व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रथम हन्‍ना व मग कयफाकडे नेण्यात येते

प्रथम हन्‍ना व मग कयफाकडे नेण्यात येते

अध्याय ११९

प्रथम हन्‍ना व मग कयफाकडे नेण्यात येते

एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे बांधून येशूला हन्‍नाकडे नेले जाते. तो भूतपूर्व मातब्बर प्रमुख याजक आहे. येशू १२ वर्षांचा मुलगा असताना त्याने मंदिरातील धर्मगुरुंना चकित केले होते तेव्हा हन्‍ना प्रमुख याजक होता. त्यानंतर हन्‍नाच्या अनेक मुलांनी प्रमुख याजकाचे काम केले आणि सध्या त्याचा जावई कयफा त्या पदावर आहे.

यहूदी धार्मिक जीवनामध्ये तो मुख्य याजक दीर्घकाळापासून प्रतिष्ठा पावलेला असल्यामुळे बहुधा येशूला प्रथम हन्‍नाच्या घरी नेण्यात येते. हन्‍नाच्या भेटीसाठी थांबल्यामुळे प्रमुख याजक कयफाला ७१ सदस्यांचे यहूदी उच्च न्यायालय, न्यायसभा, भरवण्यासाठी तसेच खोटे साक्षीदार गोळा करण्यासाठी वेळ मिळतो.

आता मुख्य याजक हन्‍ना येशूकडे त्याचे शिष्य आणि त्याची शिकवण यांच्यासंबंधी चौकशी करतो. परंतु येशू उत्तर देण्यात असे म्हणतोः “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. सभास्थानात व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही. मला का विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा, मी काय बोललो ते. पहा, मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे.”

यावेळी येशूजवळ उभा असलेला एक अधिकारी त्याला तोंडात मारुन म्हणतोः “तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय?”

येशू त्याला उत्तर देतोः “मी वाईट रितीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर. योग्य रितीने बोललो असलो तर मला का मारतोस?” असा वाद झाल्यावर हन्‍ना येशूला बांधलेल्या स्थितीतच कयफाकडे पाठवतो.

आतापर्यंत सर्व मुख्य याजक व वडील मंडळी आणि शास्त्री, होय सर्व न्यायसभा भरू लागली आहे. कयफाच्या घरी त्यांची सभा भरलेली असल्याचे उघड आहे. वल्हांडण सणाच्या रात्री अशी सभा भरवणे यहूदी नियमशास्त्राविरुद्ध आहे. पण त्यामुळे त्या धार्मिक नेत्यांच्या दुष्टतेमध्ये खंड पडत नाही.

काही आठवड्यांपूर्वी येशूने लाजराचे पुनरुत्थान केल्यावर, तो मेलाच पाहिजे असा निर्णय न्यायसभेने आपसात घेतलेला आहे. आणि केवळ दोन दिवसांपूर्वी, बुधवारी, येशूला मारण्यासाठी कपटाने धरण्याचा कट त्या धार्मिक नेत्यांनी केला. कल्पना करा, येशूची सुनावणी होण्यापूर्वीच त्याला खरोखर दोषी ठरवले गेले होते!

येशूवर खटला करता यावा म्हणून खोटी साक्ष देतील असे साक्षीदार मिळवण्याची आता खटपट चालू आहे. परंतु ज्यांच्या जबानीमध्ये मेळ बसेल असे साक्षीदार मिळू शकत नाहीत. शेवटी दोघे पुढे येतात व निक्षून सांगतातः “हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे तीन दिवसात उभारीन, असे आम्ही ह्‍याला बोलताना ऐकले.”

कयफा विचारतोः “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?” पण येशू उगा राहतो. न्यायसभेच्या लज्जेची गोष्ट म्हणजे ह्‍या खोट्या आरोपातही साक्षीदार आपल्या जबान्यांमध्ये मेळ बसवू शकत नव्हते. त्यामुळे प्रमुख याजक दुसरा पवित्रा टाकतो.

आपण देवाचे प्रत्यक्ष पुत्र आहो असा दावा करणाऱ्‍याबद्दल यहुद्यांना किती चीड आहे याची कयफाला माहिती आहे. मागे दोन प्रसंगी, त्यांनी अविचाराने येशूला, मृत्युदंडाला योग्य दुर्भाषण करणारा ठरवले होते. त्यातील एकदा तो स्वतः देवाच्या बरोबरीचा असल्याचा दावा करत असल्याबद्दल त्यांची चुकीची समजूत झाली होती. आता कयफा कपटाने म्हणतोः “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असल्यास आम्हास सांग.”

यहुद्यांना काहीही वाटले तरी येशू खरोखरी देवाचा पुत्र आहे. त्यामुळे गप्प राहिल्यास तो ख्रिस्त असल्याचे नाकारेल असा अर्थ काढता येईल. यासाठीच येशू धैर्याने उत्तर देतोः “मी आहे. आणि तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांसह येत असलेला असा पाहाल.”

तेव्हा नाटकी देखावा करीत कयफा आपले कपडे फाडतो आणि म्हणतोः “ह्‍याने दुर्भाषण केले आहे! आम्हास साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हास काय वाटते?”

न्यायसभा घोषणा करतेः “हा मरणदंडास पात्र आहे.” मग, ते त्याची टर उडवू लागतात, आणि दुर्भाषण करून त्याच्याविरुद्ध अनेक गोष्टी बोलू लागतात. ते त्याच्या तोंडावर मारतात व थुंकतात. इतर, त्याचा संपूर्ण चेहरा झाकून त्याला बुक्क्या मारतात व उपरोधाने म्हणतातः “अरे ख्रिस्ता, आम्हाला अंर्तज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?” रात्रीच्या वेळी झालेल्या चौकशीत हे गैर व बेकायदेशीर वर्तन घडते. मत्तय २६:५७-६८; २६:३, ४; मार्क १४:५३-६५; लूक २२:५४, ६३-६५; योहान १८:१३-२४; ११:४५-५३; १०:३१-३९; ५:१६-१८.

▪ येशूला प्रथम कोठे नेतात व तेथे त्याला काय घडते?

▪ त्यानंतर येशूला कोठे व कशासाठी नेतात?

▪ येशू मरणदंडाला पात्र आहे अशी घोषणा कयफा न्यायसभेकडून कशी करून घेतो?

▪ त्या चौकशीच्या वेळी कोणते गैर व बेकायदेशीर वर्तन घडते?