नेत्यांसोबतची चर्चा अधिकाधिक भावनाप्रधान बनते. येशू कबूल करतोः “तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे. तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही; म्हणून तुम्ही मला जिवे मारावयास पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता.”

त्यांच्या पित्याची ओळख सांगितली नाही तरी, त्याच्या पित्यापेक्षा यांचा पिता वेगळा असल्याचे तो स्पष्ट करतो. येशूच्या मनात कोण आहे याची जाणीव नसल्याने ते यहुदी नेते प्रत्त्युतर देतातः “आमचा पिता अब्राहाम आहे.” देवाचा मित्र असलेल्या अब्राहामासारखाच विश्‍वास आपल्याला आहे असे त्यांना वाटते.

पण, “तुम्ही अब्राहामाची मुले आहात तर अब्राहामाची कृत्ये करा,” अशा उत्तराने येशू त्यांना धक्का देतो. खरोखर, एखादा खरा पुत्र त्याच्या पित्याचे अनुकरण करतो. यास्तव, येशू म्हणतोः “परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे मारावयास पाहता. अब्राहामाने असे केले नाही.” या कारणामुळे येशू पुन्हा म्हणतोः “तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता.”

येशू कोणाबद्दल बोलत आहे हे अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही. “आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही,” असे म्हणून आपण अब्राहामाचे औरस पुत्र असल्याचा ते पाठपुरावा करीत राहतात. अशा रितीने, अब्राहामासारखे खरे भक्‍त असल्याचा दावा करून, ते ठासून सांगतातः “आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे.”

पण, देव खरोखरच त्यांचा पिता आहे का? यावर येशू त्यांना म्हणतोः “देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपण होऊन आलो नाही तर त्यानेच मला पाठवले. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही?”

आपला अव्हेर केल्यास त्यामुळे होणारे परिणाम या धार्मिक नेत्यांना दाखवून देण्याचा येशूने प्रयत्न केला आहे. परंतु, आता तो स्पष्टपणे म्हणतोः “तुम्ही आपला बाप सैतान ह्‍यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता.” सैतान हा कशाप्रकारचा पिता आहे? तो मनुष्यघातकी असल्याचे सांगून येशू असेही म्हणतोः “तो लबाड व लबाडाचा बाप आहे.” शेवटी येशू म्हणतोः “जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”

येशूच्या दोषारोपामुळे संतापून यहुदी उत्तरतातः “तुम्ही शोमरोनी आहा व तुम्हाला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?” यहुदी शोमरोन्यांचा द्वेष करतात, त्यामुळे “शोमरोनी” हा शब्द तुच्छता व निंदा व्यक्‍त करण्यासाठी वापरला जातो.

शोमरोनी म्हणून तुच्छतापूर्वक कलंक लावण्याच्या त्यांच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष करून येशू म्हणतोः “मला भूत लागले नाही, तर मी आपल्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता.” पुढे, येशू एक आश्‍चर्यकारक वचन देतोः “जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीच येणार नाही.” अर्थात, त्याला अनुसरणाऱ्‍या सर्वांना शब्दशः कधीच मृत्यू येणार नाही असा येशूच्या म्हणण्याचा अर्थ नाही. तर त्यांना सार्वकालिक नाश किंवा ज्यापासून पुनरुत्थान नाही असे “दुसरे मरण” येणार नाही असा त्याच्या बोलण्याचा अर्थ आहे.

तथापि, ते यहुदी येशूच्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेतात. ते म्हणतातः “तुम्हाला भूत लागले आहे हे आता आम्हाला कळले. अब्राहाम मेला व संदेष्टेही मेले, आणि तुम्ही म्हणता की, ‘जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.’ आमचा बाप अब्राहाम मेला, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहा काय? संदेष्टेही मेले; तुम्ही स्वतःला काय समजता?”

या सर्व चर्चेमध्ये आपण वचनयुक्‍त मशीहा असल्याची वस्तुस्थिती येशू त्या लोकांच्या नजरेस आणून देत आहे. परंतु स्वतःची ओळख पटवण्याबद्दल त्यांच्या प्रश्‍नांना सरळ उत्तर देण्याऐवजी येशू म्हणतोः “मी स्वतःचे गौरव केले तर ते माझे गौरव काहीच नाही. माझे गौरव करणारा माझा पिता आहे; तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता. तरी तुम्ही त्याला ओळखले नाही. मी त्याला ओळखतो. आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन.”

पुढे, येशू पुन्हा विश्‍वासू अब्राहामाचा उल्लेख करतो व म्हणतोः “तुमचा बाप अब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लसित झाला होता. तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला.” होय, अब्राहामाने विश्‍वास-चक्षूंनी वचनयुक्‍त मशीहाच्या येण्याकडे आपली दृष्टी लावली होती. आता आश्‍चर्यचकित अविश्‍वासाने ते यहुदी म्हणतातः “तुम्हाला अजून पन्‍नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहामाला पाहिले आहे काय?”

यावर येशू उत्तरतोः “मी तुम्हाला खचित खचित सांगतो की, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.” येशू अर्थातच, मानव होण्यापूर्वी एक बलवान आत्मिक व्यक्‍ती असताना, तेव्हाच्या त्याच्या अस्तित्वाबद्दल असे बोलत आहे.

अब्राहामापूवी अस्तित्वात असल्याच्या येशूच्या दाव्याने संतापून ते यहुदी त्याच्यावर फेकण्यासाठी दगड उचलतात. पण तो लपतो व अपाय न होता मंदिराच्या बाहेर जातो. योहान ८:३७-५९; प्रकटीकरण ३:१४; २१:८.

▪ येशू स्वतःचा तसेच त्याच्या शत्रूंचा पिता वेगवेगळा असल्याचे कसे दाखवतो?

▪ यहुद्यांनी येशूला शोमरोनी म्हणण्याचा काय अर्थ आहे?

▪ आपल्या अनुयायांना मृत्युचा अनुभव येणारच नाही या येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे?