व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मंडपांच्या सणाला येशूची उपस्थिती

मंडपांच्या सणाला येशूची उपस्थिती

अध्याय ६६

मंडपांच्या सणाला येशूची उपस्थिती

साधारण तीन वर्षात, येशू, त्याच्या बाप्तिस्म्यापासून खूपच प्रसिद्ध झाला आहे. हजारो लोकांनी त्याने केलेले चमत्कार पाहिले आहेत व त्याच्या कार्याच्या बातम्या सर्व देशभर पसरल्या आहेत. आता मंडपांच्या सणासाठी लोक यरुशलेममध्ये जमलेले असताना ते तेथे त्याची अपेक्षा करीत आहेत. “तो आहे तरी कोठे?” असा त्यांना प्रश्‍न पडला आहे.

येशू वादाचा विषय बनला आहे. काही लोक म्हणतातः “तो चांगला आहे.” कोणी म्हणतातः “नाही, तो लोकांना फसवतो.” सणाच्या सुरवातीच्या दिवसात लोकांमध्ये अशा तऱ्‍हेची बरीच कुजबुज आहे. परंतु येशूच्या वतीने उघडपणे बोलण्याचे धैर्य कोणालाही नाही. याचे कारण लोकांना यहुदी नेत्यांच्या क्रोधाची भीती वाटते.

अर्धा सण संपल्यावर येशू येतो. तो मंदिरात जातो. तेथे लोकांना त्याच्या शिकवण्याच्या अद्‌भूत नैपुण्याचे आश्‍चर्य वाटते. येशू रब्बींच्या शाळेत शिकलेला नसल्याने यहुद्यांना नवल वाटते की, “शिकण्यावाचून याला विद्या कशी आली?”

येशू खुलासा करतोः “माझी शिकवण माझी नाही, तर ज्याने मला पाठवले त्याची आहे. जो कोणी, त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनीषा बाळगील, त्याला ही शिकवण देवापासून आहे, किंवा मी आपल्या मनचेच बोलतो, हे समजेल.” येशूची शिकवण देवाच्या नियमाला अनुसरून आहे. यावरुन तो स्वतःचे नव्हे तर देवाचे गौरव करू इच्छितो हे स्पष्ट व्हावे. येशू विचारतोः “मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले की नाही?” मग, त्यांना दोष देत तो म्हणतोः “तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळत नाही.”

तेव्हा तो पुढे म्हणतोः “तुम्ही मला जिवे मारावयास का पाहता?”

बहुधा सणासाठी आलेल्या जमावातील लोकांना अशा प्रयत्नांची माहिती नाही. अशा अद्‌भूत शिक्षकाला मारण्याची कोणाची इच्छा असावी याची त्यांना कल्पनाही करवत नाही. तेव्हा, येशूच असा विचार करीत असल्यामुळे त्याच्यातच काही दोष असावा अशी त्यांची कल्पना आहे. ते म्हणतातः “तुला भूत लागले आहे. तुला जिवे मारावयास कोण पाहतो?”

लोकसमुदायाच्या लक्षात येत नसले तरी येशू मरावा असे यहुदी नेत्यांना वाटते. दीड वर्षांपूर्वी येशूने शब्बाथ दिवशी एका माणसाला बरे केले असता त्या नेत्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. या कारणामुळे येशू आता त्यांचा असमंजसपणा दाखवून देतो. तो त्यांना विचारतोः “मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्याला अगदी बरे केले ह्‍यामुळे तुम्ही मजवर का रागावता?” पुढे तो सांगतोः “वरवर पाहून न्याय करू नका, तर यथार्थ न्याय करा.”

या परिस्थितीची जाणीव असणारे यरुशलेमकर रहिवासी आता म्हणतातः “ज्याला जिवे मारावयास पाहतात तो हाच ना? पहा, तो उघड उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्‍यांनी खरोखरच ओळखले आहे काय?” येशू, ख्रिस्त असल्याबद्दल त्यांचा विश्‍वास का नाही हे ते यरुशलेमचे रहिवासी स्पष्ट करतात. ते म्हणतातः “याचे ठिकाण आम्हास ठाऊक आहे पण ख्रिस्त कोठून येणार आहे हे कोणालाही कळणार नाही.”

यावर येशू म्हणतोः “तुम्ही मला ओळखता व माझे ठिकाण हेही तुम्हाला ठाऊक आहे. तरीपण मी आपण होऊन आलो नाही. ज्याने मला पाठविले आहे तो खरा आहे. त्याला तुम्ही ओळखत नाही. मी तर त्याला ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.” तेव्हा ते त्याला तुरुंगात टाकावे वा ठार मारावे या हेतूने पकडण्याचा प्रयत्न करतात. परंतु, येशूच्या मृत्युची वेळ आली नसल्याने त्यांना यश येत नाही.

आणखी पुष्कळ जण येशूवर आपला विश्‍वास ठेवतात; व खरे पाहता त्यांनी तो ठेवायला हवा होता. खरे म्हणजे, तो पाण्यावर चालला आहे; त्याने वाऱ्‍याला, वादळी समुद्राला शांत केले; थोड्याशा भाकरी व मासळीवर त्याने हजारोंना अद्‌भूतरित्या जेवू घातले आहे; आजाऱ्‍यांना बरे केले आहे; लंगड्यांना चालायला लावले आहे; अंधळ्यांचे डोळे उघडले आहेत; कुष्ठरोग्यांना बरे केले आहे; व मृतांनाही उठवले आहे. यामुळे ते विचारतातः “ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्‍याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक काय करणार आहे?”

लोक या गोष्टी कुजबुजत असल्याचे परुश्‍यांच्या कानावर येते तेव्हा ते व प्रमुख याजक येशूला धरण्यासाठी अधिकाऱ्‍यांना पाठवतात. योहान ७:११-३२.

▪ येशू सणासाठी कधी येतो व त्याच्याबद्दल लोक काय बोलत आहेत?

▪ येशूला भूत लागले आहे असे काही जण का म्हणत असावेत?

▪ यरुशलेमच्या रहिवाशांचा येशूबद्दल कसा दृष्टीकोण आहे?

▪ अनेक जण येशूवर का विश्‍वास ठेवतात?