व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बागेतील व्याकुळता

बागेतील व्याकुळता

अध्याय ११७

बागेतील व्याकुळता

येशूने प्रार्थना संपवल्यावर तो व त्याचे ११ विश्‍वासू प्रेषित यहोवाला स्तुतीपर गीते गातात. मग ते माडीवरील खोलीतून उतरुन रात्रीच्या शीतल अंधारात येतात आणि किद्रोन दरीच्या पलिकडील बेथानीकडे जाऊ लागतात. पण वाटेवर त्यांच्या आवडत्या ठिकाणी, गेथशेमाने बागेत ते थांबतात. ही जैतूनांच्या डोंगरावर किंवा जवळपास आहे. तेथील जैतुनांच्या वृक्षांमध्ये येशूने अनेकदा आपल्या प्रेषितांची गाठ घेतली आहे.

प्रेषितांमधील आठ जणांना सोडून—बहुधा बागेच्या प्रवेशद्वाराजवळ—तो त्यांना सूचना देतोः “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” त्यांनतर तिघांना—पेत्र, याकोब व योहान—बरोबर घेऊन तो बागेत आणखी आत जातो. येशू खिन्‍न व अतिकष्टी होतो. तो त्यांना सांगतोः “माझा जीव मरणप्राय अतिखिन्‍न झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”

थोडासा पुढे जाऊन येशू पालथा पडतो व मनःपूर्वक प्रार्थना करू लागतोः “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो. तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” त्याच्या बोलण्याचा अर्थ काय? तो “मरणप्राय अतिखिन्‍न” का झाला आहे? मरण्याच्या व खंडणी देण्याच्या त्याच्या निर्धारावरून तो मागे फिरत आहे का?

मुळीच नाही! मृत्युपासून बचाव व्हावा म्हणून तो विनंती करत नाही. एकदा पेत्राने सुचवलेला, बलिदानपर मृत्यु टाळण्याचा विचारही त्याला अश्‍लाघ्य वाटला होता. तर लवकरच तो ज्या प्रकारे, एका तिरस्करणीय गुन्हेगारासारखा मरणार आहे, त्यामुळे त्याच्या पित्याच्या नावाला काळिमा लागेल अशी भीती त्याला वाटते. काही तासातच, सर्वात तिरस्करणीय व्यक्‍ती—देवाविरुद्ध दुर्भाषण करणारा—म्हणून त्याला वधस्तंभावर खिळण्यात येईल याची आता त्याला जाणीव होते. यामुळेच तो अत्यंत अस्वस्थ होतो.

दीर्घ प्रार्थनेनंतर येशू परत येतो तेव्हा ते तिन्ही प्रेषित झोपलेले त्याला आढळतात. पेत्राला उद्देशून तो म्हणतोः “काय! तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परिक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा.” परंतु, त्यांच्यावर पडलेला मानसिक ताण व रात्री उशीराचा समय यांची जाणीव ठेवून तो म्हणतोः “आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्‍त आहे.”

मग, येशू दुसऱ्‍यांदा जातो आणि त्याच्यापासून “हा प्याला” म्हणजेच त्याच्यासाठी यहोवाने नेमून दिलेला भाग वा इच्छा, देवाने टाळावी अशी विनंती करतो. तो परततो तेव्हा, परिक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करत असण्याऐवजी, ते तिघे झोपलेले त्याला आढळतात. येशू त्यांच्याशी बोलतो तेव्हा काय उत्तर द्यावे हे त्यांना समजत नाही.

शेवटी, तिसऱ्‍या वेळी, सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका दूर जाऊन, गुडघे टेकून, अत्यंत विव्हळ होऊन तो अधिक आग्रहाने प्रार्थना करतोः “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर.” एक गुन्हेगार म्हणून झालेल्या त्याच्या मृत्युमुळे त्याच्या पित्याच्या नावावर येणाऱ्‍या दोषाबद्दल त्याला तीव्र यातना होतात. दुर्भाषण करणारा—देवाला दोष देणारा—असा आरोप असह्‍य आहे!

तरीही, येशू प्रार्थना करताना पुढे म्हणतोः “माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” आज्ञाधारकपणे येशू देवाच्या इच्छेपुढे नमते घेतो. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येतो व उत्तेजनपर शब्दांनी त्याला बळ देतो. बहुधा त्याचा पिता त्याच्यावर संतुष्ट असल्याचे तो देवदूत येशूला सांगतो.

परंतु येशूच्या खांद्यावर किती भार आहे! त्याच्या स्वतःच्या व संपूर्ण मानवजातीच्या सार्वकालिक जीवनाचा निर्णय होणार आहे. तो भावनात्मक ताण प्रचंड आहे. त्यामुळे येशू अधिक कळकळीने प्रार्थना करीत राहतो, आणि रक्‍ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे तसा त्याचा घाम होतो. द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन म्हणतेः “ही गोष्ट अतिशय विरळ असली तरी . . . अत्यंत भावनाविवश अवस्थेमध्ये . . . रक्‍तयुक्‍त घाम येऊ शकतो.”

त्यानंतर येशू तिसऱ्‍या वेळेला त्याच्या प्रेषितांकडे परततो आणि पुन्हा ते झोपलेले त्याला आढळतात. केवळ दुःखाने ते थकून गेले आहेत. तो उद्‌गारतोः “यासारख्या वेळी तुम्ही झोप व विश्रांती घेत आहा! पहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”—न्यू.व.

तो बोलत असतानाच मशाली, दिवे आणि शस्त्रे घेतलेल्या एका मोठ्या जमावासह यहूदा इस्कर्योत जवळ येतो. मत्तय २६:३०, ३६-४७; १६:२१-२३; मार्क १४:२६, ३२-४३; लूक २२:३९-४७; योहान १८:१-३; इब्रीयांस ५:७.

▪ माडीवरील खोली सोडल्यावर येशू प्रेषितांना कोठे घेऊन जातो व तेथे तो काय करतो?

▪ येशू प्रार्थना करीत असताना प्रेषित काय करीत आहेत?

▪ येशू व्याकुळ का झाला आहे आणि तो देवाला काय विनंती करतो?

▪ येशूचा घाम रक्‍ताच्या थेंबासारखा होतो यावरुन काय दिसून येते?