व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थनेची व नम्रतेची गरज

प्रार्थनेची व नम्रतेची गरज

अध्याय ९४

प्रार्थनेची व नम्रतेची गरज

मागे यहूदीयात असताना चिकाटीने प्रार्थना करण्याच्या महत्त्वाबद्दल येशूने एक दाखला दिला होता. आता, यरुशलेमात आपल्या शेवटल्या प्रवासात प्रार्थनेत खंड पडू न देण्याच्या गरजेवर तो पुन्हा भर देतो. यासाठी तो एक दाखला देतो व यावेळी तो कदाचित शोमरोन किंवा गालीलात आहे असे दिसते.

तो सांगतोः “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध न्याय करा. पण काही काळापर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटलेः ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.’”

मग, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका.” असे म्हणून येशू त्याच्या दाखल्याचे तात्पर्य सांगतो. तो म्हणतोः “देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?”

यहोवा देव त्या अन्यायी न्यायाधीशासारखा असल्याचे येशू सुचवीत नसून, जर अन्यायी न्यायाधीश देखील सतत केलेल्या विनंत्यांना प्रतिसाद देईल तर, देवाच्या लोकांनी आपल्या प्रार्थनेत खंड पडू न दिल्यास, संपूर्णतया चांगला व नीतीमान असलेला देव, त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल यात शंका घेण्यास जागाच नसावी, असे येशू सुचवीत आहे.

साध्या व गरीब लोकांना अनेकदा न्याय दिला जात नाही. पण वजनदार व श्रीमंत लोकांना बऱ्‍याच वेळा विशेष कृपा दाखवली जाते. तथापि, देव मात्र दुष्टांचा न्याय, शिक्षा होण्याकडेच नव्हे, तर त्याच्या सेवकांना सार्वकालिक जीवन देऊन त्यांना न्याय्य वागणूक देण्याची खात्रीही देण्याकडे लक्ष देईल. परंतु देव विनाविलंब न्याय करील असा किती लोकांचा पक्का विश्‍वास आहे?

विशेषतः विश्‍वासासंबंधी प्रार्थनेच्या शक्‍तीच्या संदर्भात येशू विचारतोः “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्‍वास आढळेल काय?” हा प्रश्‍न उत्तराविना सोडला असला तरी, राज्य सामर्थ्यासह ख्रिस्त येईल तेव्हा असा विश्‍वास विरळा दिसेल असे ध्वनित केले आहे.

येशूच्या श्रोत्यांमध्ये काहींना आपल्या विश्‍वासाबद्दल मनोमन अगदी खात्री वाटते. आपण नीतीमान असल्याबद्दल त्यांचा स्वतःवर भरवसा असून ते इतरांना कमी लेखतात. त्या गटात येशूच्या शिष्यांमधील देखील काहींचा समावेश करता येईल. यामुळे अशांना उद्देशून तो खालील दाखला देतोः

“एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. परुश्‍याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केलीः ‘हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी व व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा ह्‍या जकातदारासारखाही मी नाही. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशमांश देतो.”

इतरांवर छाप पाडण्यासाठी नीतीमत्तेच्या जाहीर प्रदर्शनासाठी परुशी लोक प्रसिद्ध होते. सोमवार व गुरुवार हे त्यांनी स्वतःवर लादून घेतलेल्या उपासाचे सर्वसाधारण दिवस आहेत. शेतातील अगदी लहान भाज्यांचा दशमांशही ते काटेकोरपणे देत. काही महिन्यांपूर्वी, मंडपांच्या सणाच्या वेळी, “हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र [म्हणजे, परुश्‍यांनी त्याचा लावलेला अर्थ] जाणत नाही, तो शापित आहे,” असे त्यांनी म्हटल्यावर, सर्वसाधारण लोकांबद्दल त्यांना वाटणारा तिरस्कार उघड झाला होता.

आपला दाखला पुढे सांगताना येशू अशा एका “शापित” माणसाबद्दल सांगतोः “जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला उर बडवीत म्हणालाः ‘हे देवा, मज पाप्यावर दया कर.’” जकातदाराने नम्रपणे आपले दोष कबूल केल्यामुळे, येशू म्हणतोः “मी तुम्हास सांगतो, त्या दुसऱ्‍यापेक्षा हा नीतीमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो. तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो, तो उंच केला जाईल.”

अशा रितीने नम्र असण्याच्या गरजेवर येशू पुन्हा जोर देतो. स्वतःला नीतीमान समजणारे परुशी जेथे इतके प्रभावशाली आहेत व स्थान आणि हुद्याला जेथे सतत महत्त्व दिले जाते अशा समाजात वाढल्याने येशूच्या शिष्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे यात नवल नाही. तरीपण, येशू नम्रतेचा किती उत्तम धडा शिकवतो! लूक १८:१-१४; योहान ७:४९.

▪ अन्यायी न्यायाधीश विधवेची विनंती का मान्य करतो व येशूच्या दाखल्याने कोणता धडा शिकवला आहे?

▪ येशू आल्यावर तो कोणत्या विश्‍वासाची अपेक्षा करील?

▪ येशू कोणाला उद्देशून परुशी व जकातदाराचा दाखला देतो?

▪ परुशांची कोणती मनोवृत्ती टाळली पाहिजे?