व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भीतीदायक वादळ शांत करणे

भीतीदायक वादळ शांत करणे

अध्याय ४४

भीतीदायक वादळ शांत करणे

आज येशू कामात गढलेला आहे. समुद्रकिनाऱ्‍यावरील लोकसमुदायाला शिकवणे व नंतर ते दाखले आपल्या शिष्यांना खाजगीमध्ये समजावून सांगण्याचा त्यात समावेश आहे. संध्याकाळ झाल्यावर तो म्हणतोः “आपण [समुद्राच्या] पलिकडे जाऊ या.”

गालील समुद्राच्या पूर्वेच्या किनाऱ्‍याला दकापलीस नावाचा प्रांत आहे. हा शब्द देका म्हणजे दहा व पलीस म्हणजे शहर या ग्रीक शब्दांपासून बनला आहे. तेथे अनेक यहूदी निःसंशये राहात असले तरी दकापलीसची शहरे ग्रीक संस्कृतीची केंद्रे आहेत. परंतु त्या भागामध्ये येशूचे कार्य मर्यादित आहे. आपण पुढे पाहणार असल्याप्रमाणे, याही भेटीच्या वेळी त्याला तेथे जास्त वेळ राहता येत नाही.

त्यांना पलिकडील किनाऱ्‍याला जाण्याची विनंती येशू करतो तेव्हा शिष्य त्याला मचव्यात घेतात. परंतु त्यांचे जाणे इतरांच्या लक्षात आल्यावाचून राहात नाही. लवकरच इतर लोक त्यांच्यासोबत जाण्यासाठी आपापल्या मचव्यात चढतात. वस्तुतः गालील हा २१ किलोमीटर्स लांब व जास्तीत जास्त १२ किलोमीटर्स रुंद असा एक मोठा तलावच आहे.

येशू साहजिकच थकला आहे. या कारणाने नाव निघाल्यावर लवकरच तो नावेच्या पाठीमागच्या भागात आडवा होतो, एका उशीवर डोके ठेवतो व गाढ झोपी जातो. गालील समुद्रावर मोठ्या प्रमाणावर मासेमारी केल्यामुळे अनेक प्रेषित अनुभवी नावाडी आहेत. त्यामुळे ते नाव हाकण्याची जबाबदारी घेतात.

परंतु ही सफर सोपी होणार नाही. समुद्रसपाटीपासून २१३ मीटर्स उंच असलेल्या या तलावाचा पृष्ठभाग गरम व जवळपासच्या डोंगरावरील हवा गार असल्याने कधी कधी जोरदार वारे वाहतात व तलावावर अचानक झंजावाती वादळ उत्पन्‍न करतात. हेच आता घडते. लवकरच लाटा मचव्यावर आपटू लागतात, आत शिरु लागतात व त्यामुळे ती बुडण्याच्या बेताला येते. येशू मात्र अजूनही झोपेतच आहे!

ते अनुभवी नावाडी बोट हाकण्यासाठी धडपडत आहेत. ते यापूर्वीही वादळातून गेलेले आहेत यात शंका नाही. पण यावेळी सर्व उपाय करून ते थकले आहेत. प्राणसंकटाच्या भीतीने ते येशूला जागे करतात. ‘गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? आम्हाला वाचवा, आपण बुडत आहोत!’ ते उद्‌गारतात.

येशू उठून वारा व समुद्राला आज्ञा करतोः “उगा राहा! शांत हो!” आणि जोराचा वादळी वारा थांबतो व समुद्र शांत होतो. आपल्या शिष्यांकडे वळून तो विचारतोः “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्‍वास नाही काय?”

तेव्हा शिष्यांना एक अनामिक भीती वाटते. ते एकमेकांना विचारतातः ‘हा आहे तरी कोण? वारा व समुद्राला हा आज्ञा करतो व ते ह्‍याचे ऐकतात.’

येशू केवढे सामर्थ्य प्रदर्शित करतो! आपल्या राजाचा निसर्गावर ताबा असून त्याच्या अधिपत्याखाली पृथ्वीकडे तो संपूर्ण लक्ष देईल तेव्हा नैसर्गिक आपत्तींपासून लोक सुरक्षित राहतील हे जाणणे किती दिलासा देणारे आहे!

वादळ शांत झाल्यावर काही वेळाने येशू व त्याचे शिष्य पूर्व किनाऱ्‍यावर सुखरुप येतात. कदाचित इतर बोटींना वादळाची झळ न लागता त्या सुखरुप घरी परतल्या. मार्क ४:३५–५:१; मत्तय ८:१८, २३-२७; लूक ८:२२-२६.

▪ दकापलीस काय व कोठे आहे?

▪ गालील समुद्रावर झंजावाती वादळ होण्यास कोणत्या भौगोलिक गोष्टी कारणीभूत आहेत?

▪ मचवा हाकलण्याचे आपले कौशल्य कामी येत नाही हे बघून शिष्य काय करतात?