व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बेथानी येथील शिमोनाच्या घरात

बेथानी येथील शिमोनाच्या घरात

अध्याय १०१

बेथानी येथील शिमोनाच्या घरात

येशू यरीहो सोडतो तेव्हा तो बेथानीच्या दिशेने जातो. तो १९ किलोमीटर्स चढावाचा रस्ता अवघड प्रदेशातून जात असल्याने त्या प्रवासात दिवसाचा बहुतेक वेळ जातो. यरीहो समुद्रसपाटीपासून २५० मीटर्स खाली आहे व बेथानी समुद्रसपाटीपासून ७६० मीटर्स उंच आहे. बेथानी हे लाजर व त्याच्या बहिणींचे गाव आहे याची तुम्हाला आठवण असेल. ते लहानसे गाव यरुशलेमपासून साधारण तीन किलोमीटर्स असून जैतुनाच्या डोंगराच्या पूर्वेकडील उतरणीवर आहे.

वल्हांडण सणासाठी अनेक लोक यरुशलेमामध्ये येऊन पोहंचले आहेत. स्वतःला विधीपूर्वक शुद्ध करून घेण्यासाठी ते लवकर आले आहेत. कदाचित त्यांनी एखाद्या प्रेताला स्पर्श केला आहे अथवा त्यांना अशुद्ध करील असे दुसरे काही केले आहे. त्यामुळे स्वीकारार्ह रितीने वल्हांडण सण साजरा करण्यासाठी स्वतःला शुद्ध करण्याचा विधी ते पाळतात. हे लवकर आलेले लोक मंदिरात जमतात तसे, येशू वल्हांडण सणासाठी येईल किंवा नाही याबद्दल अनेकजण तर्कवितर्क करतात.

यरुशलेम हे येशूबद्दलच्या वादविवादाचे केन्द्र आहे. येशूला जिवे मारण्यासाठी धार्मिक नेते त्याला धरू इच्छितात हे सर्वांना माहीत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कोणाला त्याचा ठावाठिकाणा कळल्यास त्याने त्यांना खबर करावी अशी आज्ञा त्यांनी दिली आहे. अलिकडील काही महिन्यातच तीन वेळा—मंडपाच्या सणाच्या वेळी, पुनःस्थापनेच्या सणात व त्याने लाजराचे पुनरुत्थान केल्यावर—या नेत्यांनी त्याला ठार करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जाहीरपणे येशू प्रकट होईल का, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. “तुम्हास काय वाटते?” ते एकमेकांना विचारतात.

दरम्यान, यहुदी कालगणनेनुसार निसान महिन्याच्या १४ तारखेला येणाऱ्‍या वल्हांडण सणाच्या सहा दिवस आधी, येशू बेथानीला येतो. निसान ८ च्या सुरवातीला म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी येशू बेथानीला पोहंचतो. बेथानीला येण्याचा प्रवास त्याने शनिवारी करणे शक्य नाही, कारण शब्बाथ दिवशी—शुक्रवार संध्याकाळपासून ते शनिवारी संध्याकाळपर्यंत—यहुदी नियमानुसार प्रवास वर्ज्य आहे. पूर्वी केल्याप्रमाणे बहुधा येशू लाजराच्या घरी जातो व शुक्रवारी तेथे मुक्काम करतो.

परंतु, बेथानीचा आणखी एक रहिवासी येशू व त्याच्या सोबत्यांना शनिवारी संध्याकाळच्या जेवणासाठी आमंत्रण देतो. तो आहे शिमोन—एक भूतपूर्व कुष्ठरोगी, ज्याला कदाचित मागे येशूने बरे केले होते. आपल्या कामासू स्वभावाप्रमाणे मार्था पाहुण्यांची सेवा करीत आहे. पण आपल्या वैशिष्ट्याप्रमाणे मरीया येशूकडे लक्ष पुरवत आहे. पण अशा तऱ्‍हेने की, त्यामुळे वादविवाद उत्पन्‍न होतात.

मरीया एक अलाबास्त्र कुपी किंवा लहान बुधली उघडते. त्यात अर्धा किलो “शुद्ध जटामांसी”चे सुगंधी तेल आहे. ते अतिशय मौल्यवान असते. एका वर्षाच्या मजुरीइतकी साधारण त्याची किंमत आहे! मरीया ते सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर व पायावर ओतते आणि त्याचे पाय आपल्या केसाने पुसते. तेव्हा तो सुगंध संपूर्ण घरात दरवळतो.

शिष्यांना राग येतो व ते विचारतातः “हा नाश कशाला?” यहुदा इस्कर्योत म्हणतोः “हे सुगंधी तेल तीनशे दिनारांना विकून ते गरीबांस का दिले नाहीत?” (न्यू.व.) पण यहुदाला गरीबांची मुळीच काळजी नसून शिष्यांनी बाळगलेल्या पैशाच्या त्या डबीतून तो चोरत असतो.

येशू मरीयेची कड घेतो. तो म्हणतोः “हिच्या वाटेस जाऊ नका. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करता येते. परंतु मी तुम्हाबरोबर नेहमी आहे असे नाही. हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.”

येशूला बेथानीमध्ये येऊन २४ तासाहून अधिक वेळ झाला असून त्याच्या उपस्थितीची बातमी सभोवर पसरली आहे. त्यामुळे येशूला पाहण्यासाठी अनेक जण शिमोनाच्या घरी येतात. पण तेथे उपस्थित असलेल्या लाजराला पाहण्यासाठी देखील ते येतात. या कारणाने मुख्य याजक केवळ येशूलाच नव्हे तर लाजरालाही मारून टाकण्याचे ठरवतात. याचे कारण म्हणजे त्याने मेलेल्यांमधून उठवलेल्या लाजराला जिवंत पाहून अनेक लोक येशूवर विश्‍वास ठेवत आहेत. खरोखर, हे धार्मिक नेते किती दुष्ट आहेत! योहान ११:५५–१२:११; मत्तय २६:६-१३; मार्क १४:३-९; प्रे. कृत्ये १:१२.

▪ यरुशलेम मंदिरात कसली चर्चा चालू आहे व का?

▪ शनिवारपेक्षा शुक्रवारी येशू बेथानीला का आला असला पाहिजे?

▪ बेथानीला आल्यावर त्याने शब्बाथ दिवशी कोठे मुक्काम केला असेल?

▪ मरीयेच्या कोणत्या कृतीने वादविवाद उत्पन्‍न होतो व येशू कशी तिची कड घेतो?

▪ मुख्य याजकांचा दुष्टपणा कसा दिसून येतो?