व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पीडितांबद्दल सहानुभूती

पीडितांबद्दल सहानुभूती

अध्याय ५७

पीडितांबद्दल सहानुभूती

परुशांना त्यांच्या आपमतलबी रुढींसाठी जाहीरपणे दोष दिल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह निघून जातो. याच्या थोडेच आधी जमावाने त्यांना शोधून काढल्यामुळे विश्रांती घेण्यासाठी शिष्यांसोबत जाण्याच्या त्याच्या प्रयत्नांना बाधा आली होती हे तुम्हाला आठवतच असेल. आता तो आपल्या शिष्यांसह, उत्तरेला अनेक मैलांवर असलेल्या सोर व सीदोनच्या प्रांताकडे जाण्यास निघतो. त्याच्या शिष्यांसह इस्राएलच्या सीमेपलिकडील येशूचा हा एकमेव प्रवास होय असे स्पष्ट दिसते.

राहण्यासाठी घर शोधल्यावर त्यांचा ठावाठिकाणा कोणालाही कळू नये अशी त्याची इच्छा असल्याचे तो प्रकट करतो. तरीही, यहुद्देत्तर प्रांतात देखील तो लोकांच्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. या सुरफुनिके प्रांतात जन्मलेल्या एका ग्रीक स्त्रीला तो सापडतो व ती त्याला विनंत्या करू लागते. ती म्हणतेः “हे प्रभो, दावीदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर झाली आहे.” पण, यावर येशू तिला एका शब्दानेही उत्तर देत नाही.

शेवटी येशूचे शिष्य त्याला म्हणतातः “तिला पाठवून द्या. कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे.” तिच्याकडे दुर्लक्ष करण्यामागील कारणाचा खुलासा देताना येशू म्हणतोः “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.”

परंतु ती स्त्री पिच्छा सोडत नाही. येशूकडे येऊन ती त्याच्यापुढे लोटांगण घालते. ती गयावया करतेः “प्रभुजी, मला साहाय्य करा.”

त्या स्त्रीच्या कळकळीच्या विनंतीने येशूचे हृदय किती हेलावले असेल! तरीही इस्राएलामधील देवाच्या लोकांची सेवा करण्याच्या आपल्या प्राथमिक जबाबदारीकडे तो लक्ष वेधवतो. तसेच बहुधा तिच्या विश्‍वासाची परिक्षा घेण्यासाठी तो, यहुदी, परदेश्‍यांविषयी जो कलुषित दृष्टीकोण राखून आहेत त्याचा येथे उपयोग करतो. तो म्हणतोः “मुलाची भाकरी घेऊन ती कुत्र्याच्या पिलांना घालणे हे ठीक नव्हे.”

त्याच्या आवाजातील सहानुभूतीने व चेहऱ्‍यावरील भावाने यहुद्देत्तरांबद्दलच्या संवेदनाशील भावना येशू खचितच प्रकट करतो. ‘कुत्र्याची पिले’ असा त्यांचा उल्लेख करून यहुद्देत्तरांची कुत्र्यांशी केलेली तुलना तो सौम्यही करतो. त्याचा राग मानण्याऐवजी, यहुद्यांच्या कलुषित दृष्टीकोनाचा येशूने केलेला उल्लेख धरून ती स्त्री लीनतेने म्हणतेः “खरेच, प्रभुजी; तरी कुत्र्यांची पिले आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.”

येशू उत्तरतोः “बाई, तुझा विश्‍वास मोठा, तुझी इच्छा सफल होवो.” आणि तसेच घडते! ती आपल्या घरी परतते तेव्हा खाटेवरची तिची मुलगी संपूर्ण बरी झालेली तिला दिसून येते.

सिदोनच्या समुद्रकिनाऱ्‍याच्या प्रदेशाकडून येशू व त्याचे शिष्य यार्देनेच्या उगमाकडील भागाकडे कूच करतात. ते गालील समुद्राच्या उत्तरेकडे कोठेतरी यार्देन पार करतात व गालील समुद्राच्या पूर्वेला असलेल्या दकापलीस प्रांतात प्रवेश करतात. तेथे ते एका डोंगरावर चढतात. पण जमावाला ते सापडतात व लुळे, पांगळे, आंधळे व मुके तसेच इतर रोगांनी जर्जर व व्यंग झालेल्या अनेकांना ते येशूकडे आणतात. त्यांना ते येशूच्या पायाशी घालतात व तो त्यांना बरे करतो. मुके बोलताना, पांगळे चालताना व आंधळे बघताना पाहून लोक आश्‍चर्यचकित होतात व ते इस्राएलांच्या देवाचे गौरव करतात.

बहिरा असलेल्या व जवळजवळ बोलू न शकणाऱ्‍या एका माणसाकडे येशू विशेष लक्ष देतो. बहिरे लोक, विशेषतः जमावात असल्यास, बहुधा सहज संकोचतात. या माणसाला वाटणारी विशेष भीती येशूच्या लक्षात आली असेल. यासाठी येशू त्याला सहानुभूतीपूर्वक, लोकांपासून एकीकडे नेतो. ते एकांतात असताना आपण त्या माणसासाठी काय करणार आहोत याची येशू त्याला कल्पना देतो. बहिऱ्‍या माणसाच्या कानात तो आपली बोटे घालतो व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श करतो. मग, आकाशाकडे पाहात येशू दीर्घ उसासा टाकून म्हणतोः “मोकळा हो.” तेव्हा त्या माणसाची श्रवणशक्‍ती यथास्थित होते व तो सर्वसामान्यपणे बोलू लागतो.

लोकांना बरे करण्याचे अनेक चमत्कार येशूने केल्यावर जमावही त्याची कदर करतो. ते म्हणतातः “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. हा बहिऱ्‍यांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्‍ती देतो.” मत्तय १५:२१-३१; मार्क ७:२४-३७.

▪ येशू त्या ग्रीक स्त्रीच्या मुलीला तात्काळ का बरी करत नाही?

▪ त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना कोठे नेतो?

▪ जवळजवळ बोलता न येणाऱ्‍या बहिऱ्‍या माणसाला येशू सहानुभूतीने कसे वागवतो?